आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्‍टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रिया मागे का राहतात या विषयावर एक चर्चा एसीएम-डब्ल्यू या संगणकशास्त्रातील मातब्बर संस्थेच्या स्त्री शाखेच्या वार्षिक सोहळ्यातली. व्यासपीठावर असणा-या स्त्रियांनीही खणखणीत आवाजात सांगितले, बाळंतपणानंतर स्त्रिया कमी जबाबदारीच्या नोक-या मागतात, तनखा कमी मिळण्याबद्दल त्या फिकीर करीत नाहीत; पण माणसाकडून त्याच्या योग्यतेचे काम करून घेण्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कित्येक मुली विनाकाम घरात बसतात. मुलींनी पूर्वीइतकेच जबाबदारीचे काम करण्याची तयारी दाखवली तर समस्या सुटेल!
अहाहा! घरातल्या वाढलेल्या जबाबदारीचे सोयीस्कर विस्मरण नाही का हे? पुरुषयंत्राने ती जबाबदारी वाटून घ्यावी नि दाखवावे पूर्वीइतकेच जबाबदारीचे काम करून, हे आव्हान का नाही आले?


उच्चपदस्थ स्त्रियांनी स्वत:चे कर्तृत्व नि त्यामागचे पुरुष आधारस्तंभ याबद्दल सांगितले, पण ज्या स्त्रियांचे अनुभव मागे ओढले गेल्याचे आहेत त्यांचा आवाज व्यासपीठावर अथवा सभागृहात आलाच नाही. पुरुष बॉसपुढे गोंडा घोळल्याने मिरवण्याचा, निर्णयप्रक्रियेत अधिकाराचा अथवा त्यांच्याप्रमाणेच काही सवलतींचा लाभ होईल असे संख्येने, बलाने कमी असलेल्या स्त्री कर्मचा-यांस, अगदी अधिका-यांसही वाटते नि परिणामत: स्त्रीशक्ती अधिकच कमकुवत होते. स्त्रीदाक्षिण्याचे मोल खणखणीत मोजून घेतले जाते याबद्दल स्त्रिया सावध आहेत का? स्त्री-पुरुष समान अधिकाराच्या जागेवर कार्यालयात काम करीत असले तरी घरी त्या दोघांना नित्यकर्मांतून सारखीच सुटका मिळत नाही. तणावमुक्तीसाठी आॅफिस सुटल्यावर पुरुषाला क्लब, पार्टी असते, तर स्त्रीला पोराबाळांची चिंता. हे आणि यासारखे मुद्दे, बदलाला वेळ लागेल, आपण राजकारण्यांकडे न पाहावे किंवा सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे अशा उत्तरांची पाने पुसून धकवले गेले. रात्री शेतात विजेची तार पडून गाय मेली तर पंचनाम्याला विद्युत अभियंता स्त्री गेली नाही, याची बातमी तिच्या तिथे गेलेल्या सहका-यांनी चवीने चघळली. दिवसभर कार्यालयात राहून तिने नवीन संगणकप्रणाली समजून घेतली नि पुरुष सहका-यांची वाट न बघता सर्व अहवाल बनवले, याचे स्मरण तेव्हा ते सोयीस्कर विसरले.

स्त्री झाली म्हणून काय झालं, अधिकारी आहे नंतर तिथे जायला हवी होती ती. न जाण्याचे कारण तिचे बाळ आजारी होते नि बाळाचे बाबा घरी नव्हते हे तिचे कुणी ऐकलेच नव्हते जणू... याआधीच्या आणीबाणीच्या प्रसंगांत पुरुष सहका-यांच्या अनुपस्थितीतही तिने बजावलेली कामगिरी समूहाच्या स्मृतिपटलावरून अदृश्य झाली नि तिची जागा या नव्या माहितीने घेतली. किती दैवदुर्विलास! अशा वेळी ओरडून तिने आपले कर्तव्य / कर्तृत्व जगाला सांगण्यात शक्ती घालवायची का?


याच आमच्या मैत्रिणीचा आणखी एक अनुभव असा. तिच्याकडे विद्युत जोडणीचे टेबल येणार ही बातमी झाल्यावर लोकांनी आधी एक महिन्यापासून आपले नवी जोडणी अर्ज राखून ठेवले. वशिला, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था उशिराने मिळणार असली तरी समाजाला हवी आहे याचे हे द्योतक नाही का? स्त्री अधिकारी येणार, केवळ इतक्याच माहितीवर तिच्या गुणांबद्दलचा समूहाचा निष्कर्ष स्वागतार्ह आहे का? ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरल्याचा तिने आनंद व्यक्त करावा की नव्या टेबलासोबत जवळजवळ दुप्पट काम निपटावे लागणार म्हणून चिंता?


परवाच ऋषीकुमार पंड्या गेले. अन्नपूर्णाबाईंच्या विजनव्रतामध्ये त्यांचे सहकार्य केवळ अनमोल असे. पण असे किती भेटतील? मुलाला घरंदाज संगीत शिकवावे म्हणून आईने काही वर्षे पणाला लावावी. घास तोंडाशी आला असता आईच्या शिस्तीतच शिकण्याची गरज नाही, परदेशात चल, मैफली करू, मी तुला संगीत शिकवेन, मलाही ते येतेच, असे अचानक उगवलेल्या बापाने तरुण मुलाला परभारे फितवावे. आईने मुलाचा छळ केला अशा बातम्या याव्यात, त्यावर आईने केवळ मूक राहावे नि पुन्हा काही वर्षांनंतर मुलाने स्वत:चा भ्रमनिरास आईजवळ व्यक्त केल्यावर कसलाही दुरुद्गार न काढता चल, उचल ती सतार, ती तुझीच वाट पाहते आहे, असे म्हणून शिकवण्याची तयारी दाखवावी हे समाजाला ढळढळीत दिसावेसे एक उदाहरण. घराघरांतून अशी किती...


आई शिक्षा करते, बाबा गोड बोलतात; आईला काही येत नाही, बाबा हवे ते करून दाखवतात, असा ग्रह असणा-या मुलांची एकदा गणती करायला हवी असे मला कितीकदा वाटले आहे. आई आणि बाबा यांच्या सहयोगाने आपण घडत आहोत, एकावर दुस-याची खरेच कुरघोडी असती तर आपली फरपट झाली असती असे मुलांना समजवायला हवे. कोणतीही दर्जेदार गोष्ट विनासायास, सहजसाध्य नसतेच हा संस्कार असायला हवा.


हे स्त्रीचरित्र केवळ भारतातलेच नाही. शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्जची पहिली प्रेयसी-पत्नी जेनने तिची कहाणी अलीकडेच प्रसिद्ध केली आहे कसल्याही अभिनिवेशाशिवाय. स्टीफनच्या आजाराची पूर्ण कल्पना असताना, त्याच्या प्रतिभेने भारावून जाऊन, त्याची सावली बनण्याचा तिने निर्णय घेतला. अनेक वर्षांच्या संसारात, मुले-बाळे मोठी झाल्यानंतर बाबाने सेविकेशी लग्न करावेसे वाटते म्हणून पत्नीला घटस्फोट द्यावा असा प्रस्ताव मांडला नि बाईंनी तो समंजसपणे (?) स्वीकारला. प्रश्नचिन्ह यासाठी की तिथे अन्य काही शक्य होते का?


स्त्रीला तरी स्त्रीची वेदना समजावी ना... जागृतीची गरज तिथे आहे.
एका सुशिक्षित प्रौढेला तिच्याहून पंचवीस वर्षांनी मोठ्या एका सहकार्याने मदत केली. तिनेही त्याचे ऋण मान्य करून त्याला आदराने वागवले. लवकरच प्रस्ताव आला, मी एकटाच, घटस्फोटित, तुझ्याशी लग्न करू इच्छितो. मित्रमंडळातूनही तिला तशी सूचना. तिला स्वत:चे जीवन आहे, विचार आहे हे जणू सारेच विसरले. बाबाचे एकाकीपण घालवण्यासाठी तिचा जन्म होता का? मला आवडलेले तिचे संयत उत्तर होते, एका स्त्रीला तुम्ही घटस्फोट दिलात त्या तिच्या वेदना मला विसरता येणार नाहीत. तुम्ही सर्वार्थाने मला अनुरूप असता आणि मी लग्नाळू असते तरी मी तुमचा विचार करू नये. आमच्या दुस-या एका सखीला मात्र तिला मदत करणा-या ज्येष्ठ पुरुष सहका-याच्या एकाकीपणाचे वाईट वाटले. तिने स्वत: पुढाकार घेऊन त्यांचा मोडकळलेला संसार जोडण्याचा प्रयत्न केला आणि यशाची काहीच आशा नाही हे स्पष्ट होताच पुढाकार चालू ठेवून स्वत:च त्याच्याशी लग्न केले. हेही एक समर्पणच... त्याचेही... सम्यक दृष्टी महत्त्वाची. ती आपल्या सर्वांना लाभो.