आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोस्तीचा हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन्य पशू-पक्षी आणि माणूस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण होऊ शकते का? अर्थात, तो माणूस आपला मित्र आहे, किमान शत्रू नाही, याची जाण आल्यावर हे शक्य असते. मध्यंतरी ‘भटकंती’ मासिकात संजीव सबनीस यांचा लेख वाचनात आला होता. बंगळुरू आणि मैसूर दरम्यानचे कोल्लूरू बेल्लूर हे आडवाटेचे गाव. हिवाळ्यात तिथे पेलिकन, करकोचे असे स्थलांतरित पक्षी डेरा टाकून असतात. त्यांचा विणीचा हंगाम असतो. हे पक्षी अतिथी असतात आणि गावकरी हे आपले मित्र आहेत, असा त्यांचा विश्वास असतो. शहरी पोशाखातला कुणी तिथे अवतरला तर बाकी त्यांच्यात संशयाचे वातावरण निर्माण होते आणि त्याच्यापासून हे पक्षी दूर पळतात. याच माणसाने लुंगी नेसली, डोक्यावर छटाकभर तेल चोपून वर फडके गुंडाळले, तर बाकी त्या माणसापासून भय नाही, हा विश्वास निर्माण होतो...

कच्छमधील आशापुरा गावातून आमचे पदभ्रमण चालले होते. शेतमजूर शेतात काम करत होते आणि अवतीभवती भले मोठे करकोचे आपल्याच नादात दंग होते. कुणीच कुणाची दखल घेण्याच्या फंदात पडत नव्हता. आंध्र प्रदेशातील कोल्लेरू गावातून भ्रमण चाललेले असताना, हाच अनुभव आला होता. बक कुळातले अगणित पक्षी झाडांवर तळ ठोकून होते. झाडांना फुले लागतात, फळे लागतात. इथल्या झाडांना पक्षी लागतात की काय? हा प्रश्न पडावा. गावातील माणसांचे स्वत:चे व्यवहार चाललेले असतात, तर पक्ष्यांचे आपले. दुसºयाच्या जगताशी कुणालाच देणे-घेणे नसते. तथापि एखादा आगंतुक माणूस आपल्या क्षेत्रात आला, तर वन्यपशू-पक्ष्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. अशा वेळी कुणी सावधानतेचा पवित्रा घेऊन कुठे तरी लपून बसेल, कुणी भीतीपोटी आक्रमक बनेल, तर कुणाला हा नवीन प्राणी आव्हानात्मक वाटेल आणि तो आक्रमक पवित्रा घेईल. तथापि अशा तिºहाइताशी दोस्तीचा हात कुणी पुढे करेल का? कदाचित हे मानव विरहित प्रदेशात घडू शकते. अंटार्क्टिका अजून तरी मानवविरहित खंड आहे. आम्ही अंटार्क्टिका भूमीवर पाऊल टाकले. स्वागताला पेंग्विन. हे कोण नवीन प्राणी? त्यांना कुतूहल! थोडी भीड चेपताच हिंमत करून त्यांच्यापैकी एक जण आमच्या नजीक आला. ‘पिक पिक पिक पिक...’ त्याने आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आमची उत्तरे त्याला समजली नसावीत. तो आपल्या ‘माणसांत’ गेला. तिथे त्यांचे ‘पिक पिक’ संवाद झाले. आमच्याशी संवाद साधण्यासाठी दुसºया पेंग्विनची नेमणूक केली गेली. तो आमच्याजवळ आला. हा पेंग्विन काय किंवा आम्ही काय, एकमेकांशी संवाद साधण्यात अयशस्वी ठरत होतो. तोही आपल्या ‘माणसांत’ गेला आणि साºया चमूचा ‘पिक पिक’ गदारोळ चालू झाला. हळूहळू या पेंग्विनांशी दोस्ताना वाढत गेला. विश्वासाचे नाते दृढ होत गेले. आम्ही त्यांना कुरवाळू लागलो. त्यांच्याशी हस्तांदोलन करू लागलो. पाळीव कुत्र्याशी असावेत तसे संबंध स्थापित झाले. हे सर्व असले तरी त्यांची ‘पिक पिक’ थांबायची नाही. हे काळ्या-पांढºया रंगांचे छोटे पेंग्विन, साधारणपणे 70 सें.मी. उंचीचे. हे ‘अ‍ॅडेली’ पेंग्विन म्हणून ओळखले जातात. त्यांना ‘अ‍ॅडेली’ हे नामाभिधान मिळण्यामागेही रंजक गोष्ट आहे. साल 1840. ड्युमोंट डि-ऊर्विले हा फ्रेंच साहसवीर अंटार्क्टिकावर येता झाला. त्याचे स्वागतही याच पेंग्विननी केले. त्यांची आपली अविरत ‘पिक पिक’ चालू असायची. या पिकपिकीने ऊर्विले आणि त्याच्या चमूला भंडावून सोडले. त्या पिकपिकीने ऊर्विलेला आपली बायको अ‍ॅडेलीची आठवण झाली. तो या पेंग्विनना अ‍ॅडेली म्हणून हाक मारू लागला आणि तेच नाव रूढ झाले. डि-ऊर्विले सुमारे दीड शतके आमच्या आधी अंटार्क्टिकावर पोहोचला होता. अन्यथा त्या पेंग्विनचे नामाभिधान वेगळेच असते. या सत्याचा पडताळा मिळाल्यामुळेही असेल, आमच्यातला एक जण या पेंग्विनसमोर त्यानेच केलेली कविता गात नाचत असे.
पिक पिक पिक पिक....