आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणातला चांगुलपणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात चांगुलपणा शिल्लक तरी राहिला आहे का हो, असा प्रश्न हमखास विचारला जातो. विशेषत: त्या वेळी, जेव्हा चांगल्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे, असा मुद्दा उपस्थित केला जातो. अर्थात, या प्रश्नाचं उत्तर तो विचारणा-याला नकोच असतं. कारण त्याच्या प्रश्नातच त्याचं ठाम नकारार्थी उत्तरही दडलेलं असतं. ज्याला प्रश्न विचारला जातो त्याच्याकडेही होकारार्थी उत्तर नाहीच, असंच बहुतेक वेळा असा प्रश्न विचारणा-यांनी गृहीत धरलेलं असतं, नव्हे; ती त्यांची खात्रीच असते. त्यातूनच ‘तुम्ही काहीही बना; पण उद्याचे नेते बनू नका’, असा सल्ला सहज दिला जातो.


राजकारणात चांगुलपणा शिल्लक राहिलेला नाही, या मताचं सार्वत्रिकीकरण होण्याचं काय कारण असावं? ‘चांगुलपणा’च्या संकल्पनेबाबत असलेली व्यक्तिसापेक्षता त्याला जबाबदार आहे का? आपल्याकडे अनेक संकल्पनांना ‘बॉर्डर लाइन’च नसते. म्हणजे जो तो आपल्या सोयीने आणि विचार करण्याच्या क्षमतेनुसार त्या संकल्पनांचा विस्तार करू शकतो. उदाहरणार्थ, भारतीयांच्या मनातील- अर्थात आस्तिक भारतीयांच्या मनातील देवाबाबतची संकल्पना घेऊ. जो जसा विचार करेल, देव त्याच्या दृष्टीने तसा असेल. चांगुलपणा या संकल्पनेचेही तसेच आहे. आधी या संकल्पनेवर विश्वास असायला हवा आणि तोही अंधविश्वासाकडे झुकणार नाही, इतपतच असायला हवा. कारण चांगुलपणा मोजण्याचे कोणतेही सर्वमान्य मापक नाही. मागच्या लेखात पसायदानातली सज्जन माणसाची ज्ञानेश्वरांनी केलेली ‘व्याख्या’ आपण पाहिली; पण तीही म्हटलं तर अतिशयोक्तीकडे जाणारी आहे आणि म्हणून संदिग्ध आहे. अर्थात, आपल्याला इतक्या खोलात शिरायचं नाही. आपल्या दृष्टीने राजकारणासाठी ‘चांगला माणूस’ कोण असू शकतो, एवढंच महत्त्वाचं आहे.


सर्वसामान्यांना राजकारणात अपेक्षित असलेली ‘चांगली माणसं’ आणि त्यांच्या अवतीभोवती त्यांना दिसणारी राजकारणातली माणसं यांच्यात दरी असल्यामुळे नकारात्मक भावनेचं सार्वत्रिकीकरण झालं आहे, असं म्हणता येईल. असं असलं तरी आज राजकारणात असलेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारा, तो स्वत:ला ‘चांगला माणूस’ याच सदरात बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण तो मनुष्यस्वभाव आहे. ‘दुस-याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं; पण स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही’ ही म्हण काही उगाच बनलेली नाही. अर्थात, ही झाली राजकारण्यांची बाजू. त्यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करणा-यांचंही तसंच असतं. एकाच घरात राहणारे दोन सख्खे भाऊ ब-याचदा एकमेकांना चांगलं म्हणत नाहीत, असं आपण पाहत असतो. कारण काय? तर न संपणा-या अपेक्षा. या न संपणा-या अपेक्षांच्या पूर्ततेला जिथे अडथळा येतो, तिथे चांगुलपणा संपल्याच्या भावनेचा उगम होतो. म्हणूनच चांगुलपणाच्या संकल्पनेला ‘बॉर्डर लाइन’ असली पाहिजे. ‘माणसं चांगली असतात हो, हे राजकारणच वाईट. चांगल्या माणसाला तिथे गेल्यावर वाईट व्हावंच लागतं,’ असं म्हणणारेही नेहमीच भेटतात. कारण राजकारणात जाण्यापूर्वी एखादा माणूस लोकांच्या दृष्टीने खूप चांगला असतो; पण राजकारणी झाल्यावर तोच ‘वाईट’ कामं करताना, भ्रष्टाचार करताना त्यांना दिसतो. व. पु. काळे यांनी त्यांच्या एका कथेत ‘पापभीरू’ माणसाची उपरोधिक व्याख्या केली आहे. ‘पाप करायची भीती वाटते म्हणून जो पाप करत नाही तो पापभीरू’ असं ते म्हणतात. चांगल्या माणसांच्या बाबतीतही अनेकदा असंच होतं. वाईट कृत्य करण्याची शक्ती नसते किंवा संधी मिळत नाही म्हणून ज्यांच्या नावावर वाईट कृत्यं नोंदली जात नाहीत, त्यांना समाज ‘चांगली व्यक्ती’ म्हणून ओळखत असतो. तीच व्यक्ती राजकारणात गेल्यावर तिला पदाची, अधिकारांची ताकद मिळते आणि संधी चालून येते. त्या संधीचं ती व्यक्ती ‘सोनं’ करते आणि म्हणते, ‘राजकारणच वाईट. तिथे गेल्यावर हे करावंच लागतं.’ आपणही मग तसाच विचार करायला लागतो.


‘शक्ती आणि संधी मिळूनही ज्यांना वाईटाचा मोह होत नाही, अशा माणसांना ‘चांगली माणसं’ म्हणून ओळखावं’, अशी चांगल्या माणसांची एक सर्वसाधारण व्याख्या करता येईल. आणखी स्पष्टीकरण करायचं झालं, तर सार्वजनिक पैशातून सार्वजनिक कामं करायला देताना त्या ‘देण्याच्या’ मोबदल्यात स्वत:कडे काही ‘घेण्याचा’ मोह ज्यांना होत नाही, त्यांना आपण चांगला माणूस किंवा चांगली व्यक्ती म्हणून ओळखू शकतो. हातात आलेल्या सत्तेच्या माध्यमातून कोणाचं भलं करताना त्या व्यक्तीने आपलंही भलं करून द्यावं, किमान आपल्या काही इच्छा, वासनांची पूर्ती करून द्यावी, अशीच बहुतेक सत्ताधा-यांची (मग ती पदाधिकारी असो अथवा अधिकारी) अपेक्षा असते. त्यामुळेच आपण त्यांना वाईट व्यक्ती म्हणून ओळखतो. म्हणजेच, अशी अपेक्षा न बाळगता कामं करणारी व्यक्ती ही चांगली व्यक्ती असू शकते. राजकारणाच्या संदर्भात विचार करायचा झाला तर ‘या क्षेत्रात पदं मिळविण्यासाठी, निवडून येण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत समाजात जाती-धर्माच्या भिंती बांधण्याचं काम करणार नाही (म्हणजे नीतिमत्ता चांगली असेल), हाती आलेली सार्वजनिक सत्ता किंवा अधिकार वापरताना त्यातून वैयक्तिक लाभ मिळवणार नाही (म्हणजे चारित्र्य चांगलं असेल), अशा व्यक्तीला आपण चांगला राजकारणी म्हणू शकतो.’


अर्थात, केवळ नीतिमत्ता आणि चारित्र्य चांगलं असून राजकारणात भागणार नाही. तेवढ्याने ती व्यक्ती ‘चांगली व्यक्ती’ नक्की म्हणवली जाईल; पण ती चांगली राजकारणी बनेलच असं नाही. त्यासाठी या ‘चांगल्या व्यक्ती’ला सार्वजनिक हित कशात आहे, याचं चांगलं ज्ञान असावं; सार्वजनिक प्रश्नांची जाण असावी; विकासाचा विधायक दृष्टिकोन असावा; दूरदृष्टी असावी; तिला आपले विचार प्रभावीपणे मांडता यावेत; अशाही अपेक्षा असतात. थोडक्यात काय, तर चारित्र्य आणि विद्वत्ता ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे त्यांना आपण चांगले राजकारणी म्हणून ओळखू शकतो.
‘तुम्ही सांगताहात तशी व्यक्ती आजच्या परिस्थितीत निवडूनच येऊ शकत नाही. कारण आजची निवडणूक इतकी सोपी राहिलेली नाही’, असा शेरा हा लेख वाचणा-यांपैकी अनेकांकडून येऊ शकतो, याची मला कल्पना आहे. ज्यांना अशाही व्यक्ती निवडून आलेल्या आहेत आणि येत आहेत, हे माहीतच नाही; त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? म्हणून पुढचा लेख त्यांच्यासाठी असेल.