आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: परंपरेची बूज राखणारे संशोधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर विद्यापीठात शब्दभंडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती यासंदर्भात स्पर्धेचे आयोजन केले जाते. मराठीतील म्हणी, वाक्यप्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवरती सोलापूर विद्यापीठात मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिसंवादांचे आयोजन केले जाते. बोलीभाषांची विविध रुपे उलगडून दाखविणारे कार्यक्रम सोलापूर विद्यापीठाने नेहमीच हाती घेतले आहेत. त्याला जोडूनच होणाऱ्या चर्चासत्र व परिसंवादात नामांकित भाषातज्ज्ञ सहभागी होऊन या कार्यक्रमांची बौद्धिक उंची वाढवतात.
 
एक जिल्हा एक विद्यापीठ या योजनेनुसार सोलापूर येथे ऑगस्ट २००४मध्ये विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात विविध प्रकारची ११६ महाविद्यालये आहेत. त्यातील तीसहून अधिक महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. सोलापूर जिल्ह्यातून मराठवाड्यातील काही भागांतून तसेच कर्नाटकातूनही अनेक विद्यार्थी सोलापूरच्या महाविद्यालयांत शिकायला येतात. मराठी मायबोलीचा उगम, विकास, समृद्धी आणि भवितव्य यांचा विचार करुन सोलापूर विद्यापीठातर्फे विविध उपक्रम नेहमी राबविले जातात. मराठी भाषेचा विविध पैलूंनी विचार करून, या भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकडून लेख लिहून घेऊन, ते विकिपिडियावर प्रसिद्ध केले जातात. मातृभाषेची महती आणि माहिती तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाजजीवनातील स्थान आणि मातृभाषेचे मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्व या विषयांवर विचारमंथन करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाच्या वतीने काही कार्यक्रमांचे सहआयोजन केले जाते. समाजप्रचार माध्यमातील मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी या विषयांवरील  व्याख्यानेही आयोजिली जातात. सोलापूर विद्यापीठात शब्दभंडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती यासंदर्भात स्पर्धेचे आयोजन केले जाते. मराठीतील म्हणी, वाक्यप्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवरती सोलापूर विद्यापीठात मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिसंवादांचे आयोजन केले जाते. बोलीभाषांची विविध रुपे उलगडून दाखविणारे कार्यक्रम सोलापूर विद्यापीठाने नेहमीच हाती घेतले आहेत. त्याला जोडूनच होणाऱ्या चर्चासत्र व परिसंवादात नामांकित भाषातज्ज्ञ सहभागी होऊन या कार्यक्रमांची बौद्धिक उंची वाढवतात. 
मराठी भाषा साहित्य कोश वाडमय या संदर्भातील नावीन्यपूर्ण गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले जाते. प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांच्या रेट्यामुळे व संगणकाच्या चोवीस तास वापरामुळे हाताने लिहिणे ही गोष्ट खूपच कमी होऊ लागली आहे. त्याची जागा संगणकाच्या की बोर्डने घेतली आहे. मात्र मराठी हाताने लिहिता येणे, हा वेगळा आनंद असतो. त्यासाठी मराठी सुलेखन, सुंदर मराठी हस्ताक्षर अशा स्पर्धाही सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजिल्या जातात. मराठी कथा, कविता, नाटक यांची कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना लेखनाच्या दृष्टीकोनातून सक्षम बनविण्याचे प्रयत्न केले जातात. सोलापूर विद्यापीठात प्रामुख्याने कन्नड, तेलुगू आणि मराठी या भाषांमध्ये संशोधन सुरु असते. एम. फील. आणि पीएचडी या स्तरावर हे संशोधन होते. एका प्राध्यापक मार्गदर्शकाच्या हाताखाली दरवर्षी एमफीलचे सहा  व पीचएचडीचे सहा विद्यार्थी या संशोधनकार्यात गुंतलेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात जन्मलेल्या संतांमध्ये सावता माळी, संत चोखामेळा, कान्होपात्रा, संत दामाजीपंत, स्वामी समर्थ अशा नावांचा समावेश आहे. ‘कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ असे म्हणणारे संत सावता माळी हे प्रत्येकालाच प्रात:स्मरणीय आहेत. दुष्काळात बादशहाची धान्याची कोठारे जनतेला खुली करणारे संत दामाजीपंत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचेच. शाहीर राम जोशीही सोलापूर जिल्ह्यातीलच. साहित्यसम्राट न.चि. केळकर यांचा जन्म जिल्ह्यातील मोडनिंब या गावी झाला, तर नवकवितेचे प्रवर्तक बा. सी. मर्ढेकर जिल्ह्यातील मर्ढे या गावचे होते. युद्धकाळात रुग्ण सैनिकांची सेवा करून भारताचे नाव जगभर उज्ज्वल करणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे जन्मगाव सोलापूर असून, येथे त्यांचे स्मारकही आहे. तसेच पंचागकर्ते दातेही सोलपूरचेच. कवी कुंजविहारी, शाहीर अमर शेखांपासून ते निर्मलकुमार फडकुले, ‘अक्करमाशी’ या कादंबरीतील वास्तवदर्शी लेखनातून महाराष्ट्राला हादरवून टाकणारे शरणकुमार लिंबाळे; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अनुवादक प्रा. निशिकांत ठकार, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली, समीक्षक गो. मा. पवार, राणा पवार, त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्यापासून ते प्रख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातलेच. अशा सगळ्या नामवंतांनी, प्रतिभवंतांनी मराठी भाषेची जी सेवा केली आहे, तिच्या विकासासाठी जो मोलाचा हातभार लावला आहे त्याचे पांग फेडणे अशक्य आहे. या थोर परंपरेची बूज राखत सोलापूर विद्यापीठ मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे, तेही संशोधन व प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातूनही.
 
प्रा. हनुमंत मते
संचालक,
विद्यार्थी कल्याण विभाग, 
सोलापूर विद्यापीठ
संपर्क : 9822172285, 7385025501
बातम्या आणखी आहेत...