आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gouri Konge Article About Book Of Manacha Harvlele Password

तरुण मनाचा तळठाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पासवर्ड हा तरुणांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक. तो विसरणे, हरवणे याचा कधी ना कधी अनुभव घेतलेले आपण, इंटरनेटमुळे जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचूनही फेसबुक, यूट्यूब आदींच्या गर्दीत एकटे होत जाणार्‍या तरुण वर्गाने आवर्जून वाचावे असे ‘मनाचा हरवलेला पासवर्ड’ हे वृंदा भार्गवे यांनी लिहिलेले पुस्तक. पुस्तकाच्या शीर्षकातील तिन्ही शब्द तरुणांच्या मनाचा ठाव घेतात. रोजच्या धावपळीतील आपल्यासमोर ज्या घटना, प्रसंग, त्याचे पडसाद हे सगळे मांडताना आपले मन न थांबता अंतर्मुख होऊन विचारही करतेय, धावता धावताच. ‘हरवलेला’ हा शीर्षकातला दुसरा शब्द; गर्दीत असूनही हरवलेले असणे याची प्रचिती देतो. ‘पासवर्ड’, कुणाला आपला पासवर्ड कळला तर आपले बिंग फुटेल, अशी धास्ती घेत जगणार्‍यांची संख्या आज किती आहे, हे सांगणे न लगे.

या तिन्ही शब्दांच्या अनुषंगाने लिहिलेले हे पुस्तक शीर्षकापासून तरुणांनाच वाहिलेल्या अर्पणपत्रिकेपासून वाचायची इच्छा होते, त्यातील लेखनविश्वात डोकावायची इच्छा होते, तरुण म्हणून प्रतिक्रिया मनातून उमटू द्यावीशी वाटते, हे या पुस्तकाचे यश आहे. तरुणांभोवती केंद्रित असलेले, तरुणांच्या मनाचा तळठाव घेणारे असे एखादेच पुस्तक अलीकडे वाचायला मिळते.
‘एक फोल्डर...न उघडलेलं’ ही या पुस्तकातील पहिली दीर्घकथा. आजच्या पिढीला नेमके कसले प्रश्न पडतात? उच्च वा मध्यमवर्गात तरुणांना रूढी, परंपरा, धार्मिकता, सामाजिकता अशा अनेक चौकटीत सोयीने बांधणारे, घरातले ज्येष्ठ नेमके कुणाचे जगणे सोपे करत आहेत? असे थेट प्रश्न मनात निर्माण करीत लेखिका आजच्या कुटुंबव्यवस्थेतील त्रुटींकडे आपल्याला आजच्या नजरेने बघायला सांगते. तरुणांचे आजचे जगणे मांडताना त्यांच्याच भाषेचा वापर आपल्याला अचूक वातावरणाचा फील देतो. नवीन, आताच्या जगण्याकडे बघण्याची लेखिकेची समकालीन प्रगल्भता लक्षात येते.

‘पोरींना डिप्रेशनमध्ये पोरांपेक्षा थोडे अधिकच मार्क्स मिळतात, डिस्टिंक्शनच’ किंवा ‘मध्यमवर्गीय घरांमध्ये चर्चा फार घडतात. वांझोटं बरंच काहीसं असतं मध्यमवर्गात. पण माणसांची कॉम्बिनेशन्स ? महाभयंकर.’ उच्चवर्ग वा मध्यमवर्ग असो, या सगळ्यात कसे सगळे सुरळीत चालावे, संकटे टळावीत या भीतीने केले जाणारे कर्मकांड, पूजाअर्चा यातला फोलपणा दाखवत असतानाच लेखिकेने उद्ध्वस्त आयुष्यात संपू पाहणारे सगळेच एक क्षणासाठी का होईना ‘बाबांचा प्रसाद देऊन सावरलं जावं’ अशी आजच्या पिढीची मानसिकता कथेत अधोरेखित केली आहे. कथेत घडणार्‍या घटना, त्यानुसार येणारी पात्रे, त्यांची मानसिकता मांडण्याचा ओघ कथेला आणखी उंचीवर नेण्यास पूरक आहेत. घर या संकल्पनेत झालेला बदल, घरातल्या ‘स्त्री’चा मानव धर्माला साजेसा केलेला विचार, नात्याकडे बघण्याचे सहजी तत्त्वज्ञान, प्रसारमाध्यमांचा नात्यांमध्ये होणारा हस्तक्षेप हे सगळे कथेच्या गतीतून आपल्याला वाचायला मिळते. बुद्धीला पटेल तेच करण्याचे व मानव धर्माला अनुसरण्याचे आजच्या पिढीचे प्रतिबिंब या कथेत उमटते. त्यामुळे या कथेचे वाचन करणे म्हणजे ही कथा आपल्या हातात हात घालून सहप्रवासच करते. याच पुस्तकातील ‘मनाचा हरवलेला पासवर्ड’ ही दुसरी दीर्घकथा मात्र पहिल्या कथेपेक्षा अत्यंत वेगळी. तरुणांच्या प्रगल्भतेकडे जाऊ पाहणारी ही कथा तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रवेश केलेल्या डोळस, ऊर्जित तरुणाईची आहे. प्रश्न सोडवून निर्णयाबरोबर प्रामाणिक राहात आयुष्याचं सत्य जाणू पाहणार्‍या ‘ती’चा प्रवास या कथेत मांडला आहे. लग्न न करता ‘ती’चा यशबरोबर राहण्याचा निर्णय, सुशिक्षित कुटुंबाची यावरील प्रतिक्रिया, पंजाबी असलेल्या अमृताचा व रुईचा कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातून लिव्ह इन रिलेशनशिप लेखिकेने उलगडली आहे. जबाबदार्‍या टाळण्यासाठी आजचे तरुण लिव्ह इन राहतात, हा समज ही कथा खोडून काढते. कथेत पृथ्वी थिएटर, फिल्मसिटीसारखी शहरी ठिकाणे येतात; पण तरीदेखील ही कथा अमुक एका शहराची असू शकत नाही. मुंबई शहर जगाशी कसे जोडले गेले आहे, हे आपण जाणतोच. कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ ते अमेरिकेपर्यंतच्या घटनांशी ही कथा जोडली जाते. या कथेतला सकारात्मक भाग म्हणजे यातल्या नायकाला असणारा हिंसेचा, मानवजातीचा प्रश्न आपली स्वत:ची जबाबदारीही तितकीच आहे, या भावनेने सोडवावासा वाटतो. आत्मकेंद्रित वृत्तीतून बाहेर येऊ पाहणार्‍या तरुणांमध्ये हा नायक मोडतो. मात्र हे पुस्तक दोन्ही कथा वाचल्यानंतर केवळ महानगरीय विश्वापुरते वाटते. महानगरांच्या पलीकडे जाऊन कथेतल्या प्रश्नांचा वेध घ्यायला हवा होता. तरीदेखील या दोन्ही कथा प्रगती, विकास याची बुद्धीला पटणारी वाटचाल दाखवतात, असे म्हणण्यास हरकत नाही.
g.kalpanakonge@gmail.com

० पुस्तक : मनाचा हरवलेला पासवर्ड
० लेखिका : वृंदा भार्गवे
० प्रकाशन : अमेय प्रकाशन
० पृष्ठसंख्या : 191
० मूल्य : 225 रु.