आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haire Of Armstrong, Manro Innerwear And Gandhiji Sandle

आर्मस्ट्रॉंगचे केस, मन्रो अंतर्वस्त्र आणि गांधीजींच्या चपला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. सुप्रसिद्ध दिवंगत चित्रकार जी. एस. गायतोंडे यांची दोन चित्रे बारा कोटींना विकली गेली. निश्चितच अनेकांच्या नजरा विस्फारल्या, कान टवकारले. अलीकडेच लंडन येथील क्रिस्तिज कंपनीने आयोजित केलेल्या लिलावात ‘महाराजा ऑफ पतियाला’यांच्या संग्रही असलेला 1200 वस्तूंचा समावेश असलेला सोन्याचा ‘कटलरी सेट’ 17 कोटींना विकला गेला. अर्थात, तरीही भारतात ही कोटींची भाषा शंभरच्या आतलीच आहे. ‘द कार्ड प्लेअर्स’ हे पॉल सीझानचे चित्र 268.1 दशलक्ष डॉलरला विकले. नुकतेच 2013ला पाब्लो पिकासोचे ‘ली रिव’ हे चित्र 155 दशलक्ष डॉलरला विकले गेले. ही चित्रांची स्थिती झाली. नाण्याचे बघितले तर त्यांची हीच त-हा. `flowing hair doller' हे नाणे 1794मध्ये मिंट झाले होते, ते 7.85 कोटी डॉलरला गेले. आता स्वाक्ष-यांचा संग्रह करणारे जे असतील, त्यांना सर्वसामान्य लोक वेडे मानतात; परंतु त्याचेही शेअर मार्केटप्रमाणे मोठे मार्केट आहे, त्याचे सतत 10 दिवस बिडिंग होत असते, हे किती जणांना माहीत आहे? सर्वात महाग ऑटोग्राफ आहे 5 दशलक्ष डॉलर आणि तो आहे विल्यम शेक्सपिअर याचा. असे पाच ते सहा ऑटोग्राफ उपलब्ध आहेत. आता अशा माणसांना वेडे म्हणणारेच वेडे ठरतील, त्यांनी फक्त डॉलरला गुणाकारच करत राहावे.


अनेक वेळा, आपल्या देशातील नावाजलेले जे चित्रकार होऊन गेले आणि त्यांच्या पुढील पिढ्यांना पूर्वजांनी, बापजाद्यांनी काय केले, याची कल्पना नसेल तर ती चित्रे कुठेतरी माळ्यावर धूळ खात पडलेली असतात. कुणीतरी येतो, मातीमोल भावात ती विकत घेऊन जातो. आपण त्यांना काय दिले, याचे त्यांना भान राहत नाही. परंतु आजचे चित्रकार मात्र खूप सावध असतात. सहज कुणाला चित्रे काढून देत नाहीत. परंतु काहींना उपायच नसतो, ते सहजपणे देतात. मकबूल फिदा हुसेन जेव्हा चित्रकार म्हणून संघर्ष करत होते, तेव्हा अनेकदा गरजेपोटी चित्रे काढून देत होते. आता त्यांची किंमत अफाट आहे. त्यापेक्षा विन्सेट वॅन गॉगचे उदाहरण देता येईल. एकेकाळी एक चहाच्या कपासाठी त्याने चित्रे काढून दिली. त्यांची चित्रे ज्यांनी विकत घेतली ते आता गडगंज श्रीमंत झाले आहेत.


आपल्या देशातले उदाहरण घेताना मात्र महात्मा गांधी यांचे घेता येते. कारण त्यांच्या वस्तूंना जगात खूप मागणी आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या चपला आणि काही वस्तू लंडनमध्ये लिलावात विकल्या गेल्या सुमारे 9.5 कोटींना. आणि विकत कोणी घेतल्या, एका दारू विकणा-या कंपनीच्या मालकाने. आयुष्यभर दारूबंदीचा पुरस्कार महात्मा गांधींनी केला. आता यात शोकांतिका कोणाची झाली?


मी दुसरी गोष्ट सांगतो, नील आर्मस्ट्राँगची. त्याचा मार्क्स सिझेमोर नावाचा जुना केशकर्तनकार होता. त्याने आर्मस्ट्राँगचे केस 3000 डॉलरला विकले. हे नील आर्मस्ट्राँगच्या लक्षात आले, तेव्हा त्याने त्याच्यावर ‘केस’ टाकली. त्यामध्ये तो केस कापणारा ती ‘केस’ हरला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्याला ते केस परत देणे भाग होते. परंतु त्याच्याकडे केस नव्हते. मग त्याला त्यातून मिळालेली रक्कम आर्मस्ट्राँगच्या सांगण्यावरून एका संस्थेला दान करायला लागली. एखादी गोष्ट जतन करणे, हे आपल्या रक्तात नाही. दुसरे उदाहरण वेगळे आहे. सुप्रसिद्ध गणितज्ञ शकुंतलादेवी यांचे अलीकडेच निधन झाले, तेव्हा त्यांचा मेंदू जतन करायला हवा होता आपण. कारण त्यांची ग्रहणक्षमता अफाट होती, आइन्स्टाइनप्रमाणे. आपण तसा विचारच केला नाही. अर्थात, तसा विचार करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करायला हवा होता. आज आपण किमतीच्या जगात आहोत, हे स्वत:ला समजवायला हवे, परंतु ते समजत नाही. आज आपल्या देशात खूप जुन्या मूर्ती दिसतात, त्यांचा इतिहासही अनेकांना माहीत नसतो. मग कधी तरी त्या गायब होतात. राजस्थानमधली अनेक मंदिरे मूर्तीविना आहेत. कारण कधी तरी त्या मूर्ती पाच-दहा हजारांसाठी चोरीला गेल्या. आपल्याला त्याचे मूल्य माहीत नसते. माझ्या माहितीचा एक माणूस आहे. 786 हा शेवटचा नंबर असलेल्या जवळजवळ 3.5 लाखांच्या नोटा त्याच्याजवळ आहेत. जन्मभर त्याने हा छंद जोपासला आहे. तर दुसरा माझा मित्र आहे, त्याच्याकडे जुन्या रेकॉडर््सचा खूप मोठा संग्रह आहे. आज जगभर लोक अनेक गोष्टींचे संग्रह करताना दिसतात. आपल्या देशात ही दृष्टी आलेली नाही, की आपण चित्रे आणि नाणी सोडली तर बाकी काही विकणे कमीपणाचे मानतो. अर्थात, हा मध्यमवर्गीय दृष्टिकोन आहे, असेही मला वाटते. त्यात तत्त्व वगैरे अनेक गोष्टी येतात, असो.


आपल्याकडे छंद जोपासण्याचा आणि यथायोग्य किंमत मिळवण्याचा हा दृष्टिकोन निर्माण होत आहे, परंतु त्यासाठी पूर्णपणे व्यावहारिक आणि व्यावसायिक झाले पाहिजे. वस्तुत: आपल्याही देशात मोठमोठ्या उद्योगपतींची संग्रहालये आहेत, पण सामान्य लोकांना माहीतही नाही. परदेशात काहीही विकले जाते, अगदी मर्लिन मन्रोचे अंतर्वस्त्रदेखील विकले गेले ते 5,200 डॉलरला; तर तिने जॉन एफ केनेडीच्या बर्थडेला घातलेला पोशाख 1.3 मिलियन डॉलरला विकला गेला. आपल्या इथे असे होते का? उत्तर ‘नाही’ असेच मानावे लागेल. निदान अजून तरी नाही. मला आठवते आहे, मागे हॉलीवूडमधील एका अभिनेत्रीने स्वत:चे लिपस्टिक मार्क ऑटोग्राफ बुकवर देऊन सही केली होती. त्यानंतर एका लिपस्टिक कंपनीला कल्पना सुचली, की त्यांनी काही हॉलीवूडच्या अभिनेत्रींचे वेगवेगळ्या शेड्सचे, आपल्या प्रॉडक्टचे लिपस्टिक मार्क घेऊन त्यांची विक्री केली होती आणि ती रक्कम डोनेट केली होती.


एका माणसाने तर अमेरिकन प्रेसिडेंटच्या कुत्र्याच्या पायाचे ठसेच संग्रहित केले होते. अशा खूप गोष्टी आहेत, त्या आम्हाला माहीत नाही. जर सुचले तरी करायला लाज वाटते. ‘इ-बे’ साइटवर 2005मध्ये एक जाहिरात आली होती, ‘ममी फॉर सेल’. त्या वेळी संपूर्ण पोलिस खाते हादरले होते. ती ममी होती लहान मुलाची 1880 सालातली! पोलिस मर्डर केस दाखल करू शकले नाहीत, पण ती जाहिरात ऑक्टोबर 2011 मध्ये काढून टाकण्यात आली. एक- दोन वर्षांपूर्वी चार्ली चॅप्लिनची सुप्रसिद्ध हॅट आणि काठी यांचा लिलाव केला गेला, किंमत आली 36 लाख रुपये. कुणी सर्वात जुनी चालणारी गाडी विकली 4.62 मिलियन डॉलरला. ती होती 1884 सालातली! सर्वात मौल्यवान बेसबॉलबॅट विकली गेली 2001 मध्ये 5,77,610 डॉलरला! ती बॅट होती जो जॅक्सनची! आता परवाच पाब्लो पिकासोने रंगवलेले भांडे 9 कोटींना विकले गेले...
या सर्व गोष्टी बघून प्रश्न पडतो की या क्षेत्रात आपण, आपला देश कुठे आहे? आपण जगाबरोबर आहोत का? उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. कारण आपल्याला ‘मूल्य’ कदाचित माहीत असते, पण ‘किंमत’ नाही. ‘आमची अशी संस्कृती नाही’, ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’, ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’, ‘धट्टीकटी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती’ या विचारसरणीने आपला घात तर केलेला नाही ना?