Home »Magazine »Rasik» Gulzar New Book Dewdi

पडवीतल्या कथा - देवडी

कपिल इंगोले | Feb 23, 2013, 23:29 PM IST

  • पडवीतल्या कथा - देवडी

किताबों से कभी गुजरो तो यूँ किरदार मिलते हैं
गए वक्तों की ड्योढ़ी में खड़े कुछ यार मिलते हैं !!
आयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. काही कायम सोबत राहतात, काही एखाद्या वळणावर साथ सोडून जातात. अशीच काही माणसे आपल्याला पुस्तकांमधूनही भेटतात. अनेक कथा, कादंबर्‍या, कवितांमधून भेटलेली पात्रे मनात कायम रुंजी घालतात. अशीच काही नवीन पात्रे आपल्या भेटीस आली आहेत गुलजार यांच्या ‘ड्योढ़ी’ या नव्या कथासंग्रहामधून.
नावातच वेगळेपणा असणार्‍या या पुस्तकातील कथांमधून अस्सल हाडामासाची माणसे आपल्याला भेटतात. गुलजार यांच्या कथा असो वा कविता, चित्रपट गीते, गझल असो वा चित्रपट दिग्दर्शन त्यामधील पात्रे कायम आपल्याशी एक वेगळ्या पातळीवरचा संवाद साधत असतात. हा संवाद कधी भावनिक पातळीवरचा असतो तर कधी सामाजिक पातळीवरचा, तर कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणाराही. त्यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या कथासंग्रहामधून ही बाब प्रकर्षाने जाणवते. हाच अनुभव गुलजार यांच्या ‘ड्योढ़ी’ या नव्या हिंदी कथासंग्रहामधूनही वाचकांना मिळतो.
या वर्षी वाचकांच्या भेटीस आलेल्या या पुस्तकाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. आता या पुस्तकाचा ‘देवडी’ हा अनुवाद अंबरीश मिश्र यांच्या शब्दांमधून वाचकांच्या भेटीस आला आहे. अरुण शेवते यांच्या ऋतुरंग प्रकाशनातर्फे बाजारात आलेल्या या पुस्तकात मानवी नात्यांच्या, भावनांच्या अस्सल कथा वाचायला मिळतात. या पुस्तकाची पहिली प्रत गुलजार यांनी आळंदीला जाऊन संत ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण केली हे विशेष.
गए वक्तों की ड्योढ़ी में खड़े कुछ यार मिलते हैं... भूतकाळात भेटून गेलेली माणसे आज सोबत नसली तरी त्यांच्या आठवणी मनाच्या पडवीमध्ये कायम जपलेल्या असतात. त्याच आठवणी ड्योढ़ीमधून भेटायला येतात. ड्योढ़ी म्हणजे घरातील पडवी. जुन्या काळात घराच्या मागच्या अंगणात पडवी हा प्रकार बघायला मिळत असे. लौकिक अर्थाने तो घराचा भाग नसला तरी विरंगुळ्याचे क्षण, निवांत क्षण घालवण्यासाठी तिचा उपयोग होतो. अशाच जुन्या आठवणींची, क्षणांची, पात्रांची भेट गुलजारांच्या ‘ड्योढ़ी’मध्ये होते. आजवर गुलजार यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. एक संवेदनशील कवी, गीतकार म्हणून त्यांची ओळख सर्वांना आहे. त्याही पलीकडे ते तेवढेच संवेदनशील लेखकही आहेत, हे त्यांचे गद्य साहित्य वाचल्यानंतर लक्षात येते. यापूर्वी आलेल्या ‘रावीपार’ या पुस्तकाने हिंदी आणि मराठीमध्ये बरीच लोकप्रियता मिळवली. आता ‘ड्योढ़ी’ आणि मराठीतील ‘देवडी’ही त्याच पंक्तीत जाऊन बसेल, यात शंकाच नाही.
देवडीमध्ये कथा आपल्याला भेटतात त्या काही पात्रांच्या रूपाने. विशेषत: यामध्ये पात्रांची भरगच्च गर्दी नाहीये. एक मुख्य पात्र ज्याच्याद्वारे कथा पुढे सरकत जाते आणि आपण त्याचे बोट धरून पुढे जातो. हा प्रवास सुरू असतानाच एका वळणावर येऊन ती कथा संपते; पण तो कथेचा शेवट नसतो, कारण पानावर जरी ती कथा संपलेली असली तरी मनात ती कायम रेंगाळत राहते आणि जिथे रेंगाळली त्या वळणावरून पुढे सरकत जाते. यातील सर्वच कथांचे हेच वैशिष्ट्य सांगता येईल, की या कथांना लौकिकार्थाने शेवट असा नाहीये. म्हणजे...आणि ते सुखाने नांदू लागले किंवा ते गुण्यागोविंदाने संसार करू लागले... असा गोड शेवट नाही किंवा करुण अंतही नाही. कथेची सुरुवात गुलजार करून देतात, शेवट आपल्यावर सोडतात. खरे तर कथांचा शेवट नसतोच कधी. पण आपली पारंपरिक मानसिकताच अशी झाली आहे, की जोपर्यंत पॉझिटिव्ह एण्ड दिसत नाही तोपर्यंत ती कथा अपूर्ण वाटत राहते. परंतु देवडीमधील कथांच्या अपूर्णत्वातही एक पूर्णपणा दडलेला आहे. ‘देवडी’ची सुरुवातच होते ती गुलजार यांना प्रत्यक्ष आयुष्यात भेटलेल्या व्यक्तीच्या कथेने किंवा आठवणीने. ज्यात ‘साहीर आणि जादू’ या पहिल्या कथेत साहीर लुधियानवी आणि जावेद अख्तर यांच्या अनोख्या नात्याची भावनिक बाजू वाचायला मिळते. अशा प्रकारे अस्सल जीवनातील पात्रांवरून सुरू होणारा हा प्रवास काही काल्पनिक पण तेवढ्याच खर्‍या पात्रांच्या माध्यमातून आपल्यापुढे येतो.
या पुस्तकात आपल्याला एकूण 25 कथा वाचायला मिळतात. त्या कथांचे विषयानुसार वर्गीकरण केलेले आहे. हे वर्गीकरणही फार मजेशीर आहे. अनुक्रमणिकेमध्ये कथेचे सार सांगणार्‍या कवितेच्या दोन ओळी दिल्या आहेत आणि त्यानंतर कथेचे शीर्षक. उदा. भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांचे एक वेगळे रूप सांगणार्‍या कथांच्या आधी,
आँखों को वीजा नहीं लगता, सपनों की सरहद होती नहीं
बंद आँखों से रोज़ मैं सरहद पार चला जाता हूँ!...
या ओळी वाचायला मिळतात. खरे तर या ओळी गुलजारांनी प्रसिद्ध गझल गायक मेहदी हसन यांच्यासाठी लिहिल्या होत्या. त्याचा वापर इथे त्यांनी मोठ्या खुबीने केलाय. अनेक चित्रपट, नाटके, पुस्तके, गाण्यांमधून आवडीने आलेल्या मुंबापुरीवरही ‘बास’, ‘झडी’, ‘सारथी’, आणि ‘फुटपाथ से’ या कथा यामध्ये वाचायला मिळतात. सुंदर चेहर्‍याने सर्वत्र वावरणार्‍या मुंबईचे त्या मुखवट्यामागचे रूपही या कथांमधून मांडण्यात आलेले आहे. गुलजार जसे प्रगल्भ लिखाणासाठी प्रसिद्ध आहेत, तसेच ते बालगोपाळांच्या लिखाणासाठीही ओळखले जातात. मग ते ‘लकड़ी कि काठी, काठी पे घोडा’सारखे ऑल टाइम हिट बालगीत असो, की ‘चड्डी पहेन के फूल खिला हैं’ म्हणत मोगलीची कथा सांगणार्‍या ‘दि जंगल बुक’ मालिकेचे शीर्षक गीत. या सर्वांमधून बालमनाचे भावविश्व अचूकपणे गुलजार मांडतात. ‘देवडी’मध्येही गागी और सुपरमैन, घगु और जामनी, आणि नारंगी या कथा आपले बोट धरून अलगद आपल्याला बालविश्वात घेऊन जातात आणि मनात विचार येतो,
बड़ा होने लगा था, फिर खयाल आया
मैं पुछू तो सही, कितना जरुरी हैं बड़ा होना!!
यातही कर्करोगाने ग्रस्त असलेल्या नऊ वर्षाच्या गागीच्या करुण कहाणीने गुलजार वाचकांच्या काळजात हात घालतात. आपल्याला कॅन्सर झालाय हे कळल्यानंतर त्या शब्दाचा नीट अर्थही माहीत नसणारी गागी त्याबद्दल तिला पडणारे प्रश्न जेव्हा आपल्या आई-बाबाला विचारते, तेव्हा ‘तेरे मासूम सवालो से परेशान हू मैं’ हा अनुभव मनाला चटका लावून जातो.
एकंदरीत या कथांच्या माध्यमातून एका वेगळ्या अनुभवविश्वाची सफर घडते, हे निश्चित. गुलजार यांच्या लिखाणाचे भक्त असणार्‍यांसाठी हिंदी आणि मराठीतील दोन्ही कथासंग्रह अप्रतिम भेट ठरणार आहेत. परंतु ज्यांनी हिंदी ‘ड्योढ़ी’ वाचले आहे, त्यांच्यासाठी मराठी ‘देवडी’ हा कथासंग्रह थोडी निराशा करणारा ठरला आहे. कदाचित गुलजार यांच्या हिंदी-उर्दू मिश्रित भाषेतील चपखल उपमा, छोटी छोटी पण अतिशय मोठा अर्थ मांडणारी वाक्ये मराठीत अनुवाद करताना मिश्र यांचीही दमछाक झाली असेल, हे जाणवते. शिवाय अनुवादकानेही देवडी म्हणजे काय ते सांगितले नाही. हिंदी पुस्तकात ‘ड्योढ़ी’साठी वापरला आहे, तोच अर्थ मराठीत वापरण्यामागचा उद्देश कळत नाही.
या पुस्तकाच्या सुरुवातीला आपली भूमिका मांडताना गुलजार म्हणतात, गोष्टींना खूपशा बाजू असतात. कोणत्याही बाजूने पाहिले तरी सारखीच दिसते, अशी गोलगोल नसते कथा. गोष्ट आपल्या पुढे उभी असते, माथा उंचावून. पहाडाप्रमाणे. छोट्याछोट्या अनेक पायवाटा असतात गोष्टीला. अनेक लोक चढून जात असतात अन् मग पायवाट तयार होत जाते. हा शिखरावर जाण्याचा अनुभव या कथांमधून मिळत जातो.
देवडी
लेखक - गुलझार, अनुवाद- अंबरीश मिश्रा
ऋतुरंग प्रकाशन
पृष्ठे- 187, किंमत - 200 रु .
kapil.ingole@gmail.com

Next Article

Recommended