आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकळे मनासारखे जगणे म्हणजे नेमके काय?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरी स्वत:ची एक रूम असावी, छोट्या भावा-बहिणीने ती ‘शेअर’ केलेली असली तरी चालेल, पण किमान एक कोपरा स्वत:चा असावाच...
जिथे कुणी यायलाच नको.
तो ‘झोन’ प्रोहिबिटेड...
तिथे आपण नि आपला कधीही रेंज न जाणारा मोबाइल.
कुणालाही न ऐकू येणारा संवाद...
मैत्रीसाठी एवढे अपेक्षित आहेच. घरात ‘नेट’ असले तर गप्पा मारता याव्यात; आपण नेमके काय करतो, असे प्रश्न नकोत.
मुळात आपले स्वातंत्र्य असे हवे, जेथे प्रश्नांची लड नको, समर्थनांची मांडणी नको. त्रैराशिक मांडून जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणे नको. बेरजा-वजाबाक्या करत आपल्या जगण्यात अर्थ कसा नाही याची लेक्चरबाजी नको. अनेक तरुणींना आपल्या मोबाइलची रिंग वाजली की दूर जाऊन हळूच बोलावेसे का वाटते? क्षणभरदेखील मोबाइल आपल्या शरीरापासून अलग का ठेवावासा वाटत नाही? चुकून मोबाइल इकडेतिकडे राहिला तर त्या कासावीस बनतात. तो किमती असतो वा नसतो म्हणून नव्हे; तर त्यातील मेसेजेस-कॉल्स कोणाला काही कळले तर...?

हे भय व्यापून टाकायला सुरुवात झाली की नि:शंकपणे समजावे, आपली मैत्री विविध वळणे घेत चालली आहे. घरात न दाखवता येण्याजोगा एसएमएस असतो तरी कसा? ‘आय लव्ह यू’ या तीन शब्दांव्यतिरिक्तचे अनेक एसएमएस, वरवर पाहता निरुपद्रवी वाटणारा मजकूर घरादाराला चिंतित करून टाकतो का?

होतं असं, आपल्या जीवनात नवीन वा नव्याने जुनी मित्रमंडळी येत-जात असतात. एखाद्याशी जुळते आपली मैत्री... म्हणजे तरी काय? बोलावंसं वाटतं, बोलणं ऐकावंसं वाटतं. तेच ते विषय असतात, पण सांगण्याची पद्धत आवडते. हा विरंगुळा मस्तच वाटतो... पण दीडेक तास कोणाबरोबर तरी फिरायला जाणं, कुठल्याशा अपरिचित ठिकाणी बसणं यापेक्षा हे यंत्र सुरक्षित वाटतं. शब्दांनी बरेचसे साध्य होऊ लागते. प्रथम आवडीनिवडी, मग रूटीन... मध्येच करिअर... आणि हे सगळे सोडून अगदी आतून काय वाटते याबद्दलच्या ओळी... नेमक्या याच ओळी... हीच वाक्ये घरच्यांच्या दृष्टीस पडली तर काय...?

मुली बिचकतात प्रतिक्रियेला. पालकांच्या रागाला. घरांमध्ये मोकळेपणाने बोलता येण्यासाठी त्यांना खोलीची दारे लावावी लागतात. वैष्णवी किंवा सुजित परस्परांचे मित्र असतात. पण ‘जस्ट फ्रेंड’ असे दोन्ही घरात त्यांनी सांगितलेले असते. त्यामुळेच एकेक तास बोलण्याचे त्यांचे प्रकार घरादाराला आवडत नाहीत. वर्गातल्या मित्राशी फार तर लेक्चर-कॉलेजबद्दल बोलता येईल... अधिक काय?

वैष्णवी हट्टाला पेटून आपल्या दारावर ‘नॉक बिफोर एंटर’ असे लिहिते. दार वाजवा; मगच आत या... हा तिचा ‘आदेश’ घरादाराने पाळावा, तिला तिची स्पेस द्यावी, तिला कोणत्याही छोट्या मोठ्या कारणाने छेडू नये... मुख्य म्हणजे, सुजित काय म्हणतोय, झाले ना मघाशी बोलणे... आता अजून काय? असे म्हणू नये...

संध्याकाळ झाली की वैष्णवी दार बंद करून घेते. तिची आई म्हणते, खुशाल दार बंद कर... वाच, अभ्यास कर... तुझी ‘स्पेस’ जप... पण मोबाइल बाहेर ठेव... या एका वाक्याने वैष्णवीच्या रागाचा पारा वर चढतो. ती संतापते. पालकांच्या ‘कोते’पणाचा, ‘क्षुद्र’पणाचा तिला भयंकर राग येतो. तिला आपली प्रतिक्रिया ‘एफबी’वर टाकावीशी वाटते. संदर्भ सोडून ती केवळ एकच वाक्य लिहिते... उफ... माय पॅरेंट्स... दे बोथ आर वेरी रीजिड... स्पेशली... आई... मोबाइल वापरायचा नाही हा तिचा फंडा... हाऊ कॅन आय अ‍ॅक्सेप्ट... वैष्णवीच्या या दु:खावर अनेकांचे डोळे ओलावतात... अख्खीच्या अख्खी कम्युनिटी मग सरसावते.

तिकडे सुजितने मोबाइल घेऊन रात्री वॉकला जाण्याचा निर्णय घोषित केलेला असतो. कान, तो आणि हँडसेट... त्याला रस्त्याशी देणेघेणे नसते. घरून निघताना एक वाक्य मात्र परत परत तो सांगतो, मला मोबाइलवर कॉल देऊ नका... प्लीज. अशा वेळेस आपण काय करावं हे पालकांना कळत नाही नि यामध्ये आपली काही चूक आहे, हे वैष्णवी वा सुजितला जाणवत नाही.
bhargavevrinda9@gmail.com