आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govind Talwalkar's Artical On Party Politics Of India

सोनिया गांधींना जाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल भाजपला संतोषजनक असले, तरी राजस्थान व मध्य प्रदेश या दोन राज्यांत ते विशेष उल्लेखनीय आहेत. कारण मध्य प्रदेशात त्या पक्षास तिस-यांदा बहुमत मिळाले आहे, तर राजस्थानात गेलेली सत्ता त्यास परत मिळाली. त्यातही निर्विवाद बहुमत मिळाले, हे विशेष. दिल्लीच्या विधानसभेच्या जागा आहेत 70 आणि भाजपला मिळाल्या आहेत 31. जदयू, अकाली दल आणि अपक्ष विजयी उमेदवारांची एकूण संख्या तीन आहे. ते भाजपला मिळाले, तरी बहुमत होत नसल्यामुळे ‘आम आदमी’ या नावाचे जे काही उभे झाले आहे, त्याच्या केजरीवाल यांच्यासारख्यांची मनधरणी करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे ‘आम आदमी’वाल्यांशी हातमिळवणी न करण्याची गडकरी यांची भाषा व्यर्थ आहे.
वास्तविक ‘आम आदमी’ हे जे काही आहे, त्याचे व भाजपचे काही महिन्यांपूर्वी सख्य होते. म्हणून आपल्या पक्षाच्या मदतीशिवाय हजारे यांचे उपोषणाचे दिल्लीतील खेळ चालले नसते, असे भाजप आणि रा. स्व. संघ यांनी म्हटले होते. तसेच सत्ता जवळ आल्यामुळे केजरीवाल यांची चालही बदलल्याशिवाय राहणार नाही. ‘आम आदमी’ची भाजपला आडकाठी होणार, हे ओळखून सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी मतदानाच्या दोनएक दिवस आधी टीका केली होती. आता मनधरणी करण्याशिवाय गत्यंतर नाही.
छत्तीसगडमध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा अधिक जागा आहेत. पण आतापर्यंतचा त्या राज्याचा इतिहास पाहिल्यास हे चित्र केव्हाही बदलू शकेल आणि बदलून काँग्रेसच्या हाती सत्ता आली, तरी ती फार काळ टिकणार नाही. तथापि चारही निवडणुका काँग्रेस हरली आहे आणि त्यातही राजस्थानमध्ये तिला चांगलाच दणका मिळाला. भाजपने काँग्रेसकडून एक राज्य घवघवीत यशाने मिळवले, तर काँग्रेसला भाजपकडून मध्य प्रदेश जिंकता आलेला नाही आणि दिल्ली टिकवता आली नाही.
निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले की, या निकालांची आपला पक्ष गंभीरपणे दखल घेईल आणि आत्मपरीक्षण करील. लोक नाराज झाले आहेत, हे खरेच आहे. हे आपले तात्पुरते व वेळ मारून नेण्यासाठीचे वक्तव्य आहे; की गंभीरपणाचे, हे नंतर कळेल. आत्मपरीक्षण करण्यासाठी एवढ्या पराभवाची वाट पाहण्याचे कारण नव्हते. आणीबाणीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यावर इंदिरा गांधींनी त्या अपयशास आपण जबाबदार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. सोनिया गांधींनी तशी ती दिलेली नाही. त्यांनी, तसेच राहुल आणि मनमोहन सिंग यांनीही आपली जबाबदारी जाहीरपणे लगेचच मान्य करायला हवी होती.एक गोष्ट मान्य करावी लागेल की, सोनिया वर्षभर आजारी आहेत. पण आपल्या मुलाला पक्षाचे कार्याध्यक्षपद दिले की भागले, असे त्यांनी मानले ही चूक होती. प्रकृती खालावत चालली असताना पंडित नेहरू आपल्या मुलीला पंतप्रधान करा, म्हणून सांगू शकले असते; परंतु त्यांनी ते न करता काँग्रेसजनांवर सोपवले. पण इंदिरा गांधींनी आपल्या मुलाकडे सत्ता जाण्यासाठी बंदोबस्त केला आणि सोनिया गांधींनी आपल्या सासूचा आदर्श ठेवला.
राहुल गांधींना कोणत्याही विषयाचे ज्ञान नाही. देशभर फिरले आणि कोठल्या तरी झोपडपट्टीत भाकरतुकडा खाल्ला, की सामान्य लोकांच्या जीवनाची ओळख होत नाही. राहुल गांधी यांनी लोकसभेत वा इतर कोणत्याही व्यासपीठावर अभ्यासपूर्ण भाषण केले नाही. त्यांच्यामुळे तरुण पिढी काँग्रेसकडे आकर्षित होईल, हा प्रचार झाला. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. तरुण पिढी म्हणजे शिंदेंसारख्यांची मुले, हा राहुल गांधींचा विचार झाला. पण मध्य प्रदेशात या तरुण शिंदे यांचा भोपळा फुटला. लोकसभेतही राहुल व त्यांच्या बरोबरचे इतर हे कर्तव्यशून्य ठरले आहेत. शंभर वर्षे होऊन गेलेल्या राष्‍ट्रीय पक्षाचा इतिहास तरी या चिरंजीवास माहीत आहे की नाही, कोणास ठाऊक.
राहुल गांधी तरुण पिढी काँग्रेसकडे आकर्षित करणार; पण शीला दीक्षित यांच्यासारख्या पंधरा वर्षे मुख्यमंत्रिपद भोगलेल्या आपल्या पदाला चिकटून राहणार. एक काळ सोनिया गांधी यांनी विसकटलेल्या काँग्रेसला सावरून धरले आणि बाराएक राज्यांत त्या पक्षाच्या हाती सत्ता आली. पण गेल्या काही वर्षांत त्या हे करू शकल्या नाहीत, आणि आपला मुलगा हे करेल, असा वृथा विश्वास बाळगला. प्रथम त्यांनी राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याचे कटाक्षाने टाळले होते; पण नंतर त्यांच्या संमतीशिवाय केंद्र व काँग्रेसच्या नियंत्रणाखालील राज्यांची मंत्रिमंडळे काही करू शकणार नाहीत, अशी अवस्था आली.पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ यांस राज्यकर्त्या पक्षाच्या प्रमुखाच्या विश्वासात घेणे आवश्यक असते; पण निर्णय पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचाच असला पाहिजे. परंतु सोनिया गांधींनी गेल्या काही वर्षांत या दोघांनाही हुकमाचे ताबेदार बनवलेले दिसते. तसेच पक्षाची कार्यकारिणी आहे; महासमिती आहे. महासमिती केव्हा भरली, हे आठवावे लागेल आणि भरून उपयोग काय?
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची दुस-या पाच वर्षांची कारकीर्द निराशाजनक झाली. जगातल्या पुढारलेल्या आठ राष्‍ट्रांच्या मेळाव्यात व तशाच मेळाव्यात त्यांची उपस्थिती नियमित असली, तरी या आठही प्रमुखांना वारंवार खल करून जगभर मंदीची लाट येणार, हे समजले नाही आणि आल्यावर काय करायचे, हे ओळखता आले नाही. जागतिक मंदीची झळ आपल्याला लागली आहे; पण आपल्या सरकारच्या उणिवाही काही कमी नाहीत. मनमोहन सिंग हे स्वत: भ्रष्ट नाहीत, हे त्यांचे टीकाकारही मान्य करतात. पण भ्रष्टाचाराची उदाहरणे बाहेर आल्यावर पंतप्रधानांनी संबंधित मंत्र्यास वा अधिका-यास निदान निलंबित करायला हवे व दोषी ठरल्यास रजा द्यायला हवी. परंतु मनमोहन सिंग प्रकरण उजेडात आल्यावर दोन-चार दिवस मौनव्रत घेत आले. जाहीर सभेत लोकांना आकर्षित करण्याचे कौशल्य सर्वांपाशी असते असे नाही; पण त्यांचे सभागृहातील भाषणही परिणामकारक होत नाही.
सोनिया गांधी व राहुल आत्मपरीक्षण करणार आहेत, तर त्यांनी या प्रकारची वस्तुस्थिती स्वीकारण्यास तयार हवे.
आपला काही दोष नाही; फक्त इतरांचा आहे, हे मानून व्यवहार होणार असेल तर उगाचचा खटाटोप होईल. काँग्रेस काय करायचे तर करेल वा न करेल; पण भाजपच्या नेत्यांनी देशाची सत्ता आपल्या हाती येण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या समजुतीत राहण्याची स्थिती नाही. नरेंद्र मोदी यांची जादू इत्यादी भाषाही फुकाची आहे. कारण, झारखंडमध्येच नव्हे तर दिल्लीतही ही जादू दिसली नाही. लोकसभेच्या निवडणुकीसाठी जयललिता व इतर राज्यपातळीवरील नेते दिल्लीतही आपल्या उमेदवारांची संख्या कमी करून मोदींची वाट खुली करून देणार नाहीत. इतकेच काय; मध्य प्रदेशमध्ये तिस-यांदा मुख्यमंत्री होणारे चौहान आपला दिल्लीत दाब राहील, हे पाहतील. गेल्या काही वर्षांत कोणत्याच पक्षाकडे राष्‍ट्रीय पातळीवरचे नेतृत्व राहिले नाही. यामुळे राज्यपातळीवरचे नेते प्रबळ झाले आहेत. ब्रिटिशांनी एकसंध राजवट आणली. आपण स्वातंत्र्यानंतर पंचावन्नएक वर्षे तशी टिकवली; पण जवळपास गेली दहा वर्षे ते पर्व संपले. आता प्रादेशिक राज्यांना महत्त्व आले आहे. यामुळे मोदींची जादू विसरा; त्यांना सत्ता मिळाली, तरी या प्रादेशिक नेत्यांची आर्जवे करावी लागतील. इतर कोणाचेही हेच होईल.
जादू दिसली नाही
काँग्रेस काय करायचे तर करील वा न करील; पण भाजपच्या नेत्यांनी देशाची सत्ता आपल्या हाती येण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या समजुतीत राहण्याची स्थिती नाही. नरेंद्र मोदी यांची जादू इत्यादी भाषाही फुकाची आहे. कारण, झारखंडमध्येच नव्हे तर दिल्लीतही ही जादू दिसली नाही.
govindtalwalkar@hotmail.com