आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन भरवणारे सुवर्णमहोत्सवी मंडळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी उपपंतप्रधान (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते जून 1960 मध्ये झाली. याच वेळी विविध विभाग सुरू झाले. त्यात मराठी विभाग अग्रेसर होता. मराठी विभागाला त्या वेळी प्रा. कृ. रा. सावंत, प्रा. क. दि. भगवान, डॉ. सुहासिनी इर्लेकर यांच्यासारखे विभागप्रमुख लाभले. डॉ. प्रभाकर मांडेही काही काळ या महाविद्यालयातील मराठी विभागात होते.


मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना प्रथम प्राचार्य क. दि. भगवान यांनी 1965 मध्ये केली. त्यानंतर डॉ. सुहासिनी इर्लेकर यांनी वाङ्मय मंडळाचे काम गतिमान केले. त्या वेळीच डॉ. प्रकाश मेदककर हे वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष होते. मराठी वाङ्मय मंडळाद्वारे काव्यवाचन, कथाकथन या स्पर्धा होत असत. वाङ्मय मंडळाचा अध्यक्ष निबंध स्पर्धेतून निवडला जाई. ती निवड एखादा साहित्यिक करीत असे. 1974-75 मध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी निबंध निवडून अध्यक्ष निवडला. त्या वेळी ‘झाळंबती जलधारा’ हा विषय ठेवला होता. विद्यासागर पाटांगणकर यांना मराठी वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षाचा बहुमान मिळाला होता.


वाङ्मय मंडळाची अभिरुची समृद्ध करून वाङ्मय निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे काम मंडळाने केले आहे. मराठी वाङ्मय मंडळाद्वारे चर्चा, परिसंवाद, नाट्य अभिवाचन, काव्यसंमेलन, कथाकथन हे उपक्रम राबवले जात. महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात त्यांचा समावेश असे. मराठी वाङ्मय मंडळाचा अध्यक्ष विद्यार्थी संपादक म्हणून काम करीत असे. मंडळ वर्षभर विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांत भाषेची गोडी वाढवणे, भाषेतील उत्तमोत्तम कलाकृतींवर चर्चा घडवणे हे कार्यक्रम सातत्याने करीत असे. आजही अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जात आहेत. महाविद्यालयातून वार्षिक अंक सातत्याने प्रसिद्ध करण्यात येत असे. त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभाशक्ती, विचारशक्ती, लेखन, चिंतनक्षमतेचा सहज विकास घडवून आणला जाई. याचबरोबर भीत्तिपत्रकाचे प्रकाशनही सातत्याने होत असे. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुहासिनी इर्लेकर, प्रा. अरविंद थेटे यांनी वाङ्मय मंडळ विकसित केले.


विद्यार्थ्यांची जडणघडण
मराठी वाङ्मय मंडळाद्वारे अनेक विद्यार्थी पुढे साहित्यिक म्हणून नावारूपास आले. त्यात प्रा. एकनाथ आबूज (कथाकार), डॉ. प्रकाश मेदककर (समीक्षक), प्रा. प्रदीप देशपांडे (अनुवादकार, समीक्षक), डॉ. अनंत चिटगोपेकर, डॉ. कांचन पाडगावकर (कवयित्री), डॉ. विद्यासागर पाटांगणकर (समीक्षक, कवी), उत्तम बावसकर , अर्जुन व्हटकर (कथाकार) आदी साहित्यिक, लेखक घडवले आहेत.


साहित्य संमेलने
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मधुकर मुळे यांच्या प्रेरणेने मंडळाचे दुसरे मराठी साहित्य संमेलन महाविद्यालयात घेण्यात आले. त्याचे उद्घाटन तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते आणि प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली झाले. मराठी वाङ्मय मंडळाचे उपक्रम सध्याही चालू आहेत. प्राचार्य वसंत सानप यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. विद्यासागर पाटांगणकर व त्यांचे सहकारी काम करत आहेत.