आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्रेट भेट’ ही माझी शाळाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली पाच वर्षं ‘आयबीएन लोकमत’वर मी ‘ग्रेट भेट’ हा नामवंतांच्या मुलाखतींचा कार्यक्रम करतो आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पसरलेल्या विविध वयोगटांच्या प्रेक्षकांना आवडतो, ही तर महत्त्वाची गोष्ट आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे थोरामोठ्यांच्या आयुष्याच्या या कहाण्यांमधून आम्हाला प्रेरणा मिळते, असं तरुण मुलं सांगतात तेव्हा माझ्या दृष्टीने तो खरा समाधानाचा क्षण असतो. या मुलाखती पुस्तक किंवा सीडीच्या रूपाने प्रसिद्ध झाल्या तर कायमच्या संग्रही राहू शकतील, अशी सूचना गेल्या पाच वर्षांत अनेकांनी केली. ‘ग्रेट भेट’च्या या पुस्तकाच्या निमित्ताने ही अपेक्षा पूर्ण होत आहे. टेलिव्हिजनवरचा कार्यक्रम किंवा त्या कार्यक्रमाच्या जडणघडणीची कहाणी सांगणारी पुस्तकं पाश्चात्त्य देशांत मुबलक आहेत; पण भारतात अजून ही पद्धत सुरू झालेली नाही. या निमित्ताने टीव्हीच्या पडद्यावर बोलला गेलेला शब्द छापील स्वरूपात तुमच्यासमोर येतो आहे. छापील शब्दाचा परिणाम अधिक गहिरा असतो असं म्हटलं जातं. या पुस्तकातून हा अनुभव तुम्हाला मिळाला तर पुस्तकामागचा उद्देश साध्य झाला असं म्हणता येईल.

‘ग्रेट भेट’ हा कार्यक्रम 2008 मध्ये सुरू झाला तेव्हा तो एवढा प्रदीर्घ काळ चालेल आणि प्रेक्षक त्याला इतका उदंड प्रतिसाद देतील, असं टेलिव्हिजनमधल्या तज्ज्ञांना अजिबात वाटत नव्हतं. तब्बल एक तासाच्या मुलाखतीचे फारसे कार्यक्रम त्या वेळीही टीव्हीच्या पडद्यावर नव्हते आणि आजही नाहीत. पण मुलाखती सकस झाल्या तर प्रेक्षक निश्चितपणे पाहणार, याची मला खात्री होती. पहिल्या, म्हणजे सचिन तेंडुलकरच्याच मुलाखतीने हे सिद्ध केलं आणि ती मुलाखत तासभर नव्हे तर चक्क दीड तास दाखवावी लागली. सचिन या मुलाखतीत मनापासून बोलला. त्याचा खरेपणा, प्रामाणिकपणा, त्याच्या व्यक्तिमत्त्वामधला पारदर्शकपणा मुलाखतीत हळुवारपणे उलगडत गेला. आज पाच वर्षांनंतर ती मुलाखत पुन्हा टेलिकास्ट झाली तरी प्रेक्षक आवडीने पाहतात.
एका दृष्टीने ‘ग्रेट भेट’ ही माझी स्वत:ची शाळाच आहे. एकसुरीपणे या नामवंतांच्या प्रवासाकडे पाहायचं नाही, हे मी आधीच ठरवलेलं होतं. पत्रकार म्हणून मी माझं कौशल्य निश्चितपणे वापरत होतो, पण हा ‘आजचा सवाल’सारखा आक्रमक कार्यक्रम नाही, याचं भान मला होतं. म्हणूनच या कार्यक्रमाची शैली पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे या माणसांच्या यशाची कहाणी, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांचं अपयश, त्यांच्या आयुष्यातली भावनिक गुंतागुंत हलक्या हाताने उलगडण्याचा प्रयत्न मी केला. माणसाच्या कर्तृत्वाची बीजं त्याच्या बालपणात असतात असं म्हटलं जातं. या मुलाखतींमध्ये तेच दिसून आलं. या सगळ्यांची बांधिलकी, इतकी वर्षे काम केल्यावरही कमी न झालेला उत्साह, त्यांची अपार मेहनत आणि आपल्या ध्येयासाठी आयुष्य झोकून देणं, या गोष्टी मुलाखत घेताना मला जाणवल्या. खरं सांगायचं तर, एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने हे सगळं मी करत होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एरवी खुलेपणाने न बोलणारे अनेक दिग्गजही माझ्यापुढे मन मोकळं करत होते. याचं सगळं श्रेय त्यांच्या मनाच्या मोठेपणाला आहे. जणू काही हे दिग्गज आपल्या आयुष्याचं पुस्तकच वाचून दाखवत होते. आणि त्यामुळे अनेकांना ते आपल्या घरात आले आहेत, असं वाटतं. ते क्षण या पुस्तकामधून तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळतील, अशी आशा आहे.