आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Golden Jublee Celebrating Shankar Marathi Library In Hyderabad

हैदराबादेतील अमृतमहोत्सवी शंकर मराठी वाचनालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनाच्या वाटचालीत ग्रंथ हेच आपले मित्र, मार्गदर्शक किंवा गुरू असतात. याच विचारांनी प्रभावित होऊन राजे रायरायान भालेराव घराण्यातील श्रीमत‌ शंकर राजा भालेराव यांनी 1937 मध्ये जुन्या हैदराबाद शहरातील मराठी समाजाच्या, उत्थानासाठी आपल्या गंगाधरराव माडीवाले, रघुनाथराव मनसबदार, श्री रामलू, मधुकर बक्षी आणि मुरलीधरराव या आपल्‌या सवंगड्यांना बरोबर घेऊन लाल दरवाजा रोड, शहा-अली-बंडा याठिकाणी स्वत: च्या मालकीच्या जागेत शंकर वाचनालयाची स्थापना केली. 1937 मध्ये स्थापन झालेली ही संस्था अनेक अडचणींना सामोरे जात यशस्वीरीत्या वाटचाल करीत अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. महोत्सवाची सांगता 17 मार्च 2013 रोजी होत आहे, या त्यानिमित्त हा विशेष लेख.

व्यक्ती व समाजाची बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक वाढ होणे समाजाला नितांत गरज आहे व त्यासाठी वाचनालय हे चांगले केंद्र ठरू शकेल, असा विश्वास शंकर वाचनालयाच्या स्थापनेमागे होता. काळाच्या ओघात अनेक स्थित्यंतरे घडली. सवंगडी विखुरले, ‘शंकर वाचनालय’ पाटीपुरतेच राहिले. काळाच्या पडद्याआड जाईल किंवा काय? अशा संभ्रमावस्थेत असताना स्थानिक वैदिक धर्म प्रकाशिका प्रशाळेतील एक शिक्षक, वामनराव टाकळीकर यांनी शंकर वाचनालयाची सूत्रे आपल्या हाती घेतली. आपले परिचित, स्नेही यांना सहकार्याचे आवाहन केले. चहुबाजूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वत: घरोघर जाऊन ‘फिरते मासिक योजना’ यशस्वीपणे राबविली. दुर्मिळ पोथ्या, पुस्तके जमविली. कोमेजणा-या रोपाला संजीवनी मिळाली. वाचनालयाची वाटचाल जोमात सुरू झाली. राजेरायरायान व कै. धुंडिराज बहादूर यांच्या कृपाशीर्वादाने 1967-68 पासून वाचनालयास सरकारी अनुदान मिळणे सुरू झाले. शंकर वाचनालयास’ स्थैर्य आले. दुर्मिळ पोथ्यासोबत पुस्तकांच्या संख्येत क्रमाक्रमाने भर पडत गेली.


मौल्यवान पोथी व ग्रंथसंग्रह
1971-72 पासून हैदराबाद सिटी ग्रंथालय संस्था व डायरेक्टरऑफ पब्लिक लायब्ररीज अशा दोन निमसरकारी खात्याकडून सातत्याने अपुरे का होईना पण अनुदान मिळत गेले. दरवर्षी रीतसर तपासणी होते. चार्टर्ड अकाउंटंटकडून हिशेब तपासला जातो व सादर केला जातो. सध्या वाचनालयात 4800 मराठी पुस्तके (मौल्यवान पोथी व ग्रंथासह) आहेत. 30-35 नियतकालिके मागविली जातात. मराठी, हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रे मागविली जातात. एकूण सभासदांची संख्या 60 आहे.


स्वत:ची वास्तू नसल्याची खंत कार्यकारिणीला आहे, तरीही अनेक अडचणींना तोंड देत शंकर वाचनालयाने 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदा अमृतमहोत्सव साजरा होत असून स्वत:ची वास्तू उभी करण्यासाठी नवीन प्रकल्प हाती घेण्याचा संकल्प कार्यकारिणीने केला आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे इथला समाज सहकार्याचा हात पुढे करण्यास तत्पर असल्याची खात्री आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘शंकर वाचनालयाच्या’ सर्व जुन्या कार्यकर्त्यांचे स्मरण करण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा योग जुळून येत आहे हेही विशेष.