आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Sanjivani Tadegaonkar\'s Artical On Global Consciousness

वैश्विक जाणिवेची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माया अँजेलू ही अमेरिकेतील कृष्णवर्णीय कवयित्री. जन्म 4 एप्रिल 1930 रोजी अमेरिकेतील सेंट लुई येथे. वर्णद्वेष आणि वंशवादामुळे वातावरण प्रक्षुब्ध झालेले. गुलाम म्हणून होणा-या माणसांच्या खरेदी-विक्रीमुळे आयुष्य अस्थिर, असुरक्षित झालेले. या काळात मायाचा जन्म झाला. तिचं मूळ नाव मार्गारेट अ‍ॅनी जॉन्सन पण तिचा भाऊ बेली तिला प्रेमाने ‘माया’ म्हणत असे.
लहान वयातला आईवडिलांचा घटस्फोट, आईच्या प्रियकराने कोवळ्या वयात केलेला बलात्कार, स्वत:च्या रूपाबद्दल असलेली घृणा या पार्श्वभूमीवर माया मोठी होत होती. बलात्काराने तर तिचं मनोविश्व हादरून जातं. कुणावर विश्वास टाकावा? काय करावं? कुणाला सांगावं? या उद्ध्वस्त अवस्थेत आपलं दु:ख, वेदना ती भावाला सांगते. मात्र, अल्प शिक्षा भोगून आरोपी सहीसलामत सुटतो, तेव्हा मायाचा मामा त्याचा खून करतो. या घटनेची या लहानशा जिवाला आणखीच दहशत बसते व ती या धक्क्यातून सावरू शकत नाही. ती अबोल होते. या बलात्कारातून तिला मुलगा होतो. चैतन्यहीन स्थितीतल्या मायाला मिसेस फ्लॉवर्स ही चैतन्याने सळसळती बाई भेटते आणि तिच्या रंग उडालेल्या जीवनात नृत्य, संगीत, अभिनय, या कलांच्या रूपाने रंग भरते. निराशादायी स्थितीवर मात करून जगण्यावर कसं प्रेम करावं, आयुष्याचा रसरसून कसा आनंद घ्यावा याचा गुरुमंत्र ती मायाला देते नि मायाचं जीवन बदलून जातं. ती मुलाला घेऊन स्वतंत्र राहू लागते. चरितार्थासाठी हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. हळूहळू तिथल्या क्लबमध्ये डान्स, कविता, कधी नाटक लिहून ते दिग्दर्शित करून त्यात अभिनय करणे, अशा एक ना अनेक कामांत ती स्वत:ला गुंतवून घेते. कवयित्री, लेखिका, गायक, दिग्दर्शिका, अभिनेत्री, संपादक अशा अनेक भूमिका ती लीलया पार पाडते.
जसजसे आपण समाजाला, वाईट अनुभवांना घाबरत असतो, तसतसा समाज आपल्याला घाबरवत राहतो. एकदा निर्भीड होऊन तुम्ही संकटांना भिडलात तर तेही सवयीचं होऊन जातं. पुढे दु:खातही सुख शोधण्याची कला आत्मसात होते. आशा-निराशेच्या झुल्यावर हेलकावणा-या मायाच्या जीवनावर आधारित पहिली कादंबरी 1970मध्ये प्रकाशित होते. आणि तिच्या वेदनेचा हुंकार व्यक्त करणारा सच्चा स्वर पाहून वाचक, समीक्षक तिची लक्षवेधी दखल घेतात.
माया अँजेलूच्या नावावर पाच कादंब-या आणि सहा कवितासंग्रह प्रकाशित असून आजही वयाच्या 83व्या वर्षी लेखन चालून आहे. श्वेतवर्णीय पुरुषसत्ताक पद्धतीला विरोध व्यक्त करतानाच कृष्णवर्णीय समाजातील पारंपरिक रूढी, अज्ञान आणि परिस्थितीशरण मानसिकता यावर त्यांनी आपल्या साहित्यातून चांगलेच ओरखडे ओढले आहेत.
गुलाम मनोवृत्तीने पोखरून टाकलेल्या मनाला बळ देण्याचं, उभारी देण्याचं काम करणारी चैतन्यदायी कविता माया अँजेलू यांनी लिहिली आहे. आपल्या कवितेचं विश्लेषण करताना त्या इतकंच म्हणतात की, ‘पिंज-यातला पक्षी का गातो? कारण, त्याला स्वातंत्र्याची आस आहे’, हे माया अँजेलूचं तत्त्वज्ञान सर्व प्रांतातील गुलामव्यवस्थेला लागू पडते. दक्षिण अमेरिकेतील ज्या कालखंडाचं वर्णन माया अँजेलू यांनी आपल्या कवितेतून केलं त्याच कालखंडात भारतामध्येही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती. इथंही वर्णव्यवस्थेत जातीपातीच्या नावाखाली दीनदलितांच्या व स्त्रियांच्या दु:खाला आणि हालअपेष्टांना सीमा नव्हती आणि अभिव्यक्तीच्या बाबतीत भारतीय स्त्रिया अजूनही नवा विचार घेऊन निर्भीडपणे लिहित्या झाल्या नव्हत्या.
माझं शांत बसणं
कपाटावर ठेवलेल्या पिशवीसारखं
माझं शरीर मृत आणि दुख-या हाडांचा सांगाडा
हे वर्णन भारतीय स्त्रियांनही तंतोतंत लागू पडते, आणि तितकेच सुधारणावादी म्हणवल्या जाणा-या अमेरिकेतही. म्हणतात ना की, वेदनेला जात नसते, भाषा नसते. (अशा प्रकारची) सर्व बंधनं तोडून वैश्विक जाणिवेची कविता माया अँजेलू यांनी लिहिली, ती कुठल्याही स्त्रीच्या जगण्याची अभिव्यक्ती ठरावी इतकी समर्पक उतरली आहे. भारतीय स्त्रियांच्या साहित्याला अशी अभिव्यक्ती करायला 19वे शतक उगवावं लागलं म्हणून तर अमेरिकन साहित्यविश्वातील एक धारदार आणि गंभीर आवाज म्हणून ज्येष्ठ समीक्षकांनी त्यांच्या साहित्याचं कौतुक केलं आहे.
आफ्रिका खंडाइतकंच मोठं दु:ख तिथल्या कृष्णवर्णीय लोकांच्या जीवनात असून त्यांची (भावनिक, मानसिक) कोंडी बारीकसारीक तपशिलासह अँजेलू यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. हार्लेम स्ट्रीटपासून आफ्रिकेतील निर्मनुष्य समुद्रकिना-याचं दर्शन घडवताना प्रेमविषयक जाणिवेच्या, पराकोटीचं दु:ख, निराशा, एकटेपण, वंशवाद, स्त्रीगौरव, निग्रो परंपरा, अमेरिकन असल्याचा अभिमान व आनंद आणि निराशामय जीवनाचं आशावादी उत्सवी जगण्यात परिवर्तन करण्याचं कसब हे माया अँजेलू यांच्या कवितांचं मर्म आहे. स्वत:वर प्रेम करायला शिकलेली ही कवयित्री जाणिवा प्रगल्भ झाल्यामुळे आपल्या काळेपणावर खूश होते, नृत्य, संगीत, अभिनय आदी कलांच्या माध्यमातून चैतन्यदायी जीवनाची अनुभूती होते, असं बेहद्द आनंदी आयुष्य जगताना गो-या लोकांच्या अरुंद मानसिकतेची खिल्ली उडवायलाही ती विसरत नाही. उपजत विनोदबुद्धीमुळे विषम परिस्थितीलाही उत्सवी स्वरूप देते, म्हणून तिच्या कवितेला आशावादी दृष्टिकोन प्राप्त झाला आहे.
खरं तर तुम्हाला पाहायचं होतं
मी छिन्नविच्छिन्न झालेलं
झुकलेलं डोकं आणि डोळे
अवमानित झालेले गुलामसारखे...
पण असं न होता;
माझा उत्साह त्वेष तुम्हाला अवमानित करतो माझं सौंदर्य तुम्हाला खुपतं?
असे प्रश्न विचारून ती पुन्हा म्हणते
मी काळा महासागर, उचंबळणारा रुंद
फुगणारा आणि हलणारा
भरती ओहोटीसारखा...
प्रचंड आत्मविश्वासाची कविता लिहून कवयित्री आधीच दुख-या समाजवस्थेच्या मानसिकतेवर जणू काही टिचकी मारते आहे. कलेचा जन्म वेदनेतून होतो. याचा प्रत्यय कवयित्रीच्या वैयक्तिक जीवनाची पार्श्वभूमी समजून घेतल्यावर येतो.
आपले विचार, जगणं आणि साहित्य यात कुठलाच भेद न करता पारदर्शिपणे त्याची मांडणी करताना कुठेच झाकपाक न करता ते जसे आहे तसे स्वीकारताना दिसते. आपल्या स्वभावधर्मानुसार घेतलेले निर्णय झालेल्या चुका आणि त्याच्या चांगल्या-वाईट परिणामाची जबाबदारी घेते. त्यामुळेच नवनव्या अनुभवांना प्रकट करणारं साहित्य लोकप्रिय होतं. तिथल्या समाजव्यवस्थेनं स्त्रियांचं ‘माणूसपण’ मोठ्या मनानं स्वीकारलं याचं उदाहरण म्हणजे अल्पशिक्षित असूनही कर्तृत्वाच्या बळावर माया अँजेलू यांना प्रतिष्ठित विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सन्मानाने बोलवतात. त्याचप्रमाणे अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन अध्यक्षपदाची शपथ घेण्याअगोदर अमेरिकेचे गौरवगीत लिहिणा-या माया अँजेलू यांना ते गायनासाठी त्या प्रतिष्ठित राजेशाही दिमाखदार समारंभात आदरपूर्वक आमंत्रित करतात. हा त्या कवीच्या कवित्वाचा गौरव आहे. संघर्षमय आयुष्याचे अनुभव घेऊन स्वबळावर अतिउच्चस्थानी पोहोचलेल्या माया अँजेलू यांचं जगणं आणि कविता म्हणूनच प्रेरणादायी आहे.