आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निव्वळ टेरिफिक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॉडफादर ही कादंबरी तुफान खपली आणि फ्रान्सिस फोर्ड कोपोलाने त्यावर तीन चित्रपट बनवले. सात तासांची टीव्ही मालिकाही. या तिन्ही चित्रपटांना मिळून 29 ऑस्कर नामांकने आणि 9 पुरस्कार मिळाले. अल पाचिनोसारखा गुणाढ्य नट यातून गवसला. मार्लन ब्रांडोने केलेली डॉन कोर्लियोनची भूमिका हा हॉलीवूडमधील श्रेष्ठ अभिनयाचा नमुना ठरला...
‘ग्रँडमास्टर’ अभिजित कुंटे यांच्या मते, ‘गॉडफादर’ कादंबरी बुद्धिबळाच्या डावासारखी आहे.’ अर्थातच ती पडद्यावर आणण्याचे आव्हान सोपे नव्हते. चित्रपट शूटिंग सुरू झाल्यावर अनेक माफिया टोळ्यांनी कोपोलाला धमक्या दिल्या. पहिल्याच दृश्यात शेकडो लोकांच्या पार्टीचा सीन आहे. त्याचबरोबर गॉडफादरला एकांतात भेटू पाहणार्‍या आणि त्याचे सहकार्य मागणार्‍या मंडळींचेही दृश्य आहे. एकीकडे पार्टी आणि गोंधळ आणि दुसरीकडे काळोख्या दालनातील या मंडळींचा संवाद यातून दिग्दर्शक एक विरोध (contrast) निर्माण करतो. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात एकीकडे चर्चमध्ये बाप्तिस्मा चालू असतो, तर दुसरीकडे कोर्लियोन कुटुंबाचे गुंड प्रतिस्पर्धी टोळ्यांचा खात्मा करत असतात. मायकेल कोर्लियोन हा देशासाठी लढणारा एक सैनिक असतो; पण डॉन कोर्लियोन म्हणजे वडलांवर झालेल्या हल्ल्याने पेटून तो सूडभावनेने पोलिस अधिकार्‍याला ठार करतो आणि इटलीतल्या माफियांची राजधानी समजल्या जाणार्‍या सिसिली शहरात जाऊन लपतो. देशप्रेमी तरुणाचे पाहता पाहता गुंडात रूपांतर होते.
खरे तर मारधाड, खूनखराबा आणि सुडाचे कथानक असलेल्या कथा-कादंबर्‍या आणि चित्रपट यांची संख्या कमी नव्हती, पण गॉडफादरमध्ये काहीतरी वेगळे होते. एक म्हणजे, कुटुंबसंस्था आणि तिला धरून राहण्याची सिसिलियन वृत्ती आणि आग्रह. दुसरीकडे गुंड टोळ्यांमध्ये रुजलेली नैतिकता. उदाहरणार्थ - शब्द पाळणे, शरण आलेल्याला अभय देणे अशी मूल्ये. पण विरोधाभास हा ‘गॉडफादर’च्या कथेचा आत्मा आहे. प्रबळ सामर्थ्यवान गॉडफादर गोळ्या लागून रस्त्यावर पडतो, पण दवाखान्यात त्याचे संरक्षण काढून घेतले जाते आणि तो गुंडांकडून मारला जाण्याची शक्यता संभवते. (पण वेळेत मायकेल तिथे पोहोचल्याने ते टळते) सोनीसारखा ताकदवान आणि रागीट पुत्र मशीनगनच्या गोळ्यांना बळी पडतो तेव्हा डॉन उद्गारतो, ‘माझ्या मुलाचे त्यांनी काय केले ते पाहा.’ बाप्तिस्मा आणि खून, सैनिक आणि गुंड, सामर्थ्य आणि हतबलता, उजेड आणि अंधार अशा विरोधाभासांच्या जोड्या चित्रपटभर यात दिसतात...
1930 च्या दशकात एडवर्ड हॉपर या चित्रकाराने माणसाचा एकाकीपणा अधोरेखित करणारी अनेक चित्रे केली. प्रामुख्याने एक किंवा दोन आकृत्या हॉटेल किंवा रूममध्ये बसलेली आणि वरून प्रखर उजेड आणि खोलीत इतरत्र अंधार अशी त्याची रचना असे. या प्रकारची सिनेमॅटोग्राफी ‘गॉडफादर’च्या तिन्ही भागात दिसते. (गोर्डन विल्स यांची) चेहर्‍याइतका हातावर उजेडाचा तुकडा वापरणे, हे याचे वैशिष्ट्य तिसर्‍या भागात अधिक करून दिसते.
1950 नंतर युरोप-अमेरिकेत काउंटर कल्चर नावाने जी युद्धोत्तर संस्कृती आली, त्यात कुटुंब व्यवस्थेला हादरे बसत होते. मुक्त जगण्याचे आश्वासन सगळ्यांना हवे होते. शासन संस्था, कायदा, पोलिस, न्यायसंस्था अशा परंपरागत संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडत होता. दुसरीकडे योग, ज्ञान, नवे महर्षी, जगण्याची पौर्वात्य पद्धत या गोष्टींकडे जगाचे लक्ष अधिक लागले होते. ‘गॉडफादर’मध्ये पर्यायी शासन संस्था, पौर्वात्य वाटणारी कुटुंबरचना या गोष्टी नेमकेपणाने आल्या होत्या. बुद्धिचातुर्य हा घटक सस्पेन्स चित्रपटात महत्त्वाचा ठरतो, तोही इथे आहे. मायकेलची प्रेयसी वकील टॉम हेगनला विचारते की, मायकेल कुठे आहे? तेव्हा टॉम म्हणतो, ‘माहीत नाही.’ त्यावर ती म्हणते, ‘हे पत्र मायकेलला देशील का?’ टॉम म्हणतो, ‘मी जर हे स्वीकारले, तर असे कोर्टात सिद्ध होईल की, मला मायकेलचा पत्ता माहीत आहे.’
‘गॉडफादर’ चित्रपटातील सर्वात यशस्वी गोष्ट म्हणजे कास्टिंग! यातील डॉन, मायकेल, सोनी, क्लेमेंझा हे सारे खरेखुरे वाटतात. शेवटी एकाच दिवसात सर्व प्रमुख विरोधकांचा काटा काढायचा, ही खेळी बुद्धिबळाच्या गुंतागुंतीच्या ‘मिडलगेम’सारखी आहे. प्रतिस्पर्धी जोरकस आहे, एखादी फट शोधून त्याच्यावर मात करता येते, पण खेळ्यांचा क्रम नीट हवा. अर्थात, डॉनचे थंडपणे युक्तिवाद करणे आणि सर्वांना गप्प बसवणे किंवा बुद्धिचातुर्य वापरून तोडगे काढणे हे हळूहळू मायकेलमध्ये संक्रमित होते. पण हिंसाचारावर आधारलेली ही जीवनपद्धती मायकेलला एकाकी करून सोडते. तिसर्‍या भागात या शोकांतिकेपर्यंत कोपोला आपल्याला पोहोचवतो आणि याच भागातील कामाबद्दल अल पचिनोला हुलकावणी देत असलेले ऑस्करही मिळून जाते...
shashibooks@gmail.com