आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तनपानाबाबतचे समज अन् गैरसमज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळासाठी आईचे दूध सर्वोत्तमच
जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला स्तनपानाव्यतिरिक्त इतर कोणताही पदार्थ देणे अयोग्य आहे. तसेच सहा महिन्यांनंतरसुद्धा इतर आहाराबरोबर कमीत कमी दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत आईचे दूध देत राहणे आवश्यक आहे. स्तनपानामुळे बाळाला योग्य अन्नसाठ्याबरोबरच रोगप्रतिकारकशक्ती मिळते. त्याचप्रमाणे डायरिया व श्वसनमार्गाचे आजारही कमी होतात. कमी स्तनपान व बाटलीने दूध पाजण्याच्या घातक सवयीमुळे बाळाची योग्य वाढ होत नाही. तसेच बाळ नेहमी आजारी पडते. स्तनपानामुळेच बाळाचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास उत्तम प्रकारे होऊन आई व बाळात आपुलकीचे नाते निर्माण होते. स्तनपानामुळे मातेलासुद्धा अनेक फायदे मिळतात. अ‍ॅनेमिया (रक्त कमी होणे) टळून स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता खूप कमी होते.
स्तनपानाची सुरुवात
बाळ जन्मल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात त्याला आईच्या कुशीत ठेवावे व दूध ओढू लागल्यावर लगेच स्तनपान द्यावे. कारण पहिल्या 30 ते 60 मिनिटांत बाळ सतर्क असते व दूध ओढण्याची क्षमता या कालावधीत चांगली असते. निव्वळ स्तनपानाचे यश त्यामुळे वाढते. प्रसूतीनंतर आईला होणारा रक्तस्राव कमी होतो. तसेच स्तनांतून येणा-या पहिल्या घट्ट व पिवळ्या दुधा (कोलोरट्रम)च्या प्राशनाने जंतुप्रादुर्भावापासून बाळाचे संरक्षण होते.
पहिल्या सहा महिन्यांत फक्त स्तनपान देणे
उन्हाळ्यातसुद्धा पाणी पाजणे अनावश्यक असून, त्यामुळे बाळाची दूध ओढण्याची इच्छा कमी होते व जंतुप्रादुर्भाव होण्याचाही धोका असतो. इतर वरचे काही देण्यानेसुद्धा स्तनपानाचे यश कमी होते. बाळ पहिल्या सहा महिन्यांत फक्त आईच्या दुधावरच उत्तमरीत्या वाढते. तसेच त्याच्या बुद्धीची वाढही चांगल्या प्रकारे होते. जंतुप्रादुर्भाव, दमा, अ‍ॅलर्जी व इसब यापासून संरक्षण मिळते. याशिवाय दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी मदत होऊन स्त्रीला पाळणा लांबवण्यासाठी स्तनपानामुळे 98 टक्के संरक्षण मिळते.
प्रथम स्तनपानापूर्वी जुन्या पद्धतीनुसार बाळाला दिले जाणारे पेय हे अनावश्यक व चूक आहे. कारण जुन्या प्रथेनुसार प्रथम स्तनपानापूर्वी साखरपाणी किंवा मध इत्यादी दिल्याने बाळ आजारी पडते. तसेच त्याची स्तनपानाची इच्छा कमी होऊन स्तनपानाचे यश कमी होते. चोखणीमुळे स्तनपानात व्यत्यय येतो. कारण रबराची बोंडी आणि स्तन पूर्णत: वेगळे असल्याने स्तनाग्रांबाबत संभ्रम निर्माण होतो.
स्तनपानासाठी योग्य (शारीरिक) स्थिती
आईने बाळाला सुखावह वाटेल अशा स्थितीत म्हणजेच झोपून अगर बसून त्याच्याशी संवाद साधत स्तनपान द्यावे.
स्तनपानासाठी वारंवारता आणि मागणीनुसार स्तनपान
बाळाला त्याच्या मागणीनुसार वारंवार स्तनपान (24 तासांमध्ये 8 ते 10 वेळा किंवा त्याहून जास्त) द्यावे. एका वेळेस शक्यतो एका बाजूला पूर्ण पाजावे. कारण सुरुवातीला येणारे दूध पातळ असते. त्यामुळे तहान भागते. त्यात साखर आणि प्रथिने असतात. नंतर दाट दूध येऊ लागते. त्यात स्निग्धांश असतात, जे बाळाची भूक भागवतात. जुळी मुले असलेल्या महिलेलाही स्तनपानासाठी पुरेसे दूध असते. आईने बाळाला वरचेवर किंवा मागणीनुसार रात्रीसुद्धा स्तनपान द्यावे.
पूरक आहार
चार ते सहा महिन्यांनंतर बाळाच्या वाढीसाठी आईचे दूध अपुरे पडते. त्यामुळे आईच्या दुधाला जोड म्हणून घरगुती अन्नपदार्थ बाळाला देण्याची गरज भासते. या अन्नपदार्थांना ‘पूरक अन्न’ असे म्हणतात.
1) पूरक अन्नाची सुरुवात : सहा महिन्यांचे झाल्यानंतर बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त पूरक अन्न देण्याची सुरुवात करणे गरजेचे आहे. बाळाला सहा महिन्यांच्या आत पूरक अन्नाची आवश्यकता नसते. कारण आईचे दूध बाळाच्या वाढीसाठी पुरे असते; मात्र पूरक अन्न देण्याची सुरुवात उशिरा केल्याने कुपोषण होऊन बाळाचे वजनही कमी होते.
2) पूरक अन्नाची वारंवारता : बाळ 6 ते 9 महिन्यांचे असताना त्याला दिवसातून 2 ते 3 वेळा व 9 ते 12 महिन्यांचे असताना दिवसातून 3 ते 5 वेळा पूरक अन्न द्यावे.
3) पूरक अन्न कसे द्यावे? : मातेने वाटी-चमच्याने बाळाला खायला द्यावे.
स्तनपान किती वर्षांपर्यंत द्यावे?
एक ते दीड वर्षापर्यंत पूरक अन्नाबरोबर स्तनपान सुरू ठेवावे. कारण या प्रकारे बाळाला पुरेसे उष्मांक मिळतात. त्यामुळे कुपोषण व जंतुप्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होतो व भावनिक बंध वाढण्यास मदत मिळते.
माता घराबाहेर काम करत असल्यास
कामासाठी घराबाहेर जाणारी मातासुद्धा जमेल तेवढे स्तनपान सुरू ठेवू शकते. तसेच माता कामावर जाऊ शकते आणि बाळाला स्तनपानही देऊ शकते. जेव्हा बाळ तिच्याजवळ नसते त्या वेळी काढलेले दूध त्याला द्यावे. कामावर जाण्यापूर्वी, कामावरून आल्यावर व रात्री बाळाला स्तनपान द्यावे.
घराबाहेर काम करणा-या महिलांसाठी काही पर्याय
1) तिने हाताने दूध काढावे व ते स्वच्छ डब्यात ठेवावे. हे दूध फ्रीजमध्ये ठेवल्यास 8 तास खराब होत नाही. तसेच बाळाला सांभाळणा-यांनी हे काढलेले दूध वाटी-चमच्याने द्यावे.
2) घर कामाच्या ठिकाणापासून जवळ असल्यास आईने स्तनपानासाठी थोडा वेळ घरी येऊन बाळाला दूध पाजावे.
आई किंवा बाळ आजारी असल्यास
आई किंवा बाळाला साधारण आजारपण असेल तरी स्तनपान देणे चालूच ठेवावे. जुलाब होणा-या बाळाला स्तनपान खूप उपयुक्त ठरते. आई आजारी असल्यास डॉक्टरांनी सल्ला दिल्याशिवाय स्तनपान थांबवू नये. अपु-या दिवसांच्या व जन्मत:च कमी वजन असणा-या बाळांसाठी आईचे दूध अतिशय आवश्यक असते. जी बाळे दूध ओढू शकत नाहीत, त्यांना काढून ठेवलेले दूध कपाने किंवा वाटी-चमच्याने पाजावे. काही विशेष परिस्थितीत म्हणजे बाळ दत्तक घेतले असल्यास त्याला सांभाळणा-यांनी दुग्धपानाच्या पर्यायांबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी.
योग्य पूरक आहार
सहा महिन्यांहून मोठ्या बाळांना पुरेसे पोषक व त्यांना पुरेल एवढे ताजे, घरात शिजवलेले अन्न द्यावे. तसेच अन्न शिजवताना स्वच्छता बाळगावी. घरातील मंडळी जे अन्न खातात तेच अन्न मुलांना सर्वात योग्य. बालान्नाचे तयार डबे टाळावेत. वरचे दूध वाटी-चमच्याने पाजावे. त्यात आणखी पाणी घालण्याची गरज नसते. कारण दूध गरम करून मलई काढल्यानंतर त्यातील जास्तीचे फॅट निघून ते पातळच असते. बाकी अन्नपदार्थ सुरू करताना साधारणत: एका आठवड्यास एक असे करावे. सुरुवातीस बाळाला पातळ पदार्थ गिळणे व पचवणे सोपे जाते. जसे भाताची पेज, वरणाचे पाणी, भाज्यांचे पाणी, भाज्यांचे सूप, खीर, फळांचा रस, दूध + बिस्किट, दूध + फळे, मऊ पदार्थ म्हणजे उकळलेला बटाटा, मऊ केळी, मऊ भात, खिचडी, चिक्कू, सफरचंद, वरणपोळीचा काला, अंड्याचा पिवळा भाग द्यावेत, जेणेकरून एक वर्षाचे बाळ आईच्या ताटातील अन्नपदार्थ खाईल.