आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्‍यासबिभ्‍यास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज माझ्या पोटात दुखतंय. मला शाळा नको, कोजागिरी अशी फर्माइश मधूनमधून करायची. ‘चालेल, उद्या मी तुला बरे नव्हते अशी चिट्ठी देईन,’ असे म्हणत शांता कोजागिरीला पाळणाघरात सोडायला जाते. ‘तुम्ही मुलीचे फारच लाड करता. शाळेला जायचे म्हणजे मुलांच्या पोटात दुखतेच. असे तिचे ऐकून कसे चालेल?’ पाळणाघरातील बाई म्हणाल्या. हे ऐकून घेण्याची सवय शांताला होती. मुलांच्या मनात नसताना त्यांना दामटून कशासाठी शाळेत पाठवायचे, असे शांताला वाटायचे. नोकरीचा लकडा नसता तर तिने कोजागिरीला घरीच शिकवले असते. मुलाला बघण्याचा वेळ वाढल्याने पाळणाघरातील बाई असे म्हणत असतील. किंवा मुलीचे शांता खरोखरच खूप लाड करत आहे असे त्यांना वाटत असेल. शांताच्या ऑफिसमधील आणि इतर मैत्रिणींचा, अभ्यासाबद्दल असाच विचार होता. ‘तुझ्या मुलीचा वर्गात दोन अंकी नंबर येतो याचे तुला कसे काही वाटत नाही? अरे, गृहपाठ करायलाच पाहिजे. मार्क मिळवण्याची सवय पहिल्यापासून लावायला हवी. स्पर्धा केवढी आहे. मोठेपणी जड जाते.’ हे सर्व शांता ऐकून घ्यायची. आजी कधी कोजागिरीला विचारायची, ‘एवढा लांबचा नंबर कसा गं तुझा? माझ्या मुलाचा म्हणजे तुझ्या बाबाचा नंबर वरचा यायचा.’ त्यावर कोजागिरीचे उत्तर असे, ‘आजी, सातवीपर्यंत अभ्यास करत नाहीत. नुसता दंगामस्ती आणि खेळ करतात. मी हुशार आहे. माझा नाही, पण माझ्या मुलीचा नक्की पहिला नंबर येणार.’ अभ्यासाच्या कचाट्यातून कोजागिरीने आपली अशी सुटका करून घेतली होती.

‘बाबा, मलाही अनाघासारखे स्कॉलरशिपला बसायचे आहे. पण बाई सांगतात फक्त अ तुकडीतील मुलांनाच परवानगी आहे,’ कोजागिरी रडवेली होऊन सांगत होती. मार्काच्या मागे न लागल्याने कोजागिरीची तुकडी चौथी अ नव्हती. स्कॉलरशिपला बसणे एवढे महत्त्वाचे नाही. जाऊदे, शांता समजूत काढत होती. ‘कोजागिरी, तुला परीक्षेला नक्की बसायचे आहे का?’ बाबाने विचारले. ‘हो, अनघा बसते न म्हणून मला बसायचे आहे.’ कोजागिरीचा हट्ट कशासाठी होता हे दोघांच्या लक्षात आले.

शाळेकडून परीक्षेला बसण्याची व्यवस्था होणार नव्हती. कारण ती अ तुकडीत नव्हती. चौकशी करून शिक्षण खात्यातून बाबाने अर्ज मागवला आणि स्वतंत्रपणे भरला. परीक्षेचा अभ्यास, क्लास असे विशेष धसोरा लावून काही करून घेतले नव्हते. मार्क कमी पडल्याने अ तुकडीत नसूनही, जर स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसायचे असेल तर बसता येते एवढेच कोजागिरीला समजणे आवश्यक होते, असे बाबाला वाटायचे. शांताचे म्हणणे, कशाला आपणाला आवडत नसेल त्या वाटेवर जावे? आवडणा-या गोष्टी मन लावून करायला शिकवल्या तरी खूप झाले, असे होते.
शाळेच्या अभ्यासात मार्क आपोआप पडतील. मन लावून एखादी गोष्ट करणे, याची गोडी लागणे महत्त्वाचे आहे असे शांताला वाटायचे. दररोज सकाळी तासभर कोजागिरीबरोबर काही तरी करायचे, असे त्या दोघींनी मिळून ठरवून टाकले होते. शाळेतल्या अभ्यासावर आधारित गोष्टी, कविता, गाणी आणि गप्पा, तसेच चित्र काढणे, मातीकाम अशा किती तरी गोष्टी होत्या. अभ्यास या सर्वांबरोबर व्हायचा. मुख्य म्हणजे कोजागिरीला एका ठरावीक वेळेसाठी एका ठिकाणी बसून काम करण्याची सवय लावायची होती. शांतालाही रोज नवीन गोष्टी तयार ठेवायला लागायच्या. कोजागिरीला कामाला लावले की शांता मोकळी, असे होत नसे. त्या दोघी मिळून काम पूर्ण करत होत्या. असे वर्षभर केल्यावर कोजागिरीला एका जागी बसून वाचणे, लिहिणे, कातरकाम, रंगकाम, मातीकाम करणे अशी सवय लागली. चांगली कविता लक्ष देऊन ऐकणे, स्वत: म्हणणे, अर्थ समजावून घेणे, चांगले चित्र नीट सावकाश पाहणे, प्रसंगी त्याच्यावरून हात फिरवणे, काही प्रश्न विचारणे, स्वत: चित्र काढणे, नाटकं-चित्रपट-नृत्य पाहणे अशा अनेक गोष्टी करण्यात तिला आनंद वाटू लागला. तिच्या डोक्यातील चक्रे चालू आहेत आणि तिचे छोटे हात काही करण्यासाठी धडपडताहेत हे पाहून शांताला आपले प्रयत्न योग्य दिशेने आहेत असे वाटले. कोजागिरीचा बाबाही शांतासारखा विचार करायचा. दोघांनी कोजागिरीवर अभ्यासाची कधीही सक्ती केली नाही. उलट तिला अभ्यास करायचा नसेल त्या वेळी चालेल अशी भूमिका ठेवली होती. यथावकाश कोजागिरी आपोआपच अपेक्षेप्रमाणे अभ्यासाला लागली.
aruna.burte@gmail.com