आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलवाईविरोधी प्रवृत्तीची सनातन दिंडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मते योग्य की अयोग्य, पटणारी किंवा न पटणारी असली तरी लोकशाही राज्यात दुस-यांच्या न पटणा-या मतांसाठी जीव पणाला लावायचा असतो, याची जाणीव आपल्या समाजात रुजलेली नाही, हे हमीद दलवार्इंच्या नावाला झालेल्या विरोधाने सिद्ध झाले. ही जाणीव साहित्यिकांमध्ये नाही, तशीच ती राजकीय नेत्यांमध्येही नाही.
हमीद दलवार्इंच्या नावावरून अखिल भारतीय साहित्य संमेलनात वादाला तोंड फुटले. अखिल भारतीय साहित्य संमेलन असो की जयपूरचा लिटररी फेस्टिव्हल; हमीद दलवाई, सलमान रश्दी या नावांवरून वाद होत राहतात. सध्याच्या पिढीला रश्दी यांचे नाव या ना त्या कारणावरून माहीत असले तरी हमीद दलवाई या नावाबाबत फारशी माहिती नाही. साहित्य संमेलनाचा विषय हा आता शिळा झालेला असला, तरी हमीद दलवाई यांच्या नावाभोवती असलेले वादाचे वलय कायम राहणार आहे. त्यामुळेच या वादामागील मानसिकता व राजकारण समजून घेणे गरजेचे आहे.
3 मे 1977 रोजी हमीद दलवाई यांचे निधन झाले. म्हणजे, जवळपास 35 वर्षांपूर्वी दलवाई इहलोकातून निघून गेले. दलवाई मंत्री, खासदार, आमदार नव्हते. शिवसेनेसारख्या संघटनेचे सरसेनापती नव्हते किंवा जामा मशिदीचे शाही इमाम नव्हते. ते मराठीतील प्रतिभावंत कादंबरीकार व कथाकार मात्र नक्कीच होते. त्यांची ‘इंधन’ ही कादंबरी किंवा ‘लाट’ या कथासंग्रहाने त्यांच्या लेखकपणाचा कस मराठीतील नामवंत समीक्षक व लेखकांना मान्य करायला लावला होता. पण मराठी लेखकांची यादी तर भलीमोठी आहे. त्यात भालचंद्र नेमाडे व आणखी एखाददोन नावे वगळली, तर त्यांच्यावरून वाद तर सोडाच; त्यांच्याविषयी मराठी जनांमध्ये साधा संवादही होताना दिसत नाही. मग अशा वेळी मराठीतील एक लेखक 35 वर्षांनी भूत होऊन अजूनही धार्मिक पुनरुज्जीवनवाद्यांच्या छाताडावर का नाचतो आहे, हा प्रश्न नव्या पिढीतील जिज्ञासूंना पडायलाच हवा.
हमीद दलवाई केवळ सर्जनशील लेखक नव्हते, तर विचारवंतही होते आणि ते केवळ पुस्तकी विचारवंत नव्हते, तर इटालियन विचारवंत अँटानिओ ग्रामश्चीच्या भाषेत सांगायचे तर ते ‘ऑरगॅनिक इंटलेक्च्युअल’ होते. म्हणजे, समाजाशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली होती. या समाज नावाच्या अवाढव्य विद्यापीठातूनच त्यांची बौद्धिक जडणघडण झाली होती. मुस्लिम समाजातील शोषण करणा-या रूढी, परंपरांच्या विरोधात त्यांनी केवळ वैचारिक भूमिका घेतली नव्हती, तर बेधडकपणे रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. हा बेधडकपणा इतका जाज्वल्य होता, की जुबानी तलाकच्या विरोधात त्यांनी संपूर्ण भारतातला पहिला मुस्लिम महिलांचा मोर्चा काढला. त्या मोर्चाला अवघ्या सात स्त्रिया उपस्थित होत्या, ज्यात त्यांची पत्नी व बहीण वगळून केवळ पाच तलाकपीडित महिलांचा समावेश होता. पण हा सात स्त्रियांचा जुबानी तलाकविरोधातील मोर्चा मुस्लिम धर्ममार्तंडांना एवढा झोंबला होता, की ते ‘नारा ए तकबीर’चे नारे देत दलवार्इंच्या विरोधात कायम हजारोंच्या संख्येने एकत्र येत असत.
पण मुस्लिम धर्मातील अनिष्ट रूढी, परंपरांच्या विरोधात बोलणारेही इस्लामच्या दीड हजार वर्षांच्या इतिहासात खूप झाले. अगदी अलीकडच्या काळात फैज अहमद फैज, कैफी आझमी, बॅ. छागला अशी कितीतरी नावे घेता येतील. यांनाही अनेकदा मुस्लिम धर्ममार्तंडांशी दोन हात करावे लागले. मात्र तरीही यांच्याविषयी मुस्लिम मुल्ला-मौलवींमध्ये हमीद दलवार्इंबद्दल वाटतो तितका राग दिसून येत नाही. दलवार्इंबद्दल असलेल्या रागामागे धर्मांध मुस्लिमांची असलेली मानसिकता त्यामुळेच लक्षात घ्यावी लागेल. इस्लामची पाच मूलभूत तत्त्वे आहेत. नमाज, रोजा, जकात, हज आणि इमान. कुराण हे प्रेषित महंमद पैगंबरांवर ईश्वराद्वारे अवतरले, असे मुसलमान मानतात. गॉस्पेल किंवा तोराहसारखे ते संतांनी लिहिलेले नसून कुराण हा ईश्वरी संदेश आहे, त्यामुळे ते इतर कोणत्याही धर्मग्रंथांपेक्षा श्रेष्ठ असल्याचा तर्क मुस्लिम धर्ममार्तंड मांडत असतात. वर उल्लेखलेल्या पाच मूलभूत तत्त्वांचे एकनिष्ठेने पालन करतो तो मुसलमान, असेही धर्ममार्तंड मानतात. या पाचही तत्त्वांचा सामाजिक आशयही थोडक्यात समजून घ्यायला हवा. इस्लाम हा अध्यात्मापेक्षा सामूहिक जीवनपद्धतीवर अधिक भर देणारा धर्म आहे. नमाज ही एकट्याने पढण्यापेक्षा ती मशिदीत जाऊन इतर साथींबरोबर पढण्याला इस्लाममध्ये अधिक महत्त्व आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास ठेवून संपूर्ण मुस्लिम जगतासाठी त्यागाची भावना जागृत केली जाते. याच महिन्यात आपल्या उत्पन्नाचा ठरावीक हिस्सा जकातच्या रूपाने गरजूंना दान करावा लागतो. तसेच प्रत्येक मुसलमानाने आयुष्यात एकदा तरी मक्का येथे जाऊन हज करावी, जेणेकरून जगभरातील मुस्लिम साथींबरोबर तो स्वत:ला सामावून घेऊ शकतो. ही चार तत्त्वे महत्त्वाची असली तरी यांचे पालन न करणा-याच्या विरोधात धर्मविरोधी असल्याचा शिक्का सहसा मारला जात नाही. मात्र ‘इमान’ या तत्त्वाच्या विरोधी मुसलमानांना जाता येत नाही. अल्ला आहे व तो एकच आहे, हे ते तत्त्व. अल्ला हा एकच असून तो सर्वशक्तिमान आहे; त्यानेच कुराण पैगंबरांवर उतरवले, याच्या विरोधात भूमिका घेतल्यास ते थेट धर्माच्या गाभ्यालाच आव्हान दिल्यासारखे ठरते. हमीद दलवाई यांनी नेमके हेच केले. ते नास्तिक होते, विज्ञानवादी होते. त्यांनी अल्लाच्या अस्तित्वालाच आव्हान दिले. तसेच कुराण हा त्या काळातील समाजाची एकजूट करण्यासाठी व शोषणाच्या विरोधातील गरज म्हणून महंमद पैगंबरांनी लिहिलेला ग्रंथ आहे, असे म्हटले. दलवार्इंच्या या भूमिकेमुळेच मुसलमान बिथरले. आजही बिथरतात.
हमीद दलवार्इंचे हे म्हणणे योग्य होते की अयोग्य, यावर चर्चा करण्याचा हा मंच नव्हे. मात्र स्वत:ला सेक्युलर म्हणवणा-या देशात एखाद्या व्यक्तीला नास्तिक होण्याचा, ईश्वरी अस्तित्व नाकारण्याचा अधिकार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, शीख प्रत्येक धर्मात नास्तिक व विज्ञानवादी मंडळींचे योगदान मान्य केले जाते. मार्क्सला किंवा फ्रॉइडला कोणत्याही झिओनिस्टने ते आमच्या धर्मातले नव्हते, असे म्हणून हेटाळले नाही. भगतसिंगांनी तर फाशीगेटमध्ये ‘मी नास्तिक का झालो’ ही पुस्तिका लिहिली. शीख त्यांना ते आमचे नव्हे, असे म्हणत नाहीत. हिंदू व ख्रिस्ती धर्मीयांमध्ये तर नास्तिक, विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवाद्यांची मोठीच मांदियाळी आहे. जगभरातील मुस्लिम धर्ममार्तंड इस्लाम धर्मातील सुधारणांचा विषय काढला, की त्याचा शेवट दुर्दैवाने अशाच प्रकारे करतात. जगातील सगळ्या धर्मांमध्ये नास्तिक तयार झाले; मात्र त्यामुळे दुर्दैवाने कुठल्याही धर्माची शक्ती कमकुवत झाल्याचे उदाहरण नाही. तरीही मुस्लिम धर्ममार्तंडांकडून हा अट्टहास कायम केला जातो. हमीद दलवाई यांनी बुरख्याच्या विरोधात, जुबानी तलाकच्या विरोधात लढलेल्या लढाईमुळे मुसलमान त्यांच्या विरोधात अद्याप राग धरून आहेत, असे समजणे त्यामुळेच खुळचटपणाचे ठरेल.
दहाव्या शतकात बगदादमध्ये हुसेन इब्न मन्सून अल हलाज या सुफी संताने एके दिवशी शहरातील मध्यवर्ती चौकात येऊन घोषणा केली, ‘अना अल हक्क’ म्हणजे मीच सत्य आहे! याचाच अर्थ होता, मीच ईश्वर आहे. बगदादवर तेव्हा अब्बासीद घराण्याची सत्ता होती. हलाजला तत्काळ अटक करण्यात आली. त्याने स्वत:चे मत बदलावे म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. अल्लासाठी सर्वस्व त्यागून त्याच्यावर प्रेम करण्याची विचारधारा सुफी परंपरेतून पुढे आली. स्वत्व विसरून अल्लाशी पूर्णपणे एकरूप होणे, यातूनच हलाजने ही घोषणा केली होती. म्हणूनच ती मागे घेण्यास त्याने नकार दिला. त्याला पुढे हालहाल करून क्रुसावर चढवण्यात आले.
अल गझाली या अकाराव्या शतकातील सुफी विचारवंताने यावर म्हटले की, हलाज जे म्हणाला ते चूक नव्हते; मात्र चुकीच्या काळात त्याने योग्य मते लोकांसमोर मांडली, ही त्याची मोठी चूक होती. हलाजनंतर साधारण 900 वर्षांनंतरही योग्य मते लोकांसमोर मांडणे हे चूकच ठरेल, याची गझाली यांना बहुधा कल्पना आली नसावी. त्यामुळेच हमीद दलवाई यांची मते योग्य की अयोग्य, पटणारी किंवा न पटणारी असली तरी लोकशाही राज्यात दुस-यांच्या न पटणा-या मतांसाठी जीव पणाला लावायचा असतो, याची जाणीव आपल्या समाजात रुजलेली नाही, हे हमीद दलवार्इंच्या नावाला झालेल्या विरोधाने सिद्ध झाले. ही जाणीव साहित्यिकांमध्ये नाही, तशीच ती राजकीय नेत्यांमध्येही नाही. नेमका याचाच फायदा समाजातील लुम्पेन घेत असतात. हमीद दलवार्इंच्या निमित्ताने सुरू झालेला वाद तात्पुरता शमला असला तरी तो या लोकशाहीविरोधी प्रवृत्तींमुळे पुन्हा कधी डोके वर काढेल, हे सांगता यायचे नाही.