Home »Magazine »Akshara» Gossip In Sixty

पासष्टीतील अक्षरगप्पा

समीर देशपांडे | Feb 20, 2013, 02:00 AM IST

  • पासष्टीतील अक्षरगप्पा


पुण्या-मुंबईत ज्याप्रमाणे डीएसके गप्पा, मॅजेस्टिक गप्पा असे उपक्रम सुरू आहेत. याच धर्तीवर कोल्हापुरातील अक्षरगप्पा या गेली सहा वर्षे सुरू असलेल्या उपक्रमाला रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पासष्टाव्या कार्यक्रमाकडे वाटचाल करणाया या कार्यक्रमामुळे अनेक स्थानिक साहित्यिकांना रसिकांशी संवाद साधण्याचे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटीवरील अक्षर दालन म्हणजे आता केवळ पुस्तक विक्रीचे दुकान न राहता साहित्यिकांची उठबस करण्याचे ठिकाण झाले आहे. प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते सात वर्षांपूर्वी या दालनाचे उद्घाटन झाले. उत्तम पद्धतीनं पुस्तकांची मांडणी, पुस्तक पाहून घेण्याची अथवा न घेण्याचीही असलेली मुभा यामुळे अक्षर दालनाला साहित्यपे्रमींचा चांगला प्रतिसाद आहे. हजारभर चौरस फुटाच्या जागेमध्ये साहित्यविषयक एखादा उपक्रम सुरू करण्याची कल्पना निर्धारचे देशपांडे यांनी अक्षरदालनाच्या रवींद्रनाथ जोशी यांच्याकडे मांडली आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीला लगेचच हो म्हणण्याचा स्वभाव असणाया जोशींनी ही कल्पना उचलूनही धरली.

प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी, सायंकाळी 5 वाजता कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले. अक्षरगप्पा असे कार्यक्रमाचे नामकरणही झाले. साहित्याला प्राधान्य देतानाच अन्य क्षेत्रातील मान्यवरांनाही या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्याचे ठरले. पहिल्या कार्यक्रमाला पंधरा जण उपस्थित होते. काही जणांनी कविता सादर केल्या, काहींनी साहित्यिकांच्या आठवणी सांगितल्या. हळूहळू दोन-तीन कार्यक्रम पार पडले आणि अक्षरगप्पांच्या कट्ट्यावरचा रसिकवर्गही वाढू लागला. पोस्ट कार्डावरून कार्यक्रमाचे निमंत्रण आणि आता एसएमएसची जोड यामुळे रसिकांची सोय झाली.

ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नलगे, गीतकार जगदीश खेबूडकर, कादंबरीकार बाबा कदम, कॉ. गोविंद पानसरे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रा. चंदक्रांत पाटगावकर, डॉ. सुनिलकुमार लवटे, विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजा शिरगुप्पे, प्रा. विसुभाऊ बापट, दीपक भागवत, बालसाहित्यिक मुकुंद निगवेकर, श्याम कुरळे, रजनी हिरळीकर, माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड, सहकारामधील विक्रमसिंह घाटगे, अरुण नरके, रवींद्र आपटे, अनेक साहित्यिकांच्या स्वाक्षयांचा संग्रह करणारे व लेखक असलेले राम देशपांडे, ‘भोगले जे दु.ख त्याला’ या आत्मचरित्रामुळे चर्चेत आलेल्या प्रा. आशा अपराध अशा अनेक मान्यवरांनी अक्षरगप्पांच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधला.
* कन्नड साहित्यिक भैरप्पांच्या उपस्थितीत रौप्यमहोत्सव : पंचविसाव्या अक्षरगप्पांच्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आलेले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉ. भैरप्पा हे आवर्जून उपस्थित राहिले आणि रसिकांनी अक्षर दालन तुडुंब भरून गेले. विविध भाषांमधील अनुवादित साहित्य हे परस्परांमधील आपुलकी वाढवू शकते याची अनेक उदाहरणे या वेळी डॉ. भैरप्पा यांनी दिली आणि या उपक्रमाचीही प्रशंसा केली.
*अक्षरगप्पांचा सुवर्णमहोत्सव : अक्षरगप्पांच्या सुवर्णमहोत्सवाचा विषय लवासा असा ठेवण्यात आला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक निळू दामले हे वक्ते. हा कार्यक्रम मात्र दालनाबाहेर शाहू स्मारक भवन येथे घेण्यात आला. या वेळी लवासा या बहुचर्चित प्रकल्पाच्या बाजूने आणि विरोधात अशी साधकबाधक चर्चा झाली. याप्रसंगी अक्षरगप्पांमध्ये सहभागी झालेल्या 50 वक्त्यांचा गौरवही करण्यात आला.
* 31 डिसेंबर आणि काव्यवाचन : 31 डिसेंबर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची प्रथा रुजली असताना अक्षर दालन आणि निर्धार यांच्या वतीने वर्षअखेरची संध्याकाळ काव्यमैफलीने साजरी करण्याचे ठरवण्यात आले. या उपक्रमालाही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. 21 कवींचे काव्यवाचन आणि उपस्थित तरुणाई यामुळे या उपक्रमाला पाठबळ मिळत असल्याची ग्वाही या वेळी मिळाली.

Next Article

Recommended