आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हात सैल सोडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नातवंडांशी गप्पा मारताना, त्यांना गोष्टी सांगताना आजी-आजोबांनी लक्षात घ्यायला हवं की आजच्या छोट्यांना ‘म्हातारे, म्हातारे कुठे चाललीस?’ किंवा ‘कोल्होबा, कोल्होबा, बोरं पिकली?’ या प्रकारच्या गोष्टी आवडणार नाहीत. या वयातच त्यांच्यापाशी जेवढी माहिती असते तेवढा कदाचित आजी-आजोबांनी आयुष्यभरात मिळवली नसेल. या गोष्टी लक्षात घेऊनच त्यांना उगवत्या पिढीशी गप्पा माराव्या लागतील.


सेवानिवृत्त ज्येष्ठांनी लक्षात ठेवण्यासारखा आणखीही एक मुद्दा आहे. सेवानिवृत्तीनंतर आता त्यांच्यापाशी अर्थार्जनाच्या फार मोठ्या शक्यता नाहीत. गुंतवणुकीवरील व्याज, पेन्शन किंवा घर असल्यास मिळणारं घरभाडं याशिवाय गणनापात्र असे उत्पन्नाचे स्रोत त्यांच्यापाशी नसतात. अशा परिस्थितीत खर्च कमी करण्याकडे माणसाचा कल असतो. आवक पुरेशी असेल, बचतही बरी म्हणता येईल एवढी असेल आणि तार्किकदृष्ट्या उरलेला काळ लक्षात घेतला तर हे पुरेसं असलं तरी काही ज्येष्ठांच्या मनात याबाबत अस्वस्थता असते. अशा ज्येष्ठांनी स्वत:ला सतत आठवण करून देत राहावं की आता उरलेली वर्षं ही खिशाला परवडेल तेवढा खर्च करून टाकायची आहेत. यात सगळा विवेक वा-यावर सोडून उधळपट्टी करायला लागा, असे म्हणायचे नसून मूठ फार घट्ट मिटून ठेवू नका असं सांगायचं आहे. महिन्याला होणा-या प्राप्तीशिवाय बचतीचासुद्धा ठरावीक हिस्सा खर्च करायला लागा, असं सुचवायचं आहे. पैसे कुठे-कशासाठी वापरायचे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही सत्कार्य कशाला म्हणता हे तुमच्या शिक्षण आणि संस्कारांवर अवलंबून आहे. हा पैसा तुम्ही स्वत:च्या सुखसोयीसाठी खर्च करायलाही हरकत नाही. तुमचं स्वत:चं वाहन असेल तर त्याचा भरपूर वापर करा आणि नसेल तर टॅक्सी-रिक्षाचा वापर करायला मुळीच संकोच करू नका. आता बसची वाट पाहत उभं राहण्याचे दिवस संपले आहेत. लोकलच्या प्रवासात धक्काबुक्कीला तोंड देण्याचा धोका पत्करू नका. तोकड्या आर्थिक परिस्थितीमुळे असं करावं लागणं हे ईश्वरदत्त दुर्भाग्य आहे. पण तसं नसून केवळ जवळच्या पैशात थोडी भर घालण्याच्या हव्यासापोटी तुम्ही हे करत असाल तर ते स्वनिर्मित दुर्भाग्य आहे. स्वनिर्मित दुर्भाग्याला ईश्वरापाशीही क्षमा नाही. कारण त्यानं दिलेल्या संधीचा वापर न करून तुम्ही इतरांच्या अडचणीत भर घातली आहे.


शक्यतो मुलांसाठी फार मोठी रक्कम मागे ठेवण्याचा मोह कमी करणं हितावह आहे. जिथं मुलं आर्थिक अडचणीत असतील तिथे त्यांना मदत करणं हा आईवडील म्हणून तुमचा धर्म आहे. पण जिथे अपत्य सक्षम असतील तिथे त्यांच्यासाठी धनसंपत्ती ठेवण्याचा मोह धर्मविपरीत आहे. तुमचे मित्र, आप्त, परिचित कुटुंब इ.चं निरीक्षण करा. ज्यांनी स्वत:ची शेवटची वर्षे अत्यंत काटकसरीनं जगून ब-यापैकी पैसा मुलांसाठी ठेवला अशांच्या मुलांनी निर्माण केलेले प्रश्न नजरेसमोर आणा. अशी अनेक कुटुंबं असतील जिथे वडिलांचा पैसा समस्यामूलक ठरला असेल. उत्तराधिका-यांमध्ये पैशाने अनेक प्रश्न निर्माण केले अशी कुटुंबे दृष्टोत्पत्तीस येतील. बँकेत पुरेशी रक्कम असताना आजारपण येऊन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हायला लागलं तर मेडिक्लेम नसल्याचा विचार मनात आणू नका. इतकंच नव्हे तर हॉस्पिटलचं बिल तुमच्याच बँक खात्यातून भरलं जावं याचा आग्रह धरा, अगदी मुलगे सक्षम असले तरी! याउपरही मुलाने बिल भरले तर ‘मलाच भरायचे होते’ असा दुराग्रहही धरू नका. बहुतेक वेळा तुम्ही बिल भरण्याची तयारी दर्शवाल त्याला मुलांचा होकार असेल.


काही ज्येष्ठ मंडळी आपल्या निवृत्तीनंतर फावल्या वेळात सार्वजनिक क्षेत्रातल्या एखाद्या कामात भाग घेतात. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा एखाद्या संस्थेच्या कामात सहभागी होऊन ते स्वत:ला कार्यमग्न ठेवतात ही चांगली गोष्ट आहे. आपला वेळ, शक्ती आणि थोडाफार पैसाही या पद्धतीनं समाजाला परत करणं हा प्रत्येक वरिष्ठ नागरिकाचा धर्म आहे. मात्र काही व्यक्ती अशा सामाजिक कामातून आपल्याला स्वत:ला काय मिळेल याकडे लक्ष द्यायला लागतात हे दुर्दैवी आहे. परत करण्याऐवजी अधिक मिळवण्यासाठी एक अदृश्य स्पर्धा सुरू होताना दिसते. एखाद्या संस्थेचे पदाधिकारी बनण्यासाठी चढाओढ चालते. एखाद्या संस्थेचं कार्य चालवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी वरिष्ठांचा सहभाग निश्चितच उपयुक्त असतो. पण त्यांनी स्वत:च एक विशिष्ट कालमर्यादा स्वीकारायला हवी. एखाद्या पदावर आजीवन हक्क दाखवण्याचा हट्ट धरू नये. एखाद्या जिमखाना किंवा व्यायामशाळेचे अध्यक्ष म्हणून नव्वदीचे गृहस्थ काठी टेकत येतात हे दृश्य हास्यास्पद असते. काही ठिकाणी तर हे वृद्धजन एकाच वेळी अनेक संस्थांत विविध पदाला चिकटून राहिलेले दिसतात. या मंडळींनी आता पदाला चिकटण्याचे नव्हे तर सोडण्याचे दिवस आले आहेत हे ओळखून योग्य व्यक्तींना संधी देणे सयुक्तिक असते.


आजवर अनेक गुंते उकलण्यात आणि त्यातून काहीतरी मिळवण्यात आपण गुंतलो होतो. आता हे गुंते उकलणं पुरे झालं आणि त्यातून काही मिळवायची वृत्तीही सुटायला हवी. आता जे काही ‘आहे’ त्याचा ‘आहे’ म्हणून आणि जे ‘नाही’ त्याचा ‘नाही’ म्हणून सहज स्वीकार व्हावा. असं झालं तर इतर काही नाही तर आयुष्याची शेवटची वर्षं पिसासारखी हलकी बनतील.
अनुवाद- प्रतिभा काटीकर, सोलापूर