आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीपण दे गा देवा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालपण सरलं. तारुण्यात पदार्पण केलं. सगळ्यांचं होतं तसं माझंही लग्न झालं. पण सगळ्यांच्या सारखेपणात, खूप काही वेगळंही असतं, नाही का?
लग्नानंतर ओघानी येणारं आईपण आलं. आई होण्यातला आनंद वेगळाच. पण आमच्या वेळी नात्यात एवढा मोकळेपणा नव्हता - जेवढा आता आहे. मैत्रिणी भेटल्यावर नव-याविषयी बोलताना आणि वर्गातले मुलगे भेटले की कडेवर बाळाला घेऊन मिरवताना कुठे तरी लाजल्यासारखं व्हायचं. पण आजी झाल्यावर? आजी झाल्यावर मात्र फक्त आनंद आणि आनंदच झाला. संसारमंदिरावर चढलेला कळस म्हणजे आजीपण. आयुष्याच्या महाविद्यालयात मिळालेली खूप मोठी पदवी म्हणजे आजीपण. आयुष्याचं सार्थक म्हणजे आजीपण.
मला आठवतं, मला पहिली मुलगी झाली, तेव्हा माझ्या आईलाही असाच आनंद झाला होता. आम्हा भावंडात मी मोठी. मला मुलगी झाली तेव्हा आई सर्वांनाच कौतुकानं सांगत होती, ‘मी आजी झाले, आम्हाला नात झाली.’ स्त्री जन्माचं याहून वेगळं स्वागत काय असू शकतं? कालांतराने मीही नातीची आजी झाले.
तो बालजीव जवळ घेतला आणि आठवली ती सारी बालगीतं - जी मी माझ्या मुलांच्या बालपणी म्हणत असे. आधी डोळ्यांमधून दिसलेली ओळख. मग परक्या माणसानं जवळ घ्यायचा प्रयत्न केला तर गळ्याभोवती पडलेली घट्ट मिठी, बोलायला यायला लागल्यावर कानावर पडलेली मधुर हाक - आजी, आजी.
आजीपण हा समाजात मिरवायचा, मानाचा तुरा. आजीपण म्हणजे गौरवाने मिरवावा असा दागिना, आजीपण म्हणजे मऊ ऊबदार शाल!
नातीच्या सहवासात दिवसाचं सगळं गणितच बदलून जातं. तिची बडबड, तिचे लाडिक हट्ट. मुलं म्हणतात, आजी झाल्यावर तू खूप बदलली आहेस.
खरंच मी बदलले आहे. आता पत्नीपद मागे पडलं, आईपण विसरायला झालं. आता जे करायचं ते नातीसाठी.
नात चालायला शिकली तेव्हा लुटूलुटू चालत जवळ यायची. आणि हात पसरून म्हणायची ‘घे’. आजीवरचा हक्क किती नकळत समोर यायचा!
बोलायला शिकली. एकदा सहज गच्चीवरच्या कुंड्याजवळच्या मुंग्या तिला दाखवल्या आणि म्हटलं, ‘बघ ही मुंगी, हात नाही हं लावायचा. चावते ती.’
दुस-या दिवशी तिला मुंग्या दिसल्या. मला आवाज देऊन म्हणाली, ‘आजी, बघ मुन्नी.’ किती सहज बारसं केलं आम्ही मुंगीच. आज ही कुठे मुंगी दिसली की आम्ही तिचा उल्लेख मुन्नी असाच करतो. नात मोठी होतेय; पण आम्ही लहान होतोय का? नात मोठी होता होता, थोडा हट्टीपणा वाढायला लागला. चॉकलेटसाठी इतका हट्ट व्हायचा. मग आई रागावली की रडायला यायचं. चॉकलेट मिळालं की रडू पळून जायचं. सगळे म्हणायचे, रडण्याचं नाटक करतेस ना चॉकलेटसाठी.
मग रडणं आणि नाटक समीकरण तिच्या डोक्यात इतकं पक्क बसलं की -
नोकरीच्या निमित्ताने जावई, लेक आणि नात जेव्हा परदेशी गेले तेव्हा मला सारखं रडायला यायचं. पहिल्यांदा जेव्हा मी अशी रडले, तेव्हा गंमतच झाली. एक तर मोठ्या माणसांना असं रडताना पाहिलंच नव्हतं तीन वर्षांच्या वयात नातीने. मला असं रडताना पाहून, प्रसंगातलं वेगळेपण जाणवलं आणि नात एकदम म्हणाली, ‘हेऽऽ आजी नाटक करतेऽ’ रडता रडता आजीही हसायला लागली. असं हे गोडगोजिरं बालपण. आम्हा कुटुंबीयांसाठी संजीवनी.