आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरदार यांचे केव्हापासून ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंडित जवाहरलाल नेहरू की सरदार पटेल, असा देशापुढे आज मोठा विकल्प उभा असून सरदार पटेल यांची बाजू जाहीरपणे लढवण्यास आपल्याशिवाय कोणी दुसरे नाहीत, असा समज नरेंद्र मोदी, अडवाणी तसेच भा.ज.प. यांनी करून घेतलेला दिसतो. देशापुढे गरिबी, बेकारी, रोगराई, बेघरांची व अशिक्षितांची भरमसाट संख्या, वीजटंचाई अशा अनेक समस्या आहेत; पण नेहरू की सरदार यांच्यापैकी कोणाचे नेतृत्व हवे, या निर्णयावर त्या सुटणार असल्याची समजूत हा विकल्प देशात पसरवत आहे.
वस्तुत: नेहरू व सरदार यांनी असा प्रश्न देशापुढे कधी मांडला नव्हता. जगातल्या सर्व देशांत वरिष्ठ नेत्यांत मतभेद असतात आणि त्या देशातल्या पद्धतीप्रमाणे ते सुटतात. नेहरू व सरदार यांच्यापैकी नेहरू कालवश होऊन पन्नास वर्षे होतील, तर सरदार जाऊन साठ वर्षे झाली आहेत. तेव्हा मोदी व अडवाणी या दोघांनी नेहरूंची देशांतील सर्व स्मारके दूर केली व सरदारांची तिथे उभी केली, तरी सामान्य लोक आहेत तिथेच राहणार आहेत. स्मारके बदलली म्हणून त्यांच्या जीवनात काही फरक पडणार नाही.
तथापि, आज या हिंदुत्वनिष्ठांना सरदार पटेल यांचा इतका पुळका आला असला तरी सरदार यांचे केव्हापासून झाले? अर्थात, नेहरूंच्या ऐवजी पटेलांकडे देशाची सूत्रे आली असती तर देश सुरक्षित व प्रबळ झाला असता, असा प्रचार संघ, हिंदू महासभा व नंतर भा.ज.प. यांचे नेते व प्रचारक सतत करत आले आहेत; पण अशी ही वकिली हे केव्हा करू लागले? पूर्वी सरदार पटेल यांच्याबद्दल हे हिंदुत्वनिष्ठ काय बोलत होते आणि लिहीत होते? पूर्वीच्या काळात गेल्यास असे दिसेल की, केंद्रीय विधिमंडळास जेव्हा अगदी मर्यादित अधिकार होते, तेव्हा मुंबईतून सर कावसजी जहांगीर हे धनाढ्य पारशी नेमस्त म्हणून उभे राहणार होते.
काँग्रेसने मुंबईतील ती जागा नरिमान या तरुण पारशास लढवण्यासाठी निवडले होते; पण नरिमान यांना कावसजी जहांगीर यांच्याशी स्पर्धा करायची नव्हती. निवडणुका लढवण्यासाठी आपले स्वत:चे नाव मतदारांच्या यादीत आहे की नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक होते. तशी तपासणी नरिमान यांनी करावी, असे त्यांना डॉ. बी. एन. देशमुख यांच्यासारखे काँग्रेसच्या वर्तुळातील लोक सांगत होते.
नरिमान यांनी आपले नाव यादीत असल्याची ग्वाही दिली; पण ते नव्हते. त्यामुळे काँग्रेसची धावाधाव झाली आणि
डॉ. देशमुख यांनी निवडणूक लढवली व जिंकली. नंतर 1937मध्ये प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या, तेव्हा मात्र नरिमान निवडून आले. त्यांना विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्रिपद हवे होते. मुंबई विधिमंडळ काँग्रेस पक्षाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पक्षाने सरदारांवर सोपवली होती. नरिमान यांनी अगोदर दिलेल्या दग्यामुळे सरदारच नव्हे, तर काँग्रेसजनच रागावले होते. तेव्हा नरिमान यांना बाजूला करून बाळासाहेब खेर यांची निवड झाली. त्याबरोबर सरदार पटेल हे नरिमान यांच्याच पक्षाने नव्हे, तर तेव्हाचे लोकशाही स्वराज्य पक्षवाले हिंदुत्ववादी, विविधवृत्त यांसारखी पत्रे यांनी टीकेचे लक्ष्य बनवले. खेरांसारखा आपल्या मुठीत राहणारा पटेलांना हवा होता; नरिमानसारखा स्वतंत्र बाण्याचा तडफदार नको होता, हा टीकेचा मुख्य सूर होता. नंतर नरिमान काँग्रेसबाहेर गेले आणि सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक काढल्यावर ते त्या पक्षात गेले; पण नरिमान यांना राजकारणात काही स्थान राहिले नाही.
पुढे 1937मध्ये प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका होऊन काँग्रेसला सहा-सात प्रांतांत मंत्रिमंडळे बनवता आली. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक संसदीय मंडळ नेमण्यात आले. त्यात आझाद इत्यादींबरोबर सरदार पटेल होते. त्या वेळच्या मध्य प्रांताच्या मंत्रिमंडळात वाद निर्माण झाला.
डॉ. ना. भा. खरे मुख्यमंत्री होते. रविशंकर शुक्ल, द्वारकाप्रसाद मिश्र इत्यादी मंत्री होते. नागपूर, विदर्भ व महाकोसल हा जबलपूर इत्यादी भाग मिळून मध्य प्रांत होता. खरे व हे महाकोसलचे मंत्री यांचे पटत नव्हते. तेव्हा काँग्रेसश्रेष्ठींनी असे फर्मान काढले की, सरकारी कामाखेरीज मुख्यमंत्री व मंत्री यांनी राज्यपालांकडे जाऊ नये. तक्रारी असतील तर त्या पक्षीय पातळीवर दूर कराव्यात. तथापि, खरे उतावीळ होते. त्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली. मग वाद चिघळला. जाहीर वाद झाले. खरे गांधींकडे गेले. संसदीय मंडळाबरोबर दोन्ही बाजूंनी बोलणी केली. पण खरे अधिकच संतप्त झाले. या तपशिलात जाण्याची गरज आज नाही. वाद वाढत गेल्यावर खरे यांना राजीनामा देण्याचा आदेश काँग्रेसश्रेष्ठींनी दिला. खरे यांनी लगेच डॉ. मुंजे यांच्याकडे धाव घेतली आणि मराठी विरुद्ध हिंदी, असा वाद रंगला. सरदार पटेल आणि महात्मा गांधी हे गुजराती म्हणून आपल्या विरुद्ध, असे आकांडतांडव खरे यांनी केले.
मध्य प्रांत व महाराष्टÑ यांतील हिंदुत्वनिष्ठ खरे यांना हुतात्मा मानू लागले. अपेक्षेप्रमाणे ‘विविधवृत्ता’ने सरदार पटेल आणि गांधी यांच्यावर टीकेची धार धरली. वास्तविक सरदार व गांधी या दोघांनाही शुक्ल व मिश्र या दोघांबद्दल आत्मीयता नव्हती. त्या वेळी लोकनायक बापूजी अणे हे काँग्रेसमध्ये होते. सरदारांनी त्यांना मध्य प्रांतातल्या या वादात मध्यस्थी करण्यास सांगितले.
अणे यांनी जमेल तितके प्रयत्न केले; पण दोन्ही बाजू टोकाची भूमिका घेत असून आपण काही करू शकत नाही, असे अणे यांनी सरदारांना लिहिले. पण महाराष्टÑ, मध्य प्रांत इत्यादी भागात हिंदुत्वनिष्ठांनी गांधी व सरदार यांच्यावर अत्यंत जहरी टीका चालू ठेवली. खरे यांना पाचपोच नाही आणि त्यांची मते केव्हा बदलतील याचा नेम नाही, असे ब्रिटिश गव्हर्नरने व्हाइसरॉयला लेखी कळवले. शुक्ल व मिश्र यांच्याबद्दल गव्हर्नरची मते अगदी वाईट होती.
मोदी, अडवाणी इत्यादींनी सरदार पटेल यांचे आपण रक्षणकर्ते असल्याचा आव आणला असला तरी अडवाणी व जसवंत सिंग यांनी जिनांची तरफदारी करून गांधी व नेहरू यांच्यावर फाळणीचे सर्व खापर फोडण्याचा मध्यंतरी उद्योग केला,
तो सरदारांना पसंत पडला नसता. कारण जिनांशी दीर्घकाळ वाटाघाटी करण्यात कालापव्यय न करता फाळणी करण्याची सरदारांची सूचना होती.नंतर महात्मा गांधींचा खून झाला. त्यात रा. स्व. संघाचा हात असल्याचे मानून केंद्र सरकारने बंदी घातली. मग बंदी उठवण्याचे प्रयत्न सुरू झाले. गृहमंत्री म्हणून सरदारांनाच हा प्रश्न हाताळायचा होता. संघाचा राजकारणाशी काही संबंध नसल्यामुळे त्याने घटना केली नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. सरदारांनी तो बिलकुल मानला नाही आणि घटना सादर करीपर्यंत बंदी उठणार नाही, असे बजावले. यामुळे घटना देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. तेव्हा सरदार संघाचे वा एकंदर हिंदुत्वनिष्ठांचे नव्हते.
फाळणीबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात तेव्हा झालेल्या सर्व वाटाघाटींत सरदार एक प्रमुख होते. काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव वारंवार केला असता ब्रिटिश संसदेच्या विधेयकाप्रमाणे स्वतंत्र भारताची घटना तयार होईपर्यंत वसाहतीचे स्वराज्य पत्करावे लागेल; मग काँग्रेसच्या अधिवेशनात कसे होईल, असे विचारून नव्या योजनेबद्दल काय करायचे, असा प्रश्न नेहरूंनी सरदारांना फोनवरून विचारला असता नवी योजना स्वीकारा; काँग्रेस अधिवेशनाचे मी बघतो, असे सरदारांनी ताबडतोब कळवले. असे ते सरदार मोदी, अडवाणींना समजले नाहीत आणि ते कधी सरदारांच्या बरोबर राहू शकले नसते.