आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्‍तक ओळख : युगपुरूषाची वास्तव कथा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहासपुरुषांवर वस्तुनिष्ठ लिखाण करणे ही अस्मितेचे राजकारण होत असल्याच्या काळात अवघड बाब म्हटली पाहिजे. लौकिकार्थाने चरित्र लिहिण्याऐवजी ‘युगद्रष्टा महाराजा’ ही महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर कादंबरी लिहिताना बाबा भांड यांनी नेमका हाच विचार केला असावा. स्मिता भागवत व अविनाश कप्तान यांनी सयाजीरावांचे चरित्र काही वर्षांपूर्वी मराठी तसेच इंग्रजीत प्रकाशित केले आहे. तरीही बाबा भांड म्हणतात त्याप्रमाणे ‘मराठी राजा’ म्हणून गुजरातने व ‘गुजरातचा राजा’ म्हणून महाराष्ट्राने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असण्याची शक्यता जास्त. अर्थात, बडोदेकरांना सयाजीरावांविषयी प्रेम व माहिती होतीच व आहेही. शिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याचे श्रेयही मराठी माणूस त्यांना देत नाही, याची खंतही त्यांना वाटते.


अपघाताने राजा झालेल्या या माणसाने, एक विश्वस्त या भावनेने बडोद्याचा राज्यकारभार केला आणि मिळालेले राज्य ही शिक्षणाची संधी मानून सतत नवनवीन जाणून घेण्याची जिज्ञासा ठेवली. चांगले ते सर्व बडोदे संस्थानात असलेच पाहिजे, या आग्रहामुळे विसाव्या शतकात बडोदे संस्थान हे भारतातील सर्व संस्थानात विकसित संस्थान ठरले. उत्तम रस्ते, भूमिगत गटारे, विश्वामित्री नदीवर बांधलेले आजवा धरण व तिथून बडोद्याच्या नागरिकांना नळाने पुरवलेले पाणी, गरीब नागरिकांना वेळ कळावी म्हणून शहरांत ठिकठिकाणी बांधलेले घड्याळांचे मनोरे, कमाठी (कमिटी) बागेतले वस्तुसंग्रहालय तसेच प्राणी संग्रहालय यातून हा विकास दिसतोच; तसेच सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण अनिवार्य तसेच मोफत, यातूनही दिसतो.

मुलींनाही हे शिक्षण सक्तीचे होते. त्यामुळे बडोद्यातील सर्व जातींच्या मुलींमध्ये शिक्षणाची परंपरा रुजली. तसेच कुठल्या शिक्षणाचा आपल्या राज्याला उपयोग होईल याचा विचार करून, तशी शिक्षित मंडळी देशात वा परदेशात आढळल्यास त्यांना आमंत्रण देऊन, त्यांना बडोदे राज्यात नोकरी देणे व तशी मंडळी न आढळल्यास, डॉ. आंबेडकरांप्रमाणे अन्य राज्यांतील हुशार विद्यार्थ्यांस हेरून त्यांना शिष्यवृत्ती देऊन परदेशी पाठवून तयार करणे, अशी असंख्य उदाहरणे पुस्तकात लेखकाने जागोजागी दिलेली आहेत. त्याही पूर्वी जोतिराव फुले यांच्या कार्याचे महत्त्व जाणून सयाजीरावांनी त्यांना ‘शेतक-याचा आसूड’ हे पुस्तक छापण्यास आर्थिक मदत केली. तसेच वैदिक धर्म अभ्यास व पूजापाठ विशिष्ट जातींनीच करावे याला काही धर्माधार नाही, म्हणून वैदिक पाठशाळा काढून त्यात प्रवेश परीक्षा घेऊन सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. परंतु ब्राह्मणेतरांचे प्रमाण त्यात ‘बारा आणे’ ठेवावे, असेही निर्देश दिले. पुस्तकातील प्रतिपादनानुसार कर्मवीर भाऊराव शिंदे यांनी सयाजीरावांपासून प्रेरणा घेतली व महाराष्ट्रातील गरीब मुलांना शिक्षण दिले.

युरोपमध्ये वाचनालये पाहून आल्यावर बडोदे येथे शासकीय वाचनालय, तालुक्यात वाचनालये काढलीच; परंतु पुस्तकाच्या पत्र्याच्या पेट्या तयार करवून त्या गावोगावी फिरवण्याची व्यवस्था केली. इंग्रज देशातून निघून जावेत, यासाठी सयाजीरावांनी खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय मदत केली. राज्यात सुव्यवस्था व सुबत्ता आणून तटस्थ इंग्रजांची मने जिंकली. त्यामुळे कुठल्या तरी छोट्या-मोठ्या प्रकरणात गुंतवून, त्यांना बडतर्फ करण्याची संधी शोधणा-या इंग्रजांना ती संधी मिळेना. स्वातंत्र्य चळवळीतील सर्व त-हेच्या लोकांना साह्य करूनही त्यांच्याविरुद्ध एकही पुरावा सरकारला न सापडल्याने, त्यांचे व इंग्रज सरकारचे कायम उंदरा-मांजराचे सख्य राहिले. बडोद्यात त्यांनी खेळ व बल संवर्धनास महत्त्व दिले. त्यासाठी प्रो. माणिकराव यास मदत केली. माणिकरावांच्या आखाड्यात वसतिगृहात अनेकदा लहान क्रांतिकारक मुलांना नावे बदलून शिक्षण पुरे होईपर्यंत ठेवले जायचे. सयाजीरावांची स्त्री शिक्षणाची कळकळ म्हणजे केवळ तोंडदेखलेपणा नव्हता, तर अशा शिकलेल्या स्त्रियांना-जसे डॉ. रखमाबाई राऊत तसेच गंगुताई पटवर्धन यांना सन्मानाने बडोदे राज्यात नोकरी दिली. सयाजीरावांचे तितकेच महत्त्वाचे काम संगीत क्षेत्रातले होते. लेखकाने एका वाक्यात हा विषय संपवला आहे. कादंबरीत किती काय काय यावे याला मर्यादा असतात. तरीही हिंदुस्थानी संगीत पद्धतीला एकसंध व्यवस्था (युनिफॉर्म सिस्टिम) देण्याच्या भातखंडे यांच्या प्रयत्नांना, विषय समजून घेऊन सयाजीरावांनी संपूर्णपणे साथ दिली. संगीताबरोबरच दुसरा महत्त्वाचा विषय कादंबरीत बराच सविस्तरपणे आला आहे; तो म्हणजे, महत्त्वाच्या ग्रंथांचे इंग्रजीतून मराठी व गुजरातीत अनुवाद करवणे. त्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन करून त्यांना बजेट ठरवून दिले, सरदेसार्इंकडून मराठा रियासतीचा इतिहास लिहून घेतला.


‘आहारशास्त्रा’वर ग्रंथमाला, तसेच इतरही अनेक आवश्यक विषयांवर पुस्तके लिहून घेतली. महाराष्ट्रात नवे, आधुनिक व समाजोपयोगी काहीही करणा-यास त्यांनी सढळ हस्ते मदत केली. त्याचप्रमाणे विधवा विवाह कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा वगैरे कायदे त्यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच आपल्या संस्थानात केले. जो कायदा करण्यास भारताला स्वातंत्र्याची वाट पाहावी लागली, तो घटस्फोटाचा कायदा बडोद्यात 1931मध्येच अमलात आला. सामाजिक क्षेत्रात शिवराम जानबा कांबळे व श्रीपतराव थोरात यांचा राजमहालात सत्कार करवून त्यांच्या शेजारी पंगतीला बसून जातिभेद नष्ट करण्याच्या स्वत:च्या उक्तीला कृतीचीही जोड दिली. इतिहासाचा पोकळ अभिमान धरण्यातले धोके त्यांनी सतत दाखवून दिले. त्यांनी म्हटले की, मराठा राज्य केवळ 200 वर्षे टिकले. जगाच्या इतिहासात हा काळ फारच छोटा, त्यामुळे जगावर त्याचा परिणामही फारसा नाही. असे का झाले, त्याचा अभ्यास करावा व त्याचा वृथा अभिमान धरण्याऐवजी त्यातून शिकावयास हवे. मराठी राज्य टिकले नाही, कारण जातींनी आणि वेडगळ धार्मिक समजुतींनी आपला समाज दुबळा झाला होता. विवेकाने त्यावर मात केली पाहिजे. आजही त्यांचे म्हणणे योग्य वाटते. असे बरेच या कादंबरीत आहे. महाराष्ट्रातील जेवढे जास्त लोक ही कादंबरी वाचतील, तेवढे सयाजीरावांचे ऋण फेडले जाईल.
vasantidamle@hotmail.com


युगद्रष्टा महाराजा, लेखक : बाबा भांड
साकेत प्रकाशन 2012, किंमत : 300 रु. पाने 528