आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगली माणसे आणि राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या मुलांच्या शिबिरांपैकी एका शिबिराला उपस्थित राहण्याचा प्रसंग नुकताच आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी एक ज्येष्ठ वकील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिबिरातील मुलांनी एक गीत सादर केले. ‘ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के।’ असे गाण्याचे बोल होते. शेवटच्या टप्प्यात वकील महोदयांनी अध्यक्षीय भाषणाला सुरुवात केली तीच मुळी या ओळीने. उपस्थित शिबिरार्थी मुला-मुलींना ते म्हणाले, ‘मुलांनो, हा देश तुमचा आहे हे खरं; पण तुम्ही उद्याचे नेते बनू नका. काहीही बना; पण नेते नको. या देशात सर्वात वाईट कोणी असतील, तर ते नेते. म्हणून तुम्ही त्या वाटेलाही फिरकू नका.’

अत्यंत प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या या वकील आजोबांनी उपस्थित नातवांना दिलेला हा सल्ला ऐकून मी तर थक्क झालो. शिबिराला आलेली ही मुले हुशार होती. स्मार्ट होती. यांनी किंवा यांच्यापैकी कोणी उद्या देशाचा नेता व्हायचे नाही तर कोणी व्हायचे? या प्रश्नाने मला अस्वस्थ केले. ही अस्वस्थता व्यक्त करायची संधी तिथे मिळाली नाही खरी; पण हा विषय याच मुलांसमोर कधीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून मांडायचा, असे मी ठरवले आहे.

राजकारण हे चांगल्या माणसांचे काम नाही, ही धारणा सर्वसामान्य नागरिक बाळगून असतील, तर एक वेळ समजू शकते; पण समाजातील विविध घटकांना जवळून पाहणारे, घटना आणि घडामोडींचे सामाजिक आणि अन्य कसोट्यांवर विश्लेषण करू शकणारे घटकही जर अशाच धारणा बाळगून असतील, तर या देशाचे पुढे काय होणार आहे? हा प्रश्न मला नेहमीच अस्वस्थ करत आला आहे. राजकारण्यांना, राजकारणाला वाईट आणि नालायक ठरवण्याची फॅशन आली आहे, असे एक राजकीय नेते नेहमीच म्हणतात. तशी फॅशन खरेच आली आहे की नाही, हा मुद्दा वेगळा; पण राजकारण आणि राजकारणी म्हणजे वाईटच, अशी सर्वसामान्यांची धारणा नक्कीच झाली आहे. त्यातूनच राजकारण, निवडणूक हे चांगल्या माणसांचे काम नाहीच, अशीही पक्की समजूत या वर्गाने करून घेतली आहे. त्यामुळेच हे क्षेत्र दिवसेंदिवस अधिक ‘वाईट’ सिद्ध होत चाललेय. फळ्यावर काढलेली एक रेषा न पुसता, लहान करण्याचे गुरुजींकडून शाळेत मिळालेले आव्हान त्या वेळी पेलले नव्हते खरे; पण त्या प्रयोगानेच एक दृष्टिकोन दिला आहे. वाईटाचा प्रभाव कमी करायचा असेल तर चांगल्याचा प्रभाव वाढवला पाहिजे. राजकारणाचेही तसेच आहे. राजकारण हे क्षेत्र वाईट लोकांच्या प्रभावाखाली गेले असेल तर चांगल्या लोकांचा प्रभाव वाढवला पाहिजे. चांगली माणसे राजकारणात आल्याशिवाय तिथली वाईट माणसे कमी होणार आहेत का? पण वाईटापासून, अर्थात राजकारण आणि राजकारणी यांच्यापासून चांगल्या माणसांना लांब राहायचे सांगताना आपण या देशाच्या भवितव्याला आणखी अंधारात आणि खोलात ढकलत आहोत, हे भल्याभल्यांच्या लक्षात येत नाही.

राजकारणाकडे चांगल्या माणसांनी ढुंकूनही पाहायचे नसेल, तर वाईट माणसांसाठी तर हा मार्ग सोपाच होत जाणार. सत्ता आणि संपत्ती सहज मिळवणे शक्य असताना वाईट प्रवृत्तीची माणसे तर तिकडे आकर्षित होणारच. किंबहुना, ते तिकडे वळले नाहीत तरच आश्चर्य मानायला हवे. तसे घडले की आपण चांगल्या माणसांना तिथून आणखी लांब जायला सांगणार आणि वाईटांचा मार्ग आणखी सोपा आणि प्रशस्त करून देणार, हेच सध्या सुरू आहे. यात दोष कोणाला द्यायचा? ज्यांनी या क्षेत्रापासून चांगल्या माणसांना दूर ठेवण्याचे जाणते-अजाणतेपणी काम केले तेच दोषी आहेत, हे उघड आहे. युद्ध सैनिक लढतात आणि जिंकल्याचे श्रेय जाते सेनापतींकडे. खरे तर भारतासारख्या लोकशाही प्रबळ असलेल्या देशात युद्धाचे यशापयश थेट देशाच्या नेतृत्वाशी जोडले जाते, हे आपण पाहत आलो आहोत. पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशाची निर्मिती करण्याचे श्रेय सार्‍या देशाने त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दिले. फार लांबचे उदाहरण घ्यायला नको. कारगिल युद्धाच्या वेळी कोण सेनापती होते, हे किती भारतीयांना आज आठवत असेल, हे सांगता यायचे नाही; पण अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताने त्या युद्धात पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला, हे कोणालाही विसरता येत नाही. हे श्रेय उगाच मिळते का? जर शत्रुराष्टÑाशी लढण्यासाठी सैन्यात दाखल होणार्‍या मुलांचा अभिमान बाळगला जात असेल तर त्या युद्धाचा निर्णय घेणार्‍या, त्याची रणनीती ठरवणार्‍या आणि यशापयशाशी जवळचा संबंध असणार्‍या राजकीय क्षेत्राला आपण अस्पृश्य का मानायचे? भ्रष्टाचार, वाईट प्रवृत्ती या केवळ राजकारणातच शिरल्या आहेत, असे आहे का? ज्या सैन्यात जाण्याचा अभिमान बाळगला जातो, त्या सैन्यदलात आता किती ‘दलदल’ झाली आहे, हे इथे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी महिन्या-दोन महिन्यांपासूनची वृत्तपत्रे काढून एकदा ती चाळून घेतली, तरी सारे काही स्पष्ट होऊ शकेल. अर्थात, राजकारणातल्या भ्रष्टाचाराचे हे समर्थन नाही. उलट हा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठीच तिथे चांगल्या माणसांची अधिक गरज आहे, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आता राजकारणात चांगली माणसे निवडून येणे अशक्य, असे राजकारणाला वाईट ठरवून वाळीत टाकू इच्छिणारी मंडळी म्हणत असते. हे खरे आहे की आपल्या व्यवस्थेतील ‘निवडणूक’ सहज, सोपी राहिलेली नाही. पण याचा अर्थ असाही नाही की, चांगल्या माणसांना निवडून येणे आता अशक्यच आहे. अर्थात, चांगली माणसे म्हणजे कोणती माणसे? कोणाला आपण चांगले म्हणायचे आणि कोणाला वाईट? हे आधी स्पष्ट असायला हवे. त्यातच स्पष्टता नसेल तर समजुतीचा गोंधळ वाढत जाईल, जे सध्या आपल्या समाजाचे झालेय. ‘चंद्र्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन। ते सर्वही सदा सज्जन...’ अशी सज्जन माणसाची व्याख्या संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात सहजपणे सांगून ठेवली आहे. कसा असतो सज्जन अर्थात चांगला माणूस? ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे, तर तो चंद्रासारखा शीतल असतो; पण त्याच्यावर कोणतेही लांछन नसते. चंद्रावर असलेल्या डागापासून हा भूतलावरचा चंद्र मुक्त असतो. हा सूर्यासारखा परोपकारी असतो; पण सूर्यासारखा ताप, उष्णता त्याच्या ठायी नसते, असेही ज्ञानेश्वर सांगून गेले आहेत. अर्थात, ही झाली चांगल्या माणसाची अलंकृत व्याख्या. त्यात आजच्या पार्श्वभूमीवर स्पष्टता आणायची असेल, तर ही संकल्पना आणखी सोपी करायला हवी. राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने मतदारांसाठी चांगला माणूस किंवा चांगला उमेदवार कोणता, हे आपण पुढच्या लेखात पाहू.
(deepakpatwe@gmail.com)