आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पैस’च्या भेटीला आले गुलजार...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘ज्ञानेश्वरी’च्या रचना स्थानाकडे मराठी सारस्वतांनी दुर्लक्ष करीत उदासीनता दाखवलेली असताना उर्दू व हिंदी भाषेत शायरी करीत मुशाफिरी करणारे प्रसिद्ध साहित्यिक गुलजार यांनी आपली पहिली मराठी साहित्य कलाकृती नेवाशाला येऊन संत ज्ञानेश्वरांच्या ‘पैस’ला (पैशाचा खांब -जिथे संत झानेश्वरांनी त्या खांबाला टेकून बसून ज्ञानेश्वरी लिहिली तो पैसचा खांब) अर्पण केली. साहित्य क्षेत्रातील ही मोठी सांस्कृतिक घटना ठरली.

गुलजार यांनी लिहिलेल्या ‘देवडी’ या कथासंग्रहाचे प्रकाशन व अर्पण सोहळा मोठ्या दिमाखात झाला. यातील कथांचे भाषांतर अंबरीश मिश्र यांनी केले असून अरुण शेवते यांच्या ऋतुरंग प्रकाशनाने हा संग्रह प्रकाशित केला आहे. या वेळी आमदार शंकरराव गडाख, प्रशांत गडाख, प्रकाशन अरुण शेवते, ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त व नेवाशातील साहित्यप्रेमी उपस्थित होते.

मराठी साहित्याला सुरुवात करताना पहिले मराठी अक्षर शिकण्यासाठी आपण नेवाशाला आलो होतो. आयुष्यातील काही घटना व अनुभव आपण राहत असलेल्या महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी येथे येऊन साहित्यिक वर्तुळ पूर्ण केल्याची भावना गुलजार यांनी या वेळी व्यक्त केली. ज्ञानेश्वरांचा जन्मदिवस ‘मराठी दिन’ म्हणून साजरा व्हावा, या दिवसापासून लहान मुलांचे शिक्षण सुरू व्हावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा, तसेच ज्ञानेश्वरांविषयी गुलजार यांनी व्यक्त केलेल्या आदराचे सर्वांनाच अप्रूप वाटले.

ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या ‘सहवास’ या पुस्तकाचे प्रकाशन याच ठिकाणी झाले होते. पंढरपूरच्या ‘पंढरी संदेश’चे कै. गोपाळराव बेणारे यांच्या पुस्तकाचे व ‘पंढरी संदेश’ या साप्ताहिकाचे प्रकाशन ज्ञानेश्वर मंदिरात झाले होते. मात्र, एखाद्या साहित्यिकाने आपली कलाकृती पैस खांबाला व ज्ञानेश्वरांना अर्पण करण्याची ही पहिलीच घटना. असे समर्पण आजवर एकाही मराठी साहित्यिकाने दाखवलेले नाही. गुलजारांची कृती मराठी सारस्वतासाठी अनुकरणीय ठरावी.

पद्मभूषण, सात वेळा राष्ट्रीय पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, 20 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या गुलजार यांच्या प्रत्येक कलाकृतीतून वंचितांच्या वेदना व समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’च्या विश्वबंधुत्वाच्या संदेशच सर्वांपर्यंत पोहोचवतो. पुस्तक अर्पण करून आपणही संत ज्ञानेश्वरांच्या संदेशाचे वारकरी असल्याचे गुलजार यांनी दाखवून दिले...