आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी तर तुझा गुलमोहर वेडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुंद हिरवा, मोहर गहिरा
वसंत आला हासत गं, हासत गं
आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं हे गाणं. वसंताचं गुणगान करणारं. खरंच वसंत म्हणजे जुन्याच जीवनाचा पुन्हा नव्यानं जन्म. वसंत म्हणजे उत्सव गंधाचा, मधुर नादाचा, सुरेख स्वादाचा, नवचैतन्याचा अन् मानवी जीवनाचाही. त्याचं येणं सा-यांनाच किती हवंसं असतं. चैत्र महिना म्हणजे माथ्यावर आग ओकणारा सूर्य, उष्ण झळांनी हैराण झालेलं मानवी जीवन पण याच वेळी वसंत येतो, मनाला आलेली सारी मरगळ झटकून टाकतो. रणरणत्या उन्हातही झाडांना बहर देणारा, सुगंधाची उधळण करीत मनाला छानसा गारवा देणारा वसंत आपल्याला संदेश देतो की प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता हासत राहा, जीवनाचा प्रत्येक क्षण साजरा करा. पानांची नाजूक सळसळ, कोकिळेचे मधुर कूजन शीळ घालत फिरणारा बेधुंद रानवारा ही सारी सारी वसंताची सुंदर रूपं. ही सारी सुंदर रूपं डोळ्यात साठवताना सृष्टीचं सौंदर्य डोळे दिपून टाकतं. माझी बाग सा-या फुलांनी अगदी डवरली होती. गडद हिरव्या नाजूक पानामधून पांढ-या शुभ्र छोट्यामोठ्या गुलाबाचा ताटवा अगदी उठून दिसत होता. ताठ मानेनं उभा रेखीव निशिगंध मुक्तपणे सुगंधाची उधळण करीत होता. आपल्याच भारानं वाकून सुकलेल्या वेली अंगभर चांदण फुलं लपेटून सुरेख हासत होत्या. अबोली गच्च बहरली होती. नेहमी हसतमुख असलेली पांढरी गुलाबी साधीसुधी सदाफुलीही छान फुललेली होती. सा-या कुंपणाला आपल्या गर्द गुलाबी, पांढ-या केशरी रंगाच्या फुलांनी लपेटून टाकणारी बोगनवेल तर अगदी वेडावून टाकत होती. अंगभर फक्त फुलांनीच मोहरलेला चाफा खुलून दिसत होता. फक्त फुलांचीच नाही तर इतर झाडेही छान मोहरली होती दूरवरचा कडुनिंब हिरव्या पानांसोबत पांढ-या नाजूक फुलांनी गोजिरा दिसत होता आणि या सगळ्यांसोबत पण सगळ्यांहून निराळा दिमाखदार डौलदार लाल-केशरी फुलांनी फक्त फुलांनीच डवरलेला गुलमोहर. शीतल गारवा, तृप्तता देणारा, आयुष्याला उभारी देणारा ‘वसंतराजा गुलमोहर’.
कधी कधी निसर्गात घडणा-या काही मोहक गोष्टी खूप काही सुखाचे क्षण आपल्या ओंजळीत सहजपणे टाकतात. नेहमीप्रमाणेच वसंत ऋतूत गुलमोहरानं फुलायला सुरुवात केलीय. लाल केशरी फुलांनी तो छान बहरतोय हे पाहून छानशी गिरकी घ्यावीशी वाटते. झाडावरून मी अलगद हात फिरवला. त्याच्या फुलण्याची जणू मी वाटच पाहत होते आणि कदाचित त्यालाही ते माहीत असावं. गुलमोहर जणू स्पर्शातून सांगतो की, बघ एवढे घाव सोसूनही आणि राग, द्वेष, कटुता, सारं सारं विसरून मी कसा ठामपणे उभा आहे. जीवनात शिशिरानंतर वसंत येणारच गं, या वसंताचं स्वागत कर. मी बघ त्याच्यासाठी अंगोपांगी बहरलोय. त्याच्या आणि माझ्यातल्या मूक संवादानं मन अगदी हलकं फुलकं झालं. खरंच निसर्ग किती छान शिकवतो आपल्याला. त्याच्या फुलण्याची डवरण्याची आतुरतेने वाट बघणारी मी, माझा जणू जन्मोजन्मीचा सखा होऊन गुलमोहर फुलतो, बहरतो. माझ्या सुखदु:खाशी निगडित तो असतो. त्याच्या फुलण्यानं मी सुखावते. माझ्या दुख-या मनावर तो हळुवार फुंकर घालतो. मनातलं न सांगता तो सारं सारं समजून घेतो, समजावून सांगतो. ग्रीष्माचा दाह शीतल होऊन जातो. आयुष्य फुलपाखरासारखं भिरीभिरी उडू लागतं, चैतन्यमय होऊन जातं. जसा अलगद येतो तसाच अलगद निघूनही जातो. सुखावलेलं शांतावलेलं मन पुन्हा वेडंपिसं होतं. सैरभैर होतं. त्याच्या भेटीसाठी आतुरतं. त्याच वेळी हा अदृश्य रूपात सांगत असतो, घाबरू नकोस, मी पुन्हा येणार आहे आणि अदृश्य रूपात नेहमीच तुझ्या सोबत असेन.
तू गेल्यावर नसते मी ही
माझे काही
उरलेली अशी कोण मी
माहीत मजला नाही नाही
आठवणी दाटतात, धुके जसे पसरावे, जे घडले ते सांग कसे विसरावे, पण गुलमोहराच्या नुसत्या फुलण्यानं बहरण्यानं डवरण्यानं ती दु:ख विसरायला होतात. उन्हाचे चटके सहन करीत ज्याप्रमाणं तो आपल्याला सुखद थंडावा देतो, गारवा देतो त्याप्रमाणं आयुष्यातली सगळी दु:ख त्याला बघून विसरायची असतात.
गुलमोहर ओल्या तरल स्वछंदी भावनांची हळव्या मनाला आपल्या लाल केशरी कवेत बेधुंद करणारा, अबोल असूनही खूप काही सांगून जाणारा, धगधगत्या उन्हाच्या झळांना न जुमानता मोठ्या दिमाखात उभा राहून येणा-या जाणा-यांचे स्वागत हसतमुखाने करणारा, मनाचा हिंदोळा झुलवणारा, आल्या सौंदर्याचा साज लेऊन घायाळ करून मनाला भुरळ घालणारा हा गुलमोहर आपल्या लाल केशरी फुलांच्या पायघड्या सर्वांसाठी घालत असतो. आपल्या मनाच्या कोंदणात कायमस्वरूपी बसतो. एप्रिल आणि मे महिन्यात तर याचं फुलणं अंगोपांगी बहरलेलं असतं. वा-याला अलिंगने देऊन त्याच्याशी गुजगोष्टी करणारा, त्याच्या स्पर्शाने मोहरणारा हा गुलमोहर किती मनमोहक. माझ्या घराच्या जवळ एक गुलमोहर दरवर्षी भरभरून फुलतो. अगदी दुरूनच त्याचं दर्शन माझं मन प्रसन्न करून जातं. फुलांनी बहरलेल्या डहाळ्या सतत वा-यावर हेलकावे घेत मला सतत सांगत असतात की, आयुष्यातल्या संकटांना न घाबरता, न खचता नेहमी हसत राहा. हा सहनशीलतेचा कानमंत्र देणारा माझा सखा गुलमोहर पुन्हा एकदा नव्यानं बहरलाय. असा हा गुलमोहर यांच्या लालेलाल रंगावर सुवर्ण रेखी बुंदके, ताठ मानेचे केसर, त्याची ऐट, रुबाब आणि तेजवर्ण केवळ अवर्णनीय. फुलांनी नखशिखांत डवरून जायचं आणि वा-याच्या झुळकीबरोबर एक एक फूल जमिनीवर सोडायचं आणि भोवती तांबड्या पाकळ्यांचा भरगच्च गालिचा पसरायचा. पर्जन्यराज्याच्या आगमनार्थ पहिल्या पावसापर्यंत गुलमोहोराची साथ टिकते आणि नंतर येणा-या प्रत्येक पावसाच्या सरीबरोबर आपला उरलासुरला पुष्पसंभारही तो अर्पण करतो आणि अलविदा म्हणत फिरून एकदा हिरव्याकंच घनदाट पानांनी भरून जातो. लाल आणि हिरव्या रंगाची ही जादू डोळे भरून बघताना मन अगदी तृप्त होत जातं.