आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरवशाली ऐतिहासिक 112 वर्षांचे वाचनालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्वातंत्र्यपूर्व काळात एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन सुरू झालेल्या वाचनालयाने शतकाच्या प्रवासात अनेक संकटांना तोंड देत त्यावर मात केली. स्वातंत्र्यानंतर आणीबाणीतही धैर्याने तोंड देत अस्तित्व टिकविले. त्यातून शासनाचे पाठबळ मिळविताना लोकप्रतिनिधी व वाचकांच्या प्रेमातून भौतिक सुविधा मिळवताना वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न केला. बदलत्या काळाचे तंत्रही अवलंबले. त्यामुळे परभणीचे गणेश वाचनालय आज लौकिकास पात्र ठरले आहे.

सन 1886 मध्ये लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून परभणीतील नानलपेट भागात राहणा-या पेशाने वकील असणा-या व स्वातंत्र्यलढ्यात काम करणा-या मंडळींनी त्या वेळी मराठवाड्यातील पहिल्या वाचनालयाची एका सार्वजनिक रीडिंग रूमच्या स्वरूपात सुरुवात केली. धोंडीराज पत्की, किशनराव उमरीकर, देविदास पेडगावकर, श्रीनिवास बोरीकर, गोविंदराव नानल, नारायण पाथ्रीकर या मंडळींचा त्यात समावेश होता. 1901 मध्ये या रीडिंग रूमचा विस्तार करून गणेश वाचनालय असे नामकरण झाले. अनंतराव मुळावेकर यांच्या वाड्यात वाचनालय सुरू झाले. स्वातंत्र्यपूर्व काळ असल्याने अनेक संकटांतून वाचनालयाला जावे लागले. तरीही अस्तित्वासाठी संघर्ष करत ते सुरू राहिले. वाचनालयाचे सर्व संचालक एक तर तुरुंगात तरी किंवा भूमिगत तरी झाले. तरीही दैनंदिन कारभार गुप्तरीत्या सुरूच राहिला. 1935 मध्ये मुकुंदराव पेडगावकर यांनी नानलपेठ भागातील त्यांची इमारत वाचनालयाला दान दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वाचनालयाचे संचालक हे हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले असल्यामुळे 1945 ते 1948 पर्यंत वाचनालय कधी सुरू तर कधी बंद अशा अवस्थेत होते. 1949 मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी बाबासाहेब परांजपे यांच्या हस्ते वाचनालयाचा पुनरुद्धार सोहळा थाटात साजरा झाला. 1949 ते 1956 पर्यंत केशवराव पत्की यांनी अत्यंत प्रभावीपणे वाचनालय चालवले. मुंबई विश्वस्त कायद्याप्रमाणे वाचनालयाची 19 मे 1964 रोजी नोंदणी करण्यात आली. वाचनालयाचा एकूण कारभार, स्वातंत्र्यसंग्रामातील सहभाग, त्यागीवृत्ती व लोकसेवेची तळमळ पाहून शासनाने वाचनालयाला ब वर्ग प्रदान केला. माजी खासदार रामराव लोणीकर आणि गणपतराव पेडगावकर यांच्या प्रयत्नामुळे नगरपालिकेने शनिवार बाजार मैदानातील 9318 चौरस फुटांचा भूखंड वाचनालयाला दिला.

आणीबाणीच्या काळात (1977 ते 79) संचालक मंडळाचे काही कारणास्तव दुर्लक्ष झाले व वाचनालय परत बंद पडण्याच्या मार्गावर गेले; परंतु प्रतिकुलतेला न घाबरता ग्रंथपाल श्री घन यांनी हे वाचनालय स्वबळावर पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 1980 मध्ये नव्या संचालक मंडळाने वाचनालय ताब्यात घेतले. प. मु. पेडगावकर यांच्या पुढाकाराने हे वाचनालय प्रगतिपथावर आले. याचाच परिणाम म्हणून 1984 मध्ये वाचनालयास जिल्हा ग्रंथालय अ वर्ग दर्जा मिळाला. त्यानंतर मात्र वाचनालयाने मागे वळून पाहिलेच नाही. विकासाचे नवे नवे टप्पे गाठीतच वाचनालयाचे मार्गक्रमण सुरू झाले. पुस्तकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत होती. जुनी इमारत अपुरी पडत होती. ग्रंथालयाचा स्वत:चा 9360 चौरस फुटाचा प्लॉट उपलब्ध होता. संचालक मंडळ निधीसाठी प्रयत्न करू लागले आणि त्यातून 2000 मध्ये या प्रयत्नांना यश आले. आमदार दिवाकर रावते यांनी स्थानिक विकास निधीतून ग्रंथालयास इमारतीसाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामध्ये 1400 चौरस फूट जागेवर इमारत उभी राहिली. 2001 मध्ये वाचनालयाने नव्या वास्तूत प्रवेश केला. चार वर्षानंतर डॉ.श्रीराम मसलेकर यांनी वाचनालयास मदत केल्याने पहिल्या मजल्याचे बांधकाम शक्य झाले. याच दरम्यान 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शासनाकडून पाच लाख रुपयांचे अनुदानही मिळाले. त्यामुळे संगणकीकरणास सुरुवात तर झालीच तसेच पहिल्या मजल्याचे कामही पूर्णत्वाकडे गेले.

62 हजार ग्रंथसंपदा
आजमितीला वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेची जवळजवळ 62 हजार 519 ग्रंथसंख्या आहे. 350 हस्तलिखिते व दुर्मिळ ग्रंथांची संख्या 405 आहे. वाचनालयातून 216 नियतकालिके येतात. वाचनालयाची सभासद संख्या ही 1960 आहे. 276 बालवाचक आहेत. वाचनालयाने सुरू केलेल्या अभ्यासिकेचा लाभ 180 ते 200 विद्यार्थी घेत आहेत. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून दरवर्षी किमान सातशे ते आठशे हिंदी व इंग्रजीची पुस्तके येतात, तर वाचनालय स्वत: बाराशे ते दीड हजार ग्रंथ खरेदी करते. यामुळे जागेची व साधनसामग्रीची कमतरता पडत असताना वाचनालयाचे संचालक अ‍ॅड.अनंत उमरीकर आणि पुरुषोत्तम लाहोटी यांच्या प्रयत्नाने खासदार शरद जोशी यांनी वाचनालयास दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे 1600 चौरस फुटांचे सभागृह उभे राहिले आहे. वाचनालयाने स्वत:ची वेबसाइटही सुरू केली आहे.

विविध उपक्रमांत पुढाकार
जनशक्ती वाचक चळवळ, अभिव्यक्ती परिवार, सावरकर अभ्यास मंडळ व इतर संस्थांच्या सहकार्याने विविध विषयांवरील कार्यक्रम गणेश वाचनालय सातत्याने घेत आहे. वाचनालयाच्या वतीने दर महिन्यास होणारा एक पुस्तक, एक दिवस हा उपक्रम मराठवाड्यात खूपच गाजला. यात गत तीन वर्षांत 46 पुस्तकांवर समीक्षणात्मक चर्चा झाली. बी.रघुनाथ महोत्सवाच्या आयोजनात वाचनालयाचा मोठा पुढाकार असतो.