आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोटांतली चिमणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोण्या एका आजीने एका द्वाड नातवाला सकाळी अभ्यासात लक्ष लागावे म्हणून एक हजार वेळा “ॐ श्री सरस्वत्यै नमः” लिहायला सांगितले. नातू तसा आज्ञाधारक! संध्याकाळपर्यंत आजीच्या हाती बाड ठेवले. आजीने कौतुकाने उघडले. तर काय? सगळ्या झेरॉक्स!
“अशाने कसला रे डोंबल फायदा?”
“का बॉ? मीच कॉपी-पेस्ट केलंय नं! मीच केलं झेरॉक्स!” आजी गपगार! नातू ढुंगणाला पाय लावून पसार!
खरेच का नाही ‘लिहीत’आपण आजकाल? सारखे ‘टाइप’ का करतो? किंवा झेरॉक्स!
आपलं अक्षर हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग का मानत नाही आपण? सेल्फी काढताना आपली हसण्याची खास स्टाइल
असते, तसा? पूर्वी खाऊच्या पुड्या यायच्या. अक्षरांवरून कळायचं : चकली अंजली मामीकडची, लाडू आजीचे. आवडत्या
नातेवाइकांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या आपल्या नावाचं जाम कौतुक वाटायचं. आई परत गेली तरी तिच्या सुंदर
हस्ताक्षरातल्या डब्यांवरच्या चिठ्ठ्या उदबत्तीच्या धुरासारख्या दरवळतात.
आपल्या बोटांत एक चिमणी असते विखुरलेली. तिला समेटून कागदावर का नाही उतरवत? “कुठे असते चिमणी?”
विचारताय? पेन पकडतोय अशी कल्पना करत अंगठा-तर्जनी जुळवा. नखांची चोच. बोटांचे शरीर. झाली चिमणी! आता
नाचवा मनभर कागदावर. आपलं जग, निबेच्या टोकावर कसं येऊन बसतं, शाईच्या कागदाच्या विविध रंगांत-पोतांत-भावना, विचार कशा गिरक्या घेतात, समेवर येतात, एकेक शब्द रक्तामांसातून घामासारखा कसा ओघळतो, त्या मैफलीत रंगणं; विलक्षण अनुभव आहे!
जगभरचे मानसशास्त्रज्ञ, मेंदूतज्ज्ञ संशोधन करताहेत. मेंदूच्या आजारांना दूर ठेवणे, आठवण पक्की करणे, विषय नीट समजून घेणे, डिस्लेक्सिया सुसह्य करणे यासाठी हाताने लिहिण्याला पर्याय नाही, असेच निष्कर्ष आहेत. म्हणून तुम्ही आज “हस्ताक्षरात” काही तरी लिहावंच, असा माझा प्रेमाचा हट्ट आहे! प्लीज जुळवा बोटं; नाचवा चिमणी! अशा स्व-अक्षरातल्या संकल्पांना सिद्ध करण्यासाठी कोणत्याही देवाला धावून येणे भाग पडेल! वर्षभर तुमची चिमणी नाचो, तिच्या पावलांनी तुमची स्वप्ने खरी होवोत, हीच प्रार्थना!
mkspostbox@gmail.com
बातम्या आणखी आहेत...