आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंतरलेली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘साडी!’ काय उच्चार आहे नाही? हो नं, नुसता ‘शब्द’ नाहीच मुळी! एक असा मंतरलेला उच्चार, जो जणू अलिबाबाची संदर्भांची गुहा उघडायला लावतो व मग एका पुढे एक आठवणींचे पेटारे उघडले जावेत आणि त्या रत्नखचित आठवणींनी मन उजळून निघावं! संदर्भ तर इतके की एखादी ‘हायपर लिंक’ प्रेस व्हावी आणि साइट्स उघडतच राहाव्यात...
हा ‘मंतरलेला उच्चार’, ही ‘स्त्री सखी’ आज आहे तरी कुठे? ती लुप्त निश्चितच झालेली नाही, हे खरंय; पण हल्ली ती ऊन-सावलीचा खेळ खेळायला लागली आहे. का आपणच तिच्याशी हा खेळ खेळतोय?

आता बघा, एकीकडे ही एक ‘इंडस्ट्री’ आहे. मॅन्युफॅक्चरिंग हाउसेस जोमात काम करताहेत. दुकानं, मॉल्स खच्चून भरताहेत, लोकांचीही गर्दी आहे. खरेदी-विक्रीही आहे, पण वापरात म्हणाल तर नैमित्तिक!
‘आई मला नेसव शालू नवा’ म्हणणारी कन्या साडी नेसते ते फक्त ‘सारी-डे’ला(च)! त्यानंतर थेट लग्नात (स्वत:च्या) तेही लग्नातल्या विधींच्या वेळेपुरते मर्यादित बरं! स्वागत समारंभालाही खात्रीने नाहीच. त्यानंतर पुन्हा म्हणजे सणा-वारांच्या ‘निमित्ताने,’ ऑ फिसमध्येही खास कारणानेच. बरं हे सर्व व्हायला लागूनही आता दीड-तप उलटले.
आताची जी वयस्कर महिलांची पिढी आहे तीही साड्यांमधून थोडी का होईना, ‘सोयीस्कर’पणे बाहेर पडलीच आहे. आज ती गावांतून आहे, अल्पशा प्रमाणात शहरात आहे व काही खास व मोजक्या व्यवसायांमध्ये आहे. एरवी ही ‘साडीकथा’ केवळ ‘दंतकथा’ म्हणून राहणार की काय?

साडीच्या बाबतीत ही काळजीची वेळ का बरं आली? ती ‘नेसावी’ लागते, ‘घालता’ येत नाही, म्हणून का? नेसायला लागणारा वेळ आता आपल्याला सहजपणे देता येत नाही म्हणून का? ‘नेसायला जागा लागते’, ‘फुल साइज मिररची सोय हवी असते’ आणि ‘ती किती सांभाळावी लागते.’ हो हे सर्व खरं आहे बाई! पण त्यावर ‘सराव’ हा एक छान उपाय आहे. एखादी एअर होस्टेस ‘जीन्स-टीशर्ट’मधून ‘साडी’मध्ये अवतरते तेही ऑ न फ्लाइट-टॉयलेटचा चेंज रूम म्हणून वापर करून! हे एक उदाहरण पुरेसे बोलके आहे. नाही का?

‘साडी म्हटलं की तिचा बराच ‘लवाजमा’ आला.’ होय! हे अगदी मान्य आहे. पण आताचे आपले बरेचसे पेहराव तसे ‘थ्री पीस’ आहेतच की! आणि साडीचा हा लवाजमा (ब्लाउज-पेटिकोट) आलटून-पालटून इतर साड्यांशी मिळवता-जुळवता येतो की. म्हणजे, थोड्याशा प्रयत्नाने हे ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’ ‘मॅनेज’ करता येते. बरं (फिटिंग) म्हणाल तर साडी त्यात सहजच सरस ठरते. ती इतक्या अनेक प्रकारे नेसता येते की कल्पकतेला वावच वाव!
बरं फिटिंगचाही प्रश्न नाही. हल्लीच्या ‘आपल्या’ बदलत्या आकारमानासही साडीइतका दुसरा कुठलाच पेहराव झाकून-जुळवून घेत नाही, हो की नाही? शिवाय पिढ्यान्पिढ्या ती वापरता येते. एकच साडी माय-लेकी आलटून- पालटून वापरू शकतात. एक ‘ब्लाउज’चाच प्रश्न, पण तोही आता ‘होजियरी’ ब्लाउजेसने सोडवलाय.
ह्यूमन/वुमन फिगरचे एरवी जे काही गुणदोष असतात, त्यातील नेमक्या गुणांना उठाव व दोषांना सांभाळून घेणे हा तर साडीचा अगदी यूएसपी-युनिक सेलिंग पॉइंट म्हणावा लागेल. राजा रविवर्मांनी त्यांच्या सर्व चित्रांमधल्या स्त्रिया ‘साड्या’ परिधान केलेल्या दाखवाव्यात, हा काही निव्वळ योगायोग निश्चितच नव्हे! साडीचे जे अनुपम सौंदर्य आहे किंवा ते आपल्याला ती ज्या प्रकारे खुलवते, जी डिग्निटी ती नेसणारीस बहाल करते, ती तर अतुलनीयच आहे. मग मुख्य प्रवाहातून ती बाजूला पडून मखरात जाऊन बसण्याचं कारण काय बरं असावं? असो, आता आपण जर तसे केलेच आहे तर तत्सम काही (नैमित्तिक) व ‘हटके’ साड्या पाहूया? या नवीन वर्षाच्या पार्टीजना जर ‘साडी’ तुमच्या खिजगणतीतही नसेल तर ती यावी, मानाने वॉर्डरोबमध्ये समाविष्ट व्हावी, यासाठी काही डिझायनर्स व ‘साडी पुनरुज्जीवनवाद्यां’नी खास प्रयत्न केलेत.

अजमावून तर पाहा.
ही आहे ‘पार्टी साडी,’ पण इव्हिनिंग गाउनसारखी; ‘नेसण्याची’ नव्हे, तर ‘घालण्याची’. म्हणजेच ‘सांभाळणे’ नाहीच मुळी - सहज वावरणे. तिचा साजही अनोखा, बाजही भारी मॉडर्न! हे सरते न सरते तोच येईल प्रजासत्ताक दिन! म्हणजे शुभ्र साडी नेसण्याचे खास लायसन्स. त्यास जर तिरंग्याशी तादात्म्य असलेली रंगसंगती असल्यास? म्हणजे ‘लता मंगेशकर’ साडी किंवा ‘चक दे’मध्ये आपली टीम प्री-फायनल पार्टीला नेसते तशी? मग अशा साड्या आपल्या वॉर्डरोबमध्ये हव्याच हव्या.
‘पेशवाई’, व्हाइट/ ऑ फ व्हाइट बेस असलेली ‘सांगानेरी’ ब्लॉक प्रिंटेड रेंज, कोलकाता - पण कॉटनव्यतिरिक्त सिल्क/ पॉलिसिल्कमधील, क्वचित ओरिसी व चंदेरी, केरळची ऑ फ व्हाइट गोल्ड, लखनऊकडची ‘कताब’, बनारसची ‘कटवर्क’. या सर्व साड्या व्हाइट/ ऑ फ व्हाइट या मुख्य रंगात असून अ‍ॅक्सेंटला इतर गडद/भडक रंग असतात. वा तसे आपण ब्लाउज व अ‍ॅक्सेसरीजच्या माध्यमातून आणू शकतो. बरं लव्याजम्याची आता काळजी नसावी, कारण यातील बहुतेक विथ ब्लाउजपीस असतात किंवा काँट्रास्ट होजियरी/लिक्रा ब्लाउज आहेच. परकर आपल्याकडे पांढरा असतोच. चला तर मग, आपण आपल्यातील कलात्मक दृष्टिकोन जागवूया, आपल्यातील डिझाइनरला वाव देऊया व नूतन वर्षात नूतन त-हेने सजूया!


meghana.shrotri@gmail.com