आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girisha Sawant About Eco Friendly Steps, Rasik Article

संवर्धन-समृद्धीचे दमदार पाऊल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी भाषा शिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, युरोपियन संदर्भचौकटींप्रमाणे मराठी भाषेचा अभ्यासक्रम, दृक्‌श्राव्य साधने व शिक्षक जर उपलब्ध झाले तर अन्य भाषिक व मराठीजनांची युवा पिढीदेखील मराठी भाषा आवडीने, हसत खेळत आणि शास्त्रोक्त पद्धतीने शिकेल, हा माय मराठीमागील दृष्टिकोन आहे.
मुंबई विद्यापीठातील जर्मन विभागाच्या प्रमुख डॉ. विभा सुराणा या जर्मन व हिंदी भाषेच्या जाणकार व विदुषी आहेत. परंतु मुंबई विद्यापीठातील जर्मन विभागप्रमुखपद सांभाळताना महाराष्ट्रीय संस्कृती, मराठी भाषा याबाबत त्यांना कुतूहल वाटले. त्यातून मराठी भाषा शिकण्याची ऊर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली. त्या वेळी शास्त्रोक्त, तरीही रुचिपूर्ण, संवादात्मक तरीही सोपी सुटसुटीत, या पद्धतीने मराठी भाषा शिकण्याचा कोणताही उपक्रम डॉ. विभा सुराणा यांना आढळला नाही. जर्मन भाषा किंवा अन्य युरोपीय भाषा, रशियन भाषा, जपानी भाषा, चिनी भाषा अशा भाषा शिकण्यासाठी आधुनिक संदर्भचौकटी उपलब्ध आहेत. या संदर्भचौकटी दिवसागणिक अधिक सुलभ, सोप्या, आधुनिक, सुटसुटीत व प्रवाही होत आहेत. जागतिकीकरणाच्या युगात भाषा प्रवाही होणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. तसेच पुस्तकी ठोकताळे, बोजड अनाकलनीय शब्दजंजाळातून बाहेर पडून मुक्त होणे गरजेचे आहे. वरील संदर्भचौकटी यांचे भान ठेवतातच व तासांच्या मात्रांतून स्नातकाला, विद्यार्थ्याला पायरीपायरीने भाषा अवगत करवतात. अन्य भाषिक असलेल्या डॉ. सुराणा यांना जर्मन भाषा शिकताना, ती आत्मसात करताना व त्यातले मर्म उलगडून त्यात पारंगत होताना त्यातले आधुनिकीकरण कळले होते. मराठी भाषा शिकण्याची आंतरिक ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मराठी भाषा शिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, युरोपियन संदर्भचौकटींप्रमाणे मराठी भाषेचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, दृकश्राव्य साधने व शिक्षक जर अन्य भाषिकांना उपलब्ध झाले तर अन्य भाषिकही मराठी भाषा आवडीने, हसतखेळत आणि शास्त्रोक्त पद्धतीने शिकतील, या दृष्टिकोनातून ही संकल्पना आकारली. या संकल्पनेला डॉ. सुराणा यांचे ‘ब्रेन चाइल्ड’ असे नक्की म्हणता येईल.

या प्रकल्पांतर्गत प्राथमिक पातळीवरील मराठीसाठी अध्यापनसामग्री तयार करण्याच्या कामाला ऑगस्ट २०१२ मध्ये प्रारंभ झाला. जर्मन भाषेच्या अध्यापनाच्या अद्ययावत व परिणामकारक अशा संवादात्मक पद्धतींमध्ये प्रशिक्षित असलेले व त्याचबरोबर मराठी ही मातृभाषा असणारे जर्मन तज्ज्ञ मराठीच्या तज्ज्ञांबरोबर, विशेषतः सुहास लमिये, जयवंत चुनेकर, प्रभाकर परांजपे आणि माधुरी पुरंदरे यांजबरोबर प्रथम पातळीकरिता काम करू लागले. याशिवाय मराठी भाषेतले जाणकार, तज्ज्ञ, दिग्गज यांचे योगदान या प्रकल्पाला लाभले. आधुनिक संदर्भचौकटी लक्षात घेऊनच या प्रकल्पामध्ये अभ्यासक्रम बनवला जात आहे. सहा वर्षांतल्या सहा पातळ्यांवरील अभ्यासक्रमासाठी अध्यापन सामग्री तयार करणे, पाठ्यपुस्तके, स्वाध्याय-पुस्तके, शब्दकोश, अध्यापकांसाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि दृकश्राव्य सामग्री (सीडी, डीव्हीडी, फिल्म इत्यादी) सामग्री ऑनलाइन अध्यापन प्रकल्पासाठी सामग्री तयार करणे या बाबींचा समावेश आहेच. पण अध्यापन सामग्रीचे प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशन, वितरण, प्रचार व प्रसार करणे या बाबींनाही यात प्राधान्यक्रम आहे. चर्चासत्रे, परिषदांमधून मराठी भाषा सर्वंकष फुलवणे, समविचारी संस्थांचे, व्यक्तींचे जाळे विणणे याबरोबरच भाषा आत्मसात करण्याच्या तंत्राचा विकास करणे हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या उपक्रमातून विकसित होणारी भाषा ही लवचिक असेल. सामाजिक, शैक्षणिक व व्यावहारिक पातळ्यांवर ती प्रभावीपणे वापरता येईल. निजभाषिकांशी बोलताना ती उत्स्फूर्त व अस्खलित असेल. मराठी भाषा अभ्यासक्रमातील पहिल्या पातळीवरील विद्यार्थी हा नवशिका पोहणारा विद्यार्थी असेल, तर सहाव्या पातळीवरचा विद्यार्थी भाषेच्या खोल समुद्रात बुडी मारून मोती वेचणारा विद्यार्थी असेल. मराठी आत्मसात करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विचार या प्रकल्पासाठी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचं नाव ठरवतानाही केला गेला. गरज ही शोधाची जननी असते, या उक्तीप्रमाणे या उपक्रमाच्या कल्पनेचा शोध जर्मन विभागात लागला आणि जननी, माता, माय या शब्दांच्या अर्थातूनच या पुस्तकाचे नाव ठरले ‘My Marathi’. ‘माय मराठी’ हा उपक्रम फक्त अन्य भाषिकांसाठी सीमित नाही. गेल्या १० ते १५ वर्षांत महाराष्ट्रीयन कुटुंबातील मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिकत आहेत. नोकरदार पालकवर्ग सुशिक्षित असला तरी त्यांनी मुलांच्या भाषावाढीकडे सुजाणपणे लक्ष न दिल्याने fifty five म्हणजेच पंचावन्न हे महाराष्ट्रीयन कुटुंबातील मुलांनाही सांगता येत नाही. मराठी मुले कित्येक मराठी शब्दोच्चार सुस्पष्ट उच्चारू शकत नाहीत. त्यांना कित्येक म्हणींचा अर्थही माहीत नसतो. हा खेळकर तरीही सखोल अभ्यासक्रम पायरी-पायरीने सुरू केला तर मातृभाषेचे सकस बाळकडू पेशीपेशीत मुरल्यामुळे भाषेचे अलंकार सहज मिरवणारी सुजाण पिढी दिसेल.

भाषा ही तिच्या व्युत्पत्तीवर, अभिजातपणावर आधारलेली असतेच. भाषेचे सौंदर्य मात्र नक्कीच अभिजात असावे. गेल्या १५ वर्षांत मराठी भाषा बंद काचपेटीतल्या अभिसािरकेसारखी झाली आहे. या काचपेटीला उघडून मोकळ्या आकाशात भरारी मारण्यासाठी आधुनिक युगातले पंख देण्यासाठी माय मराठीच्या या अभ्यासक्रमाचा नक्कीच उपयोग होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने हे शिवधनुष्य उचलले आहे. त्याची प्रत्यंचा पार क्षितिजापलीकडे वेध घेणार आहे. प्रत्येक मराठी घराचा उंबरठा ओलांडून हा अभ्यासक्रम देश-विदेशातही नेण्याची विभागाची मनीषा आहे. या अभ्यासक्रमाचा फायदा फक्त अन्य भाषिकांना नव्हे तर मराठी भाषिकांनाही होणार आहे. माय मराठीच्या अभ्यासक्रमामुळे मराठीच्या पथदर्शी प्रकल्पात मराठी व जर्मन या दोन्ही भाषांच्या अध्यापन क्षेत्रातील उपलब्ध ज्ञानाचा उपयोग करून मराठी व जर्मन तज्ज्ञांच्या मदतीने मराठी भाषा अध्यापनाचे आधुनिकीकरण व विकास साधला जाणार आहे. परंतु मराठी अध्यापनाच्या आधुनिक तंत्र सामग्रीची निर्मिती व तदनुषंगिक कामासाठी तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचीही गरज आहे. त्यांना योग्य ते मानधन दिले पाहिजे. त्यासाठी प्रकल्पाच्या प्रत्येक वर्षासाठी ६० लाख रुपयांची आर्थिक तरतूद आवश्यक आहे. अर्थसाहाय्याची तरतूद करण्यासाठी पुढील मार्गांचा अवलंब करण्यात येईल. पाठ्यपुस्तक व ऑनलाइन व ऑफलाइन सामग्रीची विक्री, विद्यार्थी शुल्क, शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे शुल्क, देणग्या. विचारांचे आदानप्रदान, नवीन कल्पना, आधुनिक तंत्रज्ञान यांची वेगळी वहिवाट या पथदर्शी प्रकल्पाने सुरू होणार आहे. हिरव्या वनराईतील हा समृद्ध अभ्यासक्रम सध्या मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात सुरू करण्यात येत आहे. ७ सप्टेंबर ते २९ मार्च २०१४ या कालावधीत, १२० तासांचा पहिल्या पातळीचा अभ्यासक्रम २५००/- शुल्क भरून आपल्याला उपलब्ध होणार आहे. सलग ४ तासांच्या या अभ्यासक्रमात शिकणं, समजणं, ऐकणं, लिहिणं व बोलणं या सर्वांगाने मराठी भाषा शिकवली जाणार आहे. तेच या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
(girisha.sawant@gmail.com)