आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरू ग्रहाच्या दर्शनाची संधी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वाचकांकडून सध्या आकाशात दिसणा-या एका ठळक वस्तूविषयी विचारणा होत आहे. संध्याकाळी आकाश मध्याजवळ एक तेजस्वी वस्तू दिसते. तो कोणता तारा आहे अशी विचारणा अनेक आकाशप्रेमींनी केली आहे. प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की हा तारा नसून ग्रह आहे. त्याच्याकडे नीट पाहिलेत तर तुम्हाला त्याचा प्रकाश स्थिर आहे हे जाणवेल. हा तेजस्वी ग्रह सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह ‘गुरू’ आहे. हौशी खगोल अभ्यासकांच्या दुर्बिणी यावर हमखास रोखल्या जातात. तुमच्या जवळ दुर्बीण नसली तरी तुम्ही तो सहज पाहू शकता. ओळखू शकता. एक-दोन दिवसांआड त्याला निरखत राहिलात तरी त्याची आकाशस्थ जागा ठरावीक वेळी पश्चिमेकडे झुकू लागली आहे असे तुमच्या लक्षात येईल. गुरू आपल्या अक्षाभोवती फार जोरात प्रदक्षिणा करतो. इतकेच नव्हे, तर त्याच्या अक्ष प्रदक्षिणेचा काळही सर्व अक्षवृत्तांवर समान नाही. त्याच्या विषुववृत्ताची एक चक्कर केवळ 9 तास 50 मिनिटांत होते, तर ध्रुवप्रदेशाच्या प्रदक्षिणेला 5 ते 6 मिनिटे जास्त लागतात. ग्रहांच्या संशोधनांत विशेष रस असणा-या ‘केसिनीने’ इ.स. 1690मध्ये हा प्रदक्षिणाकाळ शोधला. याचा अर्थ गुरूवर दिवस फक्त 10 तासांचा आहे. या प्रचंड गतीमुळे विषुववृत्तावर गुरू ग्रह फुगीर झाला आहे. गुरूचा विषुववृत्तीय व्यास खूप मोठा आहे. गुरूच्या विषुवृत्तावर एका पुढे एक 11 पृथ्वीगोल आरामात मानू शकतील. एकट्या पृथ्वीशी तुलना केली तरी गुरूचे वस्तुमान 317 पट आहे. सूर्यमालिकेतील इतर सर्व ग्रह, लघुग्रह इ. चे वस्तुमान एकत्र केले तरी गुरू ग्रहाचे वस्तुमान या सर्वांच्या अडीच पट भरेल. गुरू ग्रह इतका मोठा असल्यामुळेच सूर्यापासून सुमारे 75 ते 80 कोटी किलोमीटर अंतरावर असूनसुद्धा पहिल्या प्रतिच्या ता-याच्या 24 ते 25 पट तेजस्वी दिसतो. मंगळ जवळ आहे, पण लहान अहे त्यामुळे गुरू ग्रहाचे बिंब मंगळ ग्रहाच्या बिंबापेक्षा दुप्पट आकाराचे दिसते. त्याचा जास्तीत जास्त आकार 50 कलांपर्यंत असतो.
hvmone@gmail.com