आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विघटनाच्या दिशेने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात विघटनाच्या दिशेने राजकारण, समाजकारण व अर्थकारण चालले आहे. दिल्लीत एका तरुणीवर सामूहिक बलात्कार होऊन ती दुर्दैवी तरुणी बळी पडली. त्यामुळे देशाची राजधानी किती असुरक्षित, हे सिद्ध झाले. या बलात्काराच्या गुन्ह्यात उत्तर भारत पुढे आहे, हेही दिसून आले आहे. या घटनेमुळे सारा देश हादरून गेला. मग या गुन्हेगारीसंबंधी विश्लेषण आणि उपाय सांगणार्‍यांची झुंबड उडाली. असंख्य लोक अनेक शहरांत मोर्चामध्ये सामील झाले, ते त्यांना आलेल्या उद्विग्नतेमुळे. तथापि तोंड चालवणार्‍या अनेकांनी त्वरित उपाय सुचवताना ताळतंत्र नसल्याचे दाखवून दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना ‘इंडिया’त गुन्हेगारी जास्त; पण ‘भारता’त तशी नाही, असा शोध लागला आहे. तो अगदीच पोकळ असल्याचे लगेच सिद्ध झाले. दिल्लीबरोबरच हरियाणा आणि पंजाबमधील याच प्रकारच्या घटना उघड झाल्या. भागवत यांना ‘इंडिया’पेक्षा ‘भारत’ श्रेष्ठ वाटतो, तर नागपूर हे मोठे शहर ‘इंडिया’त मोडणारे असल्यामुळे त्यांनी जंगल इत्यादींचा आश्रय का घेतला नाही?
मुंबईचे एक पोलिस अधिकारी संघात होते की काय माहीत नाही; पण निवृत्त झाल्यावर त्यांना संघात अधिकारपद देता यावे, असे त्यांचे वक्तव्य झाले आहे. त्यांच्या मते, इंग्रजी शिक्षणामुळे समाजस्थिती बिघडली आहे. हे वक्तव्य मोहन भागवत यांच्या वळणाचे आहे. इंग्रजी शिक्षणापूर्वी सर्व चांगले होते आणि नंतर ते बिघडले, असे या अधिकार्‍यास म्हणायचे असले तरी लोकमत त्यांच्या बाजूस नाही.
जी तरुणी बळी पडली ती लहान गावातून दिल्लीला येऊन शिकत होती आणि तिला परदेशात जाण्याची इच्छा होती. ती गुन्हेगार नव्हती तर गुन्हेगारांची बळी होती. ज्या पोलिस अधिकार्‍यास नवा साक्षात्कार झाला आहे, ते स्वत: इंग्रजी शिकले आणि वरच्या पदापर्यंत चढले. पण त्यांना उपरती झालेली दिसते. त्यांची मुलेबाळे, नातेवाईक इंग्रजीपासून दूर असतील असे नव्हे.
मोहन भागवत, भागवतांच्या वळणावरचे पोलिस अधिकारी इत्यादींनी हे लक्षात ठेवावे की विष्णुशास्त्री चिपळूणकर हे भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते; पण इंग्रजी भाषा त्यांना वाघिणीचे दूध वाटत होती. आपण जर इतके श्रेष्ठ होतो, तर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य कसे येऊ दिले? शिवाय इंग्रजी भाषा, पाश्चात्त्य संस्कृती जर केवळ गुन्हेगारीचे पोषण करणारीच असेल तर तिचा इतका प्रसार कसा झाला आणि जुन्या भारतीय संस्कृतीचा का झाला नाही?
भारतापासून इंडिया वेगळा करण्याचे तंत्र हे संघवाले, भाजप इत्यादींचे असले आणि ते सवंग असले तरी संघ ज्या अर्ध्या पँटीत संचलन करतो, ती इंग्रजांकडून आली आहे. तिच्याऐवजी काचा मारलेले धोतर का वापरत नाही? महात्मा गांधींनी साध्या माणसाचा पोशाख स्वीकारला होता आणि हे अर्ध्या पँटीत. त्या इंग्रजी व पाश्चात्त्य विद्येमुळे रेल्वे व विमाने आली. भागवत व ते पोलिस अधिकारी त्यांचा वापर न करता बैलगाडीचा आश्रय का घेत नाहीत? समाज बदलत असतो; नवे प्रश्न निर्माण होत असतात आणि समाजधुरीण व राज्यकर्ते यांनी ते सोडवायचे असतात. मागे काय झाले याचे दळण दळण्यात काही अर्थ नाही.
दिल्लीतील गुन्ह्याच्या निषेधार्थ मोर्चे काढणारांत काही वकील काळा कोट चढवून सामील झाले होते. पाकिस्तानात वकील मोर्चे काढत आले आहेत, ती लागण लागलेली दिसते. पण मोर्चेच काढण्यापूर्वी बलात्काराचे खटले न्यायालयांत प्रत्येक पायरीवर दीर्घकाळ अडून राहतात व न्याय मिळत नाही, त्यावर उपाय करण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे; हे मोर्चेकरी वकिलांच्या लक्षात आलेले नाही. आजकाल पुराणिक, प्रवचनकार आणि धार्मिक भाष्यकार यांचा सुळसुळाट फार झाला आहे. त्यातच त्यांना प्रसिद्धीची साधने वापरण्याचा नाद लागला आहे. यामुळे वृत्तपत्रे आणि त्यातही टीव्हीचे कॅमेरे व त्यांच्या वार्ताहरांच्या हातातली नळकांडी दिसली की यांची रसवंती सुरू होते. आसाराम बापू या नावाचे असेच कोणी आहेत, त्यांना दिल्लीतील अमानुष गुन्ह्याबद्दल तोंड चालवल्याशिवाय राहवले नाही. यामुळे त्यांनी त्या दुर्दैंवी मुलीबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी एका हाताने टाळी वाजत नसल्याचा शेरा मारला. एका हाताने टाळी वाजत नसेल, पण प्रत्येक गुन्ह्यास दोन्ही पक्ष जबाबदार असल्याचे मानायचे असेल तर न्यायालयांतील अनेक प्रकरणे रद्दबातल करण्यास हरकत नाही. या बापूंच्या तर्कशास्त्राप्र्रमाणे जायचे तर समजा, उद्या कोणा चोराने त्यांचे पैसे चोरले तर बापूंनी पैसे जमवले म्हणून त्या चोराला चोरी करावीशी वाटली, असे मानून चोराला सोडून देण्यास हरकत नाही.
तथापि या आध्यात्मिक गुरूंच्या पुढे शिखांच्या अकाल तख्ताने मजल मारली आहे. त्याने इंदिरा गांधींचा अमानुषपणे खून करणार्‍या दोन मारेकर्‍यांचा सन्मान जाहीरपणे केला आहे. त्या वेळी भिंद्रनवाले याच्यासारख्या आध्यात्मिक क्षेत्रातल्यांनी रक्तपाताचा पंथ स्वीकारला आणि हिंदू व शीख यांचे बळी त्यांच्या राजकारणाने पडले. त्यातल्या निदान शिखांची आठवण ठेवायला हवी होती. हे वाढत जाऊन धर्ममंदिर हे किल्ला बनवून शस्त्रे जमवण्यात आली होती. तेव्हा त्यास विरोध न करता अकाल तख्तास इंदिरा गांधींचे खुनी हे सन्मानास पात्र आहेत, असे वाटले हे विशेष.
एकंदर अकाली राजकारण विघटनाच्या दिशेने जात आहे, याची दखल घेणे आवश्यक आहे. चंदरसिंग डोग्रा या नावाच्या गृहस्थाने ‘हिंदू’मध्ये नुकताच एक लेख लिहून पंजाबमधील न्यायालये कायदा धाब्यावर बसवून शिखिस्थानाच्या बाजूने हालचाली करणार्‍यांना आजही शिक्षा न देता माफी देतात, हे काही उदाहरणांवरून दाखवले आहे. वास्तविक याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला हवी. प्रत्येक राज्याच्या न्यायापासून सर्व पातळीवरच्या न्यायालयाने गुन्हेगार कोणत्या जाती-धर्माचे वा भाषिक गटाचे आहेत, हे पाहून निवाडा देता कामा नये. पंजाबमध्ये हे होत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक ठरतो. या रीतीने अराजकवादी बोकाळले असून राजकारणी यात अग्रभागी आहेत. अनेकांच्या अनेक हालचाली चालू असून पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे पंतप्रधानपदाची स्वप्ने अनेक जण पाहत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबाबत आघाडी मारली असून त्यांच्या मेळाव्यात काही उद्योगपतीही सामील झाले आहेत. अनिल अंबानी यांना तर मोदी हे महात्मा गांधी व सरदार पटेल यांच्या रांगेत आहेत, असे वाटू लागले आहे. अंबानी यांना जे काही उद्योग उभारायचे असतील ते उभारावे; पण राजकारण, इतिहास इत्यादीची गंधवार्ता नसताना उगाच भाटगिरी करून महात्माजी व सरदार यांची बदनामी करू नये.
राजकीय पक्ष डबघाईला आले असल्यामुळे प्रादेशिक अहंकार आणि स्वार्थ वाढत चालला आहे. हे अराजकवादी प्रवृत्ती पोसणारेच आहे. सर्व देश टिकणार कसा व विकसित होणार कसा, ही खरी चिंता आहे. केवळ काही शहरांतल्या टोलेजंग इमारती या आश्वासक नाहीत.
govindtalwalkar@hotmail.com