आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अहो आई’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अहो’ आई! शीर्षक वाचून हसलात ना? पण आज घराघरात या प्रेमळ आवाजाची हाक आपल्याला ऐकू येते. सासू-सून नात्यातला हा सुंदर सकारात्मक बदल. एक काळ असा होता की, घरातील सासू नामक व्यक्ती म्हणजे दृष्ट, कपटी, सुनेला त्रास देणारी असाच समज होता. यालादेखील बऱ्याच जणी अपवाद होत्या. पण चांगल्यापेक्षा वाइटाचीच जास्त चर्चा होते. मग टीआरपी वाढवण्यासाठी मालिकावाले मिर्चमसाला टाकून काही अनिष्ट गोष्टी दाखवू लागले. अशा गोष्टींचा समाजमनावर खूप प्रभाव पडत असतो. काही गोष्टी सतत मनावर बिंबवल्या गेल्या की, माणसाच्या विचाराची धारा बदलते. पण या पाच-सहा वर्षांत अनेक बदल झपाट्याने झाले आणि बदललेल्या परिस्थितीसोबत त्या त्या काळासोबत जगण्याचे संदर्भ बदलले. भीतीयुक्त आदराचे नाते आता आदरयुक्त भीतीने व्यापले आहे. सासू-सून म्हटले की प्रेमळ तू-तू मैं-मैं करणारी जोडी डोळ्यासमोर येते. सुनांच्या आगमनासाठी सासूबाई एक सकारात्मक बदल घेऊन कौतुकाने सज्ज झालेल्या आहेत. घरात येणारी मुलगी, तिचे विचार, तिचे घरातील स्थान, तिचे शिक्षण, ती म्हणजे या घराचे वैभव, तिची विद्वत्ता यांचे कौतुक केले जाते आणि मुलीदेखील आपल्या घरातील आवडीनिवडी, सणवार, संस्कार या गोष्टी सासूच्या मदतीने आत्मसात करून घेतात. ती नवीन नात्यांशी जुळवताना कुठे कमी पडलीच तर सासवा या गोष्टींचे भांडवल न करता सामंजस्याने तिला ती चूक सुधारण्यास मदत करतात. तू अमुक गोष्ट केलीच पािहजेस, तुला आलीच पाहिजे, माझ्या काळी मला असं करावं लागलं, असा पाढा न म्हणता सामंजस्याने कसे पुढे जाता येईल, याचाच विचार करताना दिसतात. बहुतांश महिला आता कटकारस्थान, वाईट प्रवृत्ती असलेल्या मालिका बघण्याचेदेखील टाळतात किंवा अनास्था दाखवतात. बदलत्या जीवनशैलीत एकमेकींना स्पेस देणाऱ्या सासू-सुना नावीन्याचा अंगीकार करायला तयार आहेत. सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी, तिच्या करिअरबद्दल सजग असलेली सासू, घरातील छोटे-मोठे निर्णय सुनेला विचारात घेऊन घेते. यामुळे मुलींनादेखील कुटुंबाबद्दल आदर वाटतो. फिरायलाही सासर-माहेरची मंडळी मिळून जातात, यामुळे परस्परांबद्दल प्रेम, आदरस्थान निर्माण होतो.
आज मालिकांमध्येही सासू-सुनांचे नातेसंबंध जिव्हाळ्याचे दिसतात. होणार सूनमधल्या आईआजी खंबीरपणे सुनांच्या पाठीशी उभ्या आहेत. एका लग्नाची दुसरी गोष्टमधील घनाची आई, सून राधाची बाजू घ्यातची तर, जुळून येती रेशीमगाठीमधले देसाई कुटुंब अनेक सकारात्मक बदल घडवायला कारणीभूत ठरू लागले आहे. तरुण पिढीदेखील या चांगल्या गोष्टी स्वीकारायला तयार आहे. सासू-सून-नणंद या नात्यातला इगो संपून त्याची जागा आता मैत्रीने घेतली आहे. सातत्याने अशा सकारात्मक गोष्टी आजूबाजूला बघायला मिळाल्या तर ‘अहो आई’ची जागा ‘ए आई’ घेईल, असा विश्वास वाटतो.