आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लज्जतदार ' खुमार'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलेक पदमसी हे जाहिरात क्षेत्रातील ज्येष्ठ व दिग्गज व्यक्तिमत्त्व. जाहिरात क्षेत्रासह ते रंगभूमीवरही तितक्याच निष्ठेने कार्यरत होते, त्यामुळे त्यांनी आपल्या आत्मचरित्राला नाव दिले ‘अ डबल लाइफ’. बिपिन पंडित हेही अ‍ॅड क्लब बॉम्बेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या नात्याने जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्याशिवाय ते क्रिकेटमधील दर्दी आहेत, अँकर आहेत, मिमिक्री आर्टिस्ट आहेत. संगीताचे शौकीन असल्याने ‘खुमार’ नावाचा सांगीतिक कार्यक्रम ते सादर करतात. जाहिरात क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींबरोबर बिपिन यांचा घनिष्ठ संबंध असल्याने, त्यांच्या ‘खुमार’ या कार्यक्रमासाठी या व्यक्ती हजर राहत. नंतर त्या गाण्याविषयी, गायक-संगीतकारांविषयी उत्कटतेने बोलत. इतकेच नव्हे तर त्यांना या विषयाचे सखोल ज्ञान आहे, हेसुद्धा बिपिन यांच्या लक्षात आले. त्यांनी मग विचार केला, या जाहिरात क्षेत्रातील नामवंतांना त्यांच्या आवडीच्या गायक, संगीतकाराविषयी लिहायला लावले तर? या कल्पनेतूनच पुढे आकारास आले ‘खुमार-एक्सपीरियन्स म्युझिकल इनटॉक्सिकेशन’ हे पुस्तक. या पुस्तकात ‘ओगिल्वी अँड मॅथर’चे (ओ अँड एम) चेअरमन पीयूष पांडे यांनी अमिताभ बच्चनवर एक गायक म्हणून लेख लिहिला आहे. त्यासाठी त्यांनी अमिताभची तीन वेळा भेट घेतली आणि प्रत्येक भेटीबद्दल बिपिन यांनाही सांगितले.

‘ओगिल्वी अँड मॅथर’चे व्हीसी मधुकर सबनवीस यांनी मोहंमद रफीविषयी लिहिले आहे. याशिवाय अर्थतज्ज्ञ नंदकिशोर देसाई यांनी लता आणि आशा यांच्यावर लेख लिहिला आहे. पुस्तकात लेख लिहिणा-या इतर काही दिग्गज व्यक्ती आहेत सुभाष कामत, सीव्हीएल श्रीनिवास, एमजी परमेश्वरन, मदन सांगलीकर, परितोष जोशी, प्रदीप गुहा, हेमंत केंकरे, भरत दाभोळकर, अजय चांदवानी, गोकुळ कृष्णमूर्ती, अपूर्व पुरोहित आदी. तसेच चैतन्य पदुकोन, नरेंद्र कुस्नूर, अयाज मेमन, राजीव विजयकर इत्यादी काही नामवंत पत्रकारांचेही लेख यात आहेत. विशेष म्हणजे संगीतकार अनिल विश्वास यांच्या पत्नी व गायिका मीना कपूर-विश्वास यांनी त्यांची मैत्रीण गायिका गीता दत्त यांच्यावर लेख लिहिलेला आहे. स्वत: बिपिन पंडित यांनी शम्मी कपूर व रफी या कॉम्बिनेशनमुळे आकारास आलेल्या जादूची आठवण काढली आहे. त्याशिवाय संगीतकार प्यारेलाल यांची मुलाखत आहे. त्यात संगीतावर चर्चा करण्यासाठी राज कपूर स्वत: प्यारेलाल यांच्या घरी जात, त्यात त्यांचा अहं कधी आड आला नाही, ही माहिती वाचकांपर्यंत पोहोचते. बिपिन यांनी महेंद्र कपूर यांचा मुलगा रोहन कपूर यालाही बोलते केले आहे. पुस्तकातून आपल्याला लता, आशा, रफी, किशोर, मुकेश भेटतातच आणि त्याचसह मन्ना डे, हेमंतकुमार, येसुदास, कुमार सानू, फरिदा खानम, एसपी बालसुब्रमण्यम इत्यादी गायक भेटतात; तसेच सलील चौधरी, एसडी व आरडी बर्मन, इल्याराजा, मदनमोहन असे दिग्गज संगीतकारही भेटतात. या पुस्तकाच्या निमित्ताने बिपिन पंडित यांच्याशी संवाद साधला. स्टेजवर ते मिमिक्री आर्टिस्ट व निवेदक म्हणून गेली तेवीस वर्षे वावरत आहेत. त्याबाबत ते म्हणतात, इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत माझ्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले. नंतर त्यांनी हिंदी-उर्दूवर प्रभुत्व मिळवले. संगीतकार प्यारेलाल यांना हे ‘खुमार’ पुस्तक आवडले आणि त्यांनी बिपिनना सुचवले आहे की, प्रत्येक दशकाच्या सर्वोत्तम गाण्यांवर पुस्तक तयार करा. यापेक्षा मोठी दाद ती काय? या पुस्तकाची निर्मितिमूल्ये उत्तम आहेत. काही दुर्मिळ छायाचित्रे त्यात आहेत. कॉफी टेबल बुक असल्याने मुखपृष्ठ कॉफी कलरचे व त्यावर अर्धी गिटार अशी कल्पकता आहे.
खुमार-एक्सपीरियन्स म्युझिकल इनटॉक्सिफिकेशन,
संकलन- बिपिन पंडित पाने- 129, किंमत- 1200 रु.