आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी सुपरवुमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही आहे गोष्ट एका गृहिणीची, स्वत:ला सुपरवुमन समजणाऱ्या गृहिणीची. परंतु, ती या सुपरवुमन सिंड्रोमला बळी नाही पडलेली, तर ती जे काही करतेय, ज्या जबाबदाऱ्या पार पडतेय, त्यात आनंद मानणारी गृहिणी आहे. त्यांचा त्रास ती करून घेत नाहीये, हे महत्त्वाचं आहे.
शाळेमध्ये मातापालकांसाठी मेळावा आयोजित केला होता. सगळ्या मुलांच्या आई खूप छान नटूनथटून आल्या होत्या. सगळ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. तीन तासांच्या कार्यक्रमात शाळेचे नियोजन मातापालकासाठी स्पर्धा, मुलांची ओळख, असे कार्यक्रम पार पडत होते. आम्ही सगळे जण त्या कार्यक्रमाचा आनंद लुटत होतो. कार्यक्रमातला एक भाग प्रत्येकीने आपला संपूर्ण परिचय द्यायचा असा होता. आपण करत असलेला व्यवसाय, आपले छंद या साऱ्यांची ओळख सांगायची. सगळ्याजणी आत्मविश्वासाने स्वत:ची ओळख करून देत होत्या. त्यात कुणी लाजत-बुजत होत्या. सर्वजणी एकमेकींना छान टाळ्यांनी प्रतिसाद देत होत्या. ओळख करून देत असताना एक माता म्हणाली, ‘माझी स्वत:ची ओळख करून देताना मी प्रथम सांगते की, मी आहे सुपरवुमन.’
साऱ्यांचा हशा, टाळ्यांचा कडकडाट शांत झाल्यावर तिने सांगितले, ‘मी नोकरी करत नाही. मी कमावतीही नाही. पण मैत्रिणींनो, मी माझं कुटुंब, माझा परिवार अतिशय नेटक्या पद्धतीने सांभाळते. घरातील मोठ्यांचा योग्य पद्धतीने आदर करते, तर छोट्यांना सहकार देते. माझ्या आचरणातूनच माझ्या मुलांवर संस्कार घडावे यासाठी मी प्रयत्नशील असते. काळासोबत चालताना नक्कीच माझी दमछाक होते. सासू-सासऱ्यांसोबत आम्ही तिघी जावा गुण्यागोविंदाने एकत्र कुटुंबात नांदत आहोत. याचं श्रेय घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जातं. मी एक सदस्य म्हणून मलादेखील याचा अभिमान आहे. पण माझ्या बऱ्याच मैत्रिणींना वाटतं हाऊसवाइफ म्हणजे कमावती नाही, काही तरी कमीपणा. पण आपल्या प्रत्येकीमध्ये काही ना काही गुण असतातच.
आपल्या गुणांचा आपण योग्य रीतीने वापर करून हाती आलेल्या संधीचं सोनं करायला हवं. आपण जे काम करतो त्याला कमी न लेखता आपण जे करतो ते योग्यच असा आत्मविश्वास आपल्याला असायलाच हवा. त्यामुळे आपली आपल्या कामावरची श्रद्धा अजूनच वाढते. म्हणून काम कोणतेही
करत असाल तर ते श्रेष्ठ आहे, असे प्रथम आपण आपल्या मनाला समजावयास हवे आणि मुख्य आहे त्यात समाधानी असणे. जी व्यक्ती समाधानी असते. तीच आनंदी असते. म्हणून मी स्वत:ला अभिमानाने सुपरवुमन हाउसवाइफच म्हणते. कारण माझा आदर मी स्वत: केला तरच इतर लोक तो मला देतील आणि मलादेखील इतरांना तो देता येईल. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वत:पासूनच करते.’
तिच्या या मनोगतानंतर माझ्या मनात विचार आला, आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी जणी आहेत, ‘तुज आहे तुजपाशी, परि तु विसरलासी’ या ओळी त्यांना लागू होतील. पैशाच्या मागे धावत स्वत:त असलेले गुण झाकोळून टाकतात. आपल्यातील स्वत:ला विसरून जातात. आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडतात. स्वत: दु:खी होतात, दुसऱ्याला दु:खी करतात. परिणामी किती तरी कुटुंबांत पैसा आहे, साऱ्या भौतिक सुविधा आहेत, पण त्या गृहिणीजवळ मन:स्वास्थ्य नाही. जे आपल्याजवळ आहे ते सोडून भलत्याच्या पाठीमागे लागतात.
परवा एका वर्तमानपत्रात बातमी वाचण्यात आली ‘सोने उजळून घेण्याच्या हव्यासापायी पाच तोळे सोने लंपास.’ क्षणभर असे वाटले सोने ते सोने, नवे असो की जुने, पण सोने आहे. त्यापेक्षा वेगळे असण्याची हौस नडली अन् पश्चात्तापाची वेळ आली. आहे त्यात जर आनंदी, समाधानी राहिलं तर निश्चितच कुटुंबात समाधान लाभेल.
बातम्या आणखी आहेत...