आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोडं प्रॅक्टिकल होऊयात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या आपला स्वातंत्र्यदिन. हल्ली एक उत्सवच झालाय तो. मोठमोठ्याने देशप्रेमाची गाणी लावून तो साजरा करणं कितपत पटतं तुम्हाला? मुंबईपुरतंच बोलायचं झालं तर इथल्या लोकांना फारशी आपुलकी किंवा जिव्हाळा नाहीये एकूणच उत्सवांबद्दल. कारण त्याने नुसता त्रासच होतो. गणेशोत्सव, छठ, होळी, ईद, नवरात्र असे असंख्य सण. सण असे सार्वजिनकरीत्या साजरे केल्याने काय साध्य होतं? आवाज, त्रास, वेळेचा अपव्यय, प्रदूषण, असुरक्षितता, निसर्गाचा ऱ्हास. आपल्याकडे वर्षभर काही ना काही सुरूच असतं. जो तुमचा धर्म असेल तो आपापल्या घरात साजरा करा. आधीच मुंबईचा समुद्र वा सगळीकडच्याच नद्या आणि सांडपाण्याची गटारं यात फरक करणं कठीण होऊन बसलंय. सणांनंतर चौपाट्यांची, तलावांची, नद्यांची, घाटांची अवस्था दयनीय झालेली असते. प्रत्येक गणेशोत्सवात तर गणपतींच्या संख्येत वाढच होत असते.
‘यंदा आमच्याकडे यायचं बरं का, दीड दिवसाचा आहे.’
नको रे. माफ करा, त्या बाप्पाला आणि टिळकांना. केवढी ती शिक्षा त्यांना.
तीच गत ईदला, शिवजयंतीला, दांडियाला.
मार्च महिन्यात, उन्हाळा तोंडावर अालेला असताना, गावात पाणी नसताना प्यायला, होळ्या पेटवून आपण रंगपंचमीला पाण्याची नासाडी करतो. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पाणी भरून रस्त्यावरच्या लोकांच्या अंगावर फेकतो ते वेगळंच. घरात का नाही करू शकत हे आपण? उदा. कपडे वाळत घालण्याच्या दोरीला हंडी बांधून, नवराबायकोच्या खांद्यावर मुलांना उभं करून फोडा की हंडी! बाथरूममध्ये गुलाल लावून उभे राहा शाॅवरखाली. सण आणि आंघोळ एकत्र.
रोजच्या आंघोळीच्या बादलीत नको, विसर्जनाची एक बादली पुरोहिताकडून शुद्ध करून घ्या, आणि बाप्पाचं विसर्जन करा त्यात. आम्ही काय करतो? बाप्पा येतो माझ्याही घरी, पण चांदीचा. तो लाॅकरमधून बाहेर येतो आणि दीड दिवसांनी आंघोळ करून लाॅकरमध्ये परत जातो. सजावटीसाठी असतात मोजकी फुलं आणि गजरे. माझ्या परीने मी एवढी नक्की करतो. आणि तुम्ही?
(क्रमश:)