आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वलयांकित पार्श्वभुमी, साहित्य संवेदनशीलता आणि साधेपणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी माधवी देसाई निवर्तल्याची बातमी कळाली अन् त्यांची पुस्तके, त्यांनी पाठविलेल्या पत्रांतील शब्द, त्यांच्याशी फोनवर झालेलं बोलणं हे सारं फेर धरून मनात नाचू लागलं. भालजी पेंढारकरांसारख्या महान दिग्दर्शकाची मुलगी, अत्यंत संपन्न घरातील सून, रणजित देसार्इंसारख्या सिद्धहस्त लेखकाची पत्नी मंगेशकर घराण्यासोबतचे अत्यंत घरोब्याचे संबंध, एवढी मोठी वलयांकित पार्श्वभूमी असूनही, जर विदारक अनुभव वाटणीला आले नसते, तर जीवनाचा खरा अर्थ समजला नसता, असं मानणा-या एका साहित्य शलाकेचा अंत मनाला चटका लावून गेला.


त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट न झालेली माझ्यासारखी अनेक माणसे आहेत, परंतु कोणाशीही व्यक्तिगत पत्रव्यवहार न करण्याचं मनाशी ठामपणे ठरवलेल्या माधवीतार्इंनी मला मात्र भरभरून पत्रे लिहिली, फोनवर कितीदातरी कितीतरी वेळ मनापासून बोलल्या. याचं गूढ मला कधीही कळालं नाही आणि मी ते शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. काही गोष्टी अगम्य असतात आणि त्या अगम्यच असलेल्या ब-या.


त्यांचं ‘नाच गं घुमा’वाचून मराठीतील असंख्य वाचकांनी, समीक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. त्याच्या अनेक आवृत्याही निघाल्या, परंतु त्यात आलेल्या सर्व चित्रविचित्र स्थित्यंतराविषयी आणि एकूणच आयुष्याविषयी माधवीतार्इंचं सरळ साधं तत्त्वज्ञान होतं. ते म्हणजे माणसातल्या माणूसपणावर त्यांचा अत्यंत गाढ विश्वास होता. एका पत्रात त्यांनी म्हटलं होतं. आपण सर्व माणसे कुठे ना कुठे खूप चांगली, खूप दुबळी असतो. म्हणून माणसाने
माणसावर राग न धरता चांगले ते शोधावे, चांगल्यावर प्रेम करावे. हा समजूतदारपणा, सर्वसमावेशक दृष्टी काही फक्त वयामुळे आली होती असे नाही. तो त्यांचा पिंडच होता. माणसेच नव्हे तर त्यांच्या नर्मदा वास्तूच्या आवारात असलेल्या पिंपळाशीही त्यांचं विलक्षण नातं होतं. नव्हे तर तो त्यांचा सखाच होता. त्या पिंपळावरच्या बांडगुळाची फांदीसुद्धा पावसात रात्रभर जागून तुटताना पाहणा-या माधवीताई या म्हणूनच सगळ्यांना आपल्या वाटायच्या. त्यामुळेच कदाचित बांदिवडेच्या लोकांनी इतक्या वर्षानं ही माधवी मनात जपली होती. म्हणूनच आयुष्यातल्या सगळ्या विचित्र स्थित्यंतरानंतर बांदिवडेला परत येताना त्यांना अजिबात संकोच वाटला नाही.


नाच गं घुमा वाचल्यानंतर मी जेव्हा त्याना पहिल्यांदा पत्र लिहिलं तेव्हा मला त्यांच्या उत्तराची खरोखरच अपेक्षा नव्हती, पण एके दिवशी त्याचं पत्र आलं. फक्त औपचारिकता म्हणून नव्हे तर चांगलं तीन फुल स्केप पानांचं ते पत्र होतं. त्यानंतरही त्या असंच भरभरून लिहित गेल्या. त्यांच्या निधनाची बातमी कळाल्यावर सर्वप्रथम डोळ्यांसमोर आले ते प्रिय शैलेश हे एवढंच निळ्या शाईत लिहिलेली त्यांच्या पत्रातले संबोधन आणि उर्वरित पत्रात काळ्या शाईत लिहिलेली त्यांची अक्षरे. त्यांच्या प्रत्येक पत्रात हे असंच होतं. अत्यंत मनस्वीपणे त्या लिहायच्या. माझ्या एका पत्राचं तर त्यांनी त्यांच्या महिला मंडळात जाहीर वाचन केलं होतं. त्यावर चर्चाही घडवून आणली होती. फोंड्यातली ही त्यांची संस्था महिला व मुलांसाठी काम करते. इंग्रजी आणि कोकणी भाषेच्या गोंधळात अडकलेल्या मुलांना मराठी भाषेचे प्रेम लागावे यासाठी विविध उपक्रम घेणे.


दरवर्षी महिला साहित्य संमेलन घेणे इत्यादी अनेक उपक्रम त्या राबवायच्या महिला साहित्य संमेलनाची आखणी, नियोजन या सर्व जबाबदा-या महिलाच पार पाडायच्या. त्यांनी त्यांच्या जीवनात रुक्षपणा येऊ दिला नाही. एका पत्रात त्यांनी वसंतऋतुच्या आगमनाचं खूप सुंदर वर्णन केलं होतं. आयुष्यातल्या एवढ्या उलथापालथीनंही त्यांच्यातलं रसिकपण हिरावून नेलं नव्हतं. चित्रकार नागेशकरांच्या जीवनावरील कादंबरी लिहित असताना त्यांनी घेतलेल्या कष्टांचा एका पत्रात त्यांनी उल्लेख केला होता. या वयात त्यांनी ते कष्ट घेतले व ते तडीस नेले. गोवादूत दैनिकातील नागेशकारांवरील लिहिलेला लेखही त्यांनी मला आवर्जून पाठविला होता. मध्यंतरी एकदा त्यांच्या एका कथेवर विक्रम गोखले चित्रपट काढायचा असं ते म्हणताहेत हे माधवीर्तांनी मला फोनवर सांगितलं. त्यांनी नुसती कथाच सांगितली नाही तर त्या प्रस्तावित चित्रपटातील एक गाणंही माझ्यासारख्या नवख्याला त्यांनी लिहायला सांगितलं. चित्रपटात दोनच गाणी होती एक गझल ती त्यांनी दुस-याकडून लिहून घेतली होती. मात्र, काही कारणाने अनेक मराठी चित्रपटांप्रमाणे हा सिनेमाही निर्माता-दिग्दर्शकातील तांत्रिक वादामुळे निघू शकला नाही. त्यांच्या वयाचा विचार करता आणि जिथं राहायच्या तिथल्या संपर्क साधनांचा विचार करून मी स्वत:हून पत्रासोबत तिकीट लावलेलं आणखी एक पाकीट पाठवलं त्यांना त्रास होऊ नये म्हणून नंतर त्यांनी पत्रात व फोनवरही हे असं तुम्ही करत जाऊ नका, असे बजावले होते. मी त्यांना कितीदा तरी म्हणायचो की मी तुमच्या नातवाच्या वयाचा आहे, मला अहो-जावो, असे संबोधू नका मला अवघडल्यासारखे वाटते, तर त्या म्हणाल्या की माझा नाइलाज आहे. माझ्यावरती संस्कारच असे झाले असल्यामुळे ते आता बदलणे शक्य नाही. दुस-याचा आदर करण्याचा त्यांचा स्थायिभावच होता.
परिस्थितीने आपल्या सहाणेवर कितीही घासली, उगाळली तरी चंदनासारखी असलेली अशी ही
माणसे शेवटपर्यंत सुगंधच देत राहतात. मला मात्र माधवीतार्इंना प्रत्यक्ष भेटू शकलो नाही याची बोच आयुष्यभर मनाला सलत राहणार.