आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशेचा किरण (गोविंद तळवलकर)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरियाबद्दल आशेचा किरण दिसू लागला आहे. जिनिव्हात अमेरिका व रशिया यांचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी व सर्गे लाव्हरॉव्ह यांच्या बैठका होऊन उभयसंमत तडजोडीचा करार झाला आहे. तडजोड म्हटली की, दोन्ही बाजूंना काही मागण्या सोडून द्याव्या लागतात. तसे याही बाबतीत झाले आहे. अमेरिकेला लष्करी कारवाईची टांगती तलवार म्यान करावी लागली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनी कोणत्याही पद्धतीचा करार केला तरी युद्ध करण्याचा आपला पर्याय राबवला जाईल, ही भूमिका तिला सोडावी लागेल. रशिया रासायनिक अस्त्रांची यादी आणि संयुक्त राष्ट्रांचे नियंत्रण याबाबत सिरियावर निश्चित कालमर्यादेचे बंधन घालण्यास तयार नव्हता. पण आता त्याबद्दल त्याची भूमिका बदलली. सात दिवसांत सिरिया त्याच्याकडील रासायनिक अस्त्रांची यादी संयुक्त राष्ट्रांना देणार आहे. तथापि त्याने आणखी एक अट मान्य करून कारवाईही केली, ती महत्त्वाची आहे. रासायनिक शस्त्रांवर निर्बंध लादणारी एक यंत्रणा ‘युनो’तर्फे चालवली जाते. नव्वदहून अधिक देश तिचे सभासद आहेत. तिचे सभासद होण्याची सूचना रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली होती, ती सिरियाने मान्य करून सभासदत्वाचा अर्जही पाठवला आहे. यामुळे सिरियाची रासायनिक शस्त्रे व अस्त्रे कोणाही एका देशाच्या नियंत्रणाखाली जाणार नसून संयुक्त राष्ट्रांचे नियंत्रण येईल.
या तडजोडीमुळे आशेचा किरण दिसू लागला आहे. सिरियात अनेक देशांतील दहशतवादी गोळा झाले असून त्यांना या करारामुळे पायबंद घालण्यास वाव मिळेल.
ओबामा व पुतीन यांच्या दोन-एक वेळा ओझरत्या भेटी झाल्या, तेव्हा दोघांनी सिरियाचा उल्लेख केला. तथापि अमेरिका लष्करी कारवाई केव्हाही करण्याची लक्षणे दिसू लागली असता, अमेरिकन परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सहज वक्तव्य करण्याच्या मिशाने सिरिया संयुक्त राष्ट्रांच्या ताब्यात रासायनिक अस्त्रे देण्यास तयार झाल्यास स्वागत होईल, असे म्हटले. त्याबरोबर पुतीन यांनी परराष्ट्रमंत्री सर्गे लावरॉव्ह यांच्यामार्फत वाटाघाटींची तयारी असल्याची घोषणा केली व पुढील पावले पडली.
गेली अडीच वर्षे सिरियाचा अध्यक्ष बशर असाद हा स्वत:च्याच लोकांचे शिरकाण करत आहे. त्यात एक लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला. रशियाचा त्यास लष्करी व आर्थिक बाबतीत पाठिंबा असून इराण व इराक या दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांनी मदतीत खंड पडू दिला नाही. या तीन देशांच्या एकजुटीला धार्मिक पाया आहे. कारण ते शियापंथीय आहेत.
अफगाणिस्तान व इराकमधील युद्धांमुळे अमेरिकन लोक युद्धाला कंटाळले आहेत आणि बुश यांच्याप्रमाणे सदैव युद्धाच्या पवित्र्यात राहण्याची ओबामा यांची वृत्ती नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या दबावामुळे ओबामा यांना रशियाबरोबर वाटाघाटी करण्याची तयारी दाखवण्याची घोषणा करताना उलटसुलट विधाने करण्याशिवाय मार्ग नव्हता. पुतीन यांनाही अमेरिकेची कोंडी करण्यात काही यश मिळाले होते, तरी अमेरिकेने लष्करी कारवाई केली असती तर तिच्या अनेक विपरीत परिणामांना तोंड द्यावे लागले असते.
निरनिराळ्या देशांतून सिरियात आलेल्या दहशवादी शक्ती या सुन्नी मुस्लिम आहेत आणि त्यातील एक म्हणजे चेचनियातील बंडखोर.
रशियाला हे धोकादायक होते. शिवाय, एकेकाळी रशियन संघराज्यात असलेल्या मुस्लिम देशांतूनही दहशतवादी संघटना आहेत. त्या स्वस्थ राहणे शक्य नव्हते. तेव्हा पुतीन यांना हे लक्षात घेणे अनिवार्य होते.
अर्थात, पुतीन यांनी आपल्या आश्रयार्थीला पाठीशी घालण्याचे थांबवलेले नाही. आसाद इतके दिवस रासायनिक अस्त्रे आपल्यापाशी नसल्याचा दावा करत होता, पण आता ती ‘नसलेली’ अस्त्रे तो संयुक्त राष्ट्रांकडे देण्यास तयार आहे. सिरियन लोकांविरुद्ध ती वापरली असादने; पण पुतीन सांगतात की ती असाद विरोधकांनी वापरली.
ही अस्त्रे संयुक्त राष्ट्रांकडे येण्याचा मार्ग सुलभ नाही. त्यात रशिया व असाद हे अनेक अडथळे आणू शकतात. यामुळे दीर्घ काळ सावध राहावे लागेल. ताज्या अंदाजाप्रमाणे ही अस्त्रे एक हजार टन होऊ शकतील. काहींची माहिती आणखी किती तरी हजार टनांची आहे.
या संबंधात ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे प्रतिनिधी पीटर बेकर यांनी एक विस्तृत लेख लिहिला आहे. इराकमधील नित्याच्या बाहेरची शस्त्रे व अस्त्रे यांचा तपास वीस वर्षे झाली तरी संपला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे, असे बेकर बजावतात. तपास घेण्यासाठी व तपासनीसांच्या सुरक्षिततेसाठी पाऊणएक लाख सुरक्षासैनिक लागतील. संयुक्त राष्ट्रांचे असे 110 तपासनीस काही देशांत वावरत आहेत.
रासायनिक अस्त्रे बॉम्ब टाकून नष्ट करता येत नाहीत. कारण त्यामुळे फार मोठा प्रदेश विषारी वायूने दूषित होऊन अगणित लोक मरतील. या अस्त्रांचा साठा एका वा मूठभर ठिकाणी नाही. संबंधित अमेरिकन अधिकार्‍यांना यापूर्वी 42 ठिकाणे असल्याचा अंदाज होता, आणि त्यातील 19 नक्की माहीत होती. पण त्यानंतर आसाद सरकारने हे साठे अधिक ठिकाणी विखुरले. त्यांचा शोध लागला तरी तिथपर्यंत पोहोचणे सोपे नाही. सिरियाच्या उत्तर भागात ‘अल सफिरा’ या गावात विषारी वायू तयार करण्याचा एक प्रचंड कारखाना कडक बंदोबस्तात आहे. अनेक बंडखोर अद्याप तिथे पोहोचू शकले नाहीत. पण तिकडे जाणार्‍या मार्गावरचे त्यांचे हल्ले वाढले आहेत. सिरियातील या अवाढव्य कारखान्यापर्यंत बंडखोर पोहोचले तर मोठा अनर्थ होईल. संयुक्त राष्ट्रांनी अत्यंत विषारी अस्त्रांचा शोध घेऊन ती नष्ट करण्याचा अनुभव घेतला आहे. यासाठी या संघटनेने एक यंत्रणाच अनेक वर्षे चालवली असून तिचे मुख्यालय हेग येथे आहे. तिने आतापर्यंत सात देशांतल्या शस्त्रांनी धारण केलेल्या हजारो टन विषारी अस्त्रांचा शोध लावून ती नष्ट केली आहेत.
आज तरी पुतीन यांनी एक खेळी जिंकली आहे. ते सोव्हिएत राजवटीत वाढले असले तरी नंतर त्यांनी वेळोवेळी राष्ट्रवादी भावनेचे दर्शन घडवले आहे.
अमेरिकेत कोणीही अध्यक्षपदावर येवो, तो जगाच्या राजकारणात अग्रस्थानी मानला जात आहे; पण या राजकारणात रशिया हाही एक महत्त्वाचा घटक असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असाच धडा पुतिन यांनी सिरियाच्या निमित्ताने दिला आहे.
तथापि यातून जगाला दिलासा मिळेल असे काही घडणार नसेल, तर खेळी जिंकली तरी रशिया निर्णायक असे काही करू शकत नाही, असे जगाला दिसेल.
‘अरब वसंत ऋतू’ म्हणून अमेरिकन नेते व वृत्तपत्रे हर्षभरित झाली होती. पण या ऋतूत इजिप्तमध्ये एक हुकूमशहा गेला आणि आता लष्कर प्रमुख अध्यक्ष होण्याची लक्षणे आहेत. पुतीन हे मात्र या अरब वसंत ऋतूबद्दल उत्साही नव्हते. यातून अधिक अस्थिरता माजेल आणि दहशतवादी शक्ती प्रबळ होतील, अशी भीती त्यांना वाटत होती. ती खरी झाली. या उलट इजिप्तमधील वसंत ऋतू आपण त्या अगोदर कैरोत केलेल्या भाषणामुळे बहरला, अशी खुशीची गाजरे ओबामा खात होते.
गेल्या तीस वर्षांत अमेरिका व रशिया यांच्या नेत्यांनी डोंगराएवढ्या चुका केल्या. प्रथम रशियनांनी अफगाणिस्तानचा इतिहास, लोक इत्यादींचा विचार केला नाही. लोकांत मुळे न रुजलेल्या कम्युनिस्ट म्हणवणार्‍या पुढार्‍यांच्या नादाने सैन्य घुसवले. मग रशियाला धडा देण्यासाठी अमेरिकेने धर्मांध शक्तींना व राजकारण्यांना पैसा व शस्त्रास्त्रे पुरवली. आता पुन्हा याच दहशतवाद्यांशी मुकाबला करावा लागत आहे.
हे लक्षात घेऊन अमेरिका व रशिया यांचा सूर व नूर बदलला, तर ते अधिक स्वागतार्ह होईल.

govinddtalwalkar@hotmail.com