आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळा हा आणि तो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातमधील सरदार सरोवराच्या परिसरात सरदार पटेल यांचा भव्य पुतळा होणार आहे. हा पुतळा राष्‍ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून जाहीर झाला आहे. येत्या निवडणुकीतील भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याच्या योजनेचा पुरस्कार केला असून कामाला प्रारंभही झाला आहे. या प्रकल्पासंबंधी लयला बावडम यांचा विस्तृत लेख ‘फ्रन्टलाइन’ या पाक्षिकात आला आहे. त्यावरून असे दिसते की, न्यूयॉर्कजवळील एलिस या बेटावरील स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याच्या दुपटीने आणि ब्राझीलमधील ‘रिओ-दि-जानिरो’ येथल्या येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याच्या चौपटीने उंच असा हा सरदारांचा पुतळा होईल. त्याची उंची असेल 240 मीटर म्हणजे 597 फूट! या संकल्पित पुतळ्याच्या आसपासची जमीन साफसूफ करण्यात आली असून विटांचे काही बांधकाम झाले आहे आणि मैदान तयार आहे. एक पोलिस ठाणेही उभे आहे.
पुतळ्याच्या आसपास एक करमणूक केंद्र; सभासंमेलनासाठी व्यवस्था; पुतळा केंद्रास भेट देणारांसाठी सुविधा; बगिचा इत्यादींची भर पडेल. एकूण खर्च अडीच हजार कोटी रुपयांचा होणार, असे सांगितले जाते. हा झाला आताचा अंदाज; नित्याप्रमाणे यात वाढ होऊन खर्चाचा आकडा चार वा अधिक हजार कोटीपर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको. हा भाग गरुडेश्वर नर्मदा म्हणून ओळखला जातो व त्याच नावाचा हा जिल्हा आहे. आदिवासींच्या तुरळक वस्तीचा हा भाग असून नर्मदा नदीच्या पात्राकडे त्याचा काही भाग वळतो. तेव्हा नदीच्या या भागात एक तलाव वा धरण बनवून नौका चालवण्याची व्यवस्था होणार आहे. तलावाची लांबी 1100 मीटर असेल आणि खोली 37.75 मीटर. प्रवाशांना यामुळे नौकाविहाराचे सुख भोगता येईल. या योजनेसाठी 400 कोटी खर्च होतील. त्यासाठी शेतक-यांच्या जमिनी आणि घरदार जाईल, पण राष्‍ट्रीय एकतेच्या स्मारकासाठी हे व्हायचे आहे!
तलावाच्या मध्यभागी सरदार पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा होईल. शेतक-यांची 280 एकर जमीन बुडेल. या सर्व प्रकल्पाच्या बाबतीत पर्यावरणाचाही प्रश्न येतो. त्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित खात्याची परवानगी हवी. लेखिकेने एका संबंधित अधिका-याच्या पत्राचा हवाला दिला आहे. तो पाहिल्यास या परवान्याची पर्वा केली गेली नसावी, असा निष्कर्ष निघतो. ही योजना राबवण्यासाठी ‘सरदार पटेल राष्‍ट्रीय एकता निधी’ अशी संस्था स्थापन झाली असून नरेंद्र मोदी हे अध्यक्ष आहेत. पुतळ्यासाठी अडीच हजार टन लोखंड लागणार असून प्रत्येकाने जेवढे लोखंड देणगी म्हणून देता येईल तेवढे द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चीनमध्ये पोलादाचे कारखाने काढून औद्योगिक क्रांती करण्यासाठी माओने चिनी लोकांना घरातली भांडीकुंडी देण्याचे आवाहन म्हणजे आदेश दिला होता. मोदी यांना तो आदर्श ठेवण्याची सूचना कोणी तरी केली असावी. (माओचे ते आवाहन वाया गेले.)
या भागात वस्ती तुरळक असेल, पण काही वस्ती आहे. प्रकल्पाच्या या सर्व भागाचा विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने केवडिया प्रकल्प प्राधिकरण स्थापन झाले आहे. या प्रकल्पासाठी नर्मदा जिल्ह्यातील 70 खेडी म्हणजे, 67 हजार चौरस मीटर क्षेत्र वापरले जाईल. त्यात शेती वगैरे होते. एकदोन एकराचे धनी असलेले हे शेतकरी आहेत. त्यांची जमीन बिनशेतीची म्हणून सरकारने जाहीर केली. यामुळे जमीन मालकांना शेतीची जमीन प्रकल्पाखाली गेल्यामुळे जी नुकसानभरपाई मिळायची, ती देण्याचे टळेल. यात शेतक-यांची नागवणूक आणि मोदींच्या अध्यक्षतेखालील प्रकल्पवाल्यांचा फायदा. या प्रकल्पाचा आरंभ 2005मध्ये झाला. पण बावडम सांगतात की, माहिती मिळणे अवघड असते. मिळते ती अगदी थोडी. सुरुंग लावून काम चालले आहे आणि सुरुंग लागण्याच्या वेळा एका फलकावर नोंदलेल्या असतात. न्यूयॉर्कजवळील एलिस बेटावरील स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचा इतिहास या संदर्भात लक्षात घेण्यासारखा आहे. अमेरिकनांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जेव्हा सशस्त्र प्रतिकार सुरू केला, तेव्हा फ्रान्सने अमेरिकेला जोरदार पाठिंबा दिला आणि सैन्य व शस्त्रास्त्रे यांची मदत पाठवली. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाला शंभर वर्षे पूर्ण व्हायची होती, तेव्हा फ्रेंच लोकांत नवे वारे निर्माण झाले. अमेरिकनांना स्वातंत्र्यदेवीचा पुतळा भेट म्हणून देण्याची कल्पना निघाली व तिला भरघोस पाठिंबा मिळाला. दोन देशांतल्या जनतेतील हा मित्रत्वाचा व्यवहार होता. ही कल्पना लोकमान्य झाल्यावर फ्रेडरिक ऑगस्ट बार्थहोल्डी या शिल्पकाराची निवड झाली. 1876मध्ये पुतळा तयार करण्याची कल्पना होती.
अमेरिकेने स्वातंत्र्याचा जाहीरनामा जाहीर केला, त्याच्या शताब्दीच्या मुहूर्तावर फ्रेंच जनतेकडून ही भेट दिली जाणार होती. पुतळा फ्रान्समध्ये तयार व्हावा आणि त्याची बैठक अमेरिकेत, असे उभयता मान्य झाले. काम सुरू झाले तेव्हा फ्रान्स व अमेरिका या दोन्ही देशांना पैशाची अडचण जाणवू लागली. मग फ्रान्समध्ये नृत्यसमारंभ, जलसे व इतर कार्यक्रमांबरोबरच लॉटरीही काढण्यात आली. अमेरिकेत असेच कार्यक्रम झाले. लॉटरी मात्र निघाली नाही. पुढील काळापासून आजतागायत वृत्तपत्रीय उत्कृष्ट कामगिरीबद्दल ज्याच्या नावे पुलित्झर पारितोषिक दिले जाते, त्या जोसेफ पुलित्झर याने स्वत:च्या ‘दि वर्ल्ड’ या दैनिकात जोरदार प्रचार सुरू केला. श्रीमंत लोक देणग्या देत नाहीत आणि श्रीमंत देतील, असे समजून मध्यमवर्गीय मूठ दाबून बसतात; यासाठी पुलित्झर याने दोन्ही वर्गांवर टीकेची झोड उठवली. याचा परिणाम होऊन देणग्या येत गेल्या. फ्रान्समध्ये पुतळ्याचे काम पुरे व्हायचे तर आपल्याला इंजिनिअरची लोखंडाच्या कामासाठी मदत हवी, अशी बार्थहोल्डी याची मागणी होती. पॅरिसमध्ये ज्याच्या नावे आयफेल टॉवर-मनोरा-उभा आहे, तो अलेक्झांडर गुस्टॉव्ह आयफेल हा मदतीसाठी पुढे आला. अमेरिकेत पुतळ्याच्या बैठकीसाठी लागणारा निधी 1885च्या ऑगस्टमध्ये जमा झाला आणि 1886मध्ये पायाही तयार झाला. एकीकडे फ्रान्समध्ये पुतळ्याचे काम 1884च्या जुलैत पूर्ण झाले. न्यूयॉर्कला तो बोटीने पाठवायचा, तर इतका मोठा एकसंध पुतळा नेणे शक्य नव्हते. मग पुतळ्याचे साडेतीनशे भाग करण्यात आले. ते सर्व 1885च्या जुलैत न्यूयॉर्कच्या बंदरात आले. पुतळ्याचे सर्व भाग एकत्र करण्यास चार महिने लागले आणि 28 ऑक्टोबर 1886रोजी स्वातंत्र्यदेवीचा पुतळा स्थानापन्न झाला. पुढच्या काळात काही बदल झाले. हा पुतळा 1901पासून युद्धखात्याच्या नियंत्रणाखाली आला. 15 ऑक्टोबर 1924रोजी अमेरिकेच्या अध्यक्षांनी पुतळा व फोर्टवूड हा भाग राष्‍ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केला. मग 1933मध्ये राष्‍ट्रीय स्मारकाचे नियंत्रण सुरू झाले. 11 मे 1965 रोजी बेटाचे नाव बदलून ‘एलिस’ ठेवण्यात आले. पुतळ्याची दुरुस्ती व देखभाल यासाठी निधी उभारण्याची गरज होती. रेगन अध्यक्ष होते. त्यांनी सरकार व खासगी देणगीदार यांच्याकडून निधीसाठी पैसे उभे केले. ती रक्कम आठ कोटी 70 लक्ष डॉलर्स इतकी होती. मग डागडुजी झालेला स्वातंत्र्यदेवीचा पुतळा 5 जुलै 1986 रोजी उभा झाला.
अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचे स्मारक हे कोणाच्या निवडणुकीच्या राजकारणातून किंवा पक्षीय राजकारणातून उभे झालेले नाही. तसेच लक्षात घेण्याची गोष्ट ही की, नरेंद्र मोदी यांना राष्‍ट्रीय ऐक्याचे प्रतीक उभारण्यासाठी आठवले ते सरदार पटेल. सरदार हे कर्तबगार, कारभारकुशल, त्यागी आणि निर्धारी नेते होते. महात्मा गांधी भारताच्या राजकारणात आल्यावर ते आले आणि अखेरपर्यंत ते गांधींचे अनुयायी म्हणून काँग्रेसमध्ये राहिले. राष्‍ट्रीय एकतेचे राष्‍ट्रीय स्मरण करण्यास मोदी यांना कोणी भाजपचा वा हिंदुत्वनिष्ठ नेता न सापडता काँग्रेसचा नेता मिळावा, हे बोलके आहे!
govindtalwalkar@hotmail.com