आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता शिक्षणाची: प्रजासत्ताक नेमका कुणाचा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाठ्यपुस्तकं ही विद्यार्थ्यांना धर्मग्रंथासारखी पवित्र वाटतात. या पुस्तकाच्या आधारे विद्यार्थी जीवन राजकीय, सामाजिक व्यवस्थेविषयीची मतं बनवतात. जी राजकीय व्यवस्था देशात सुरू असते त्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या आधाराचा माणूस तयार व्हावा यासाठी शिक्षणाने जबाबदारी घ्यायची असते. भारतात लोकशाही आहे त्यामुळे अर्थातच लोकशाही विचारांचे नागरिक तयार व्हावेत यासाठी शिक्षणाने भूमिका घ्यायची आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तके त्या प्रकारची बनवावी लागतात. पण आपली लोकशाहीच मूलत: मूठभर लोकांच्या हातात आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांचे हे फक्त शब्द आहेत. आर्थिकदृष्ट्या मजबूत वर्गच उच्च जाती, उद्योगपती व नोकरशहा यांचाच या लोकशाहीवर कब्जा आहे. त्यामुळे नकळत अशाच सामंतशाहीसारखेच लोकशाहीचे स्वरूप झाले आहे. कष्टकरी माणसे या लोकशाहीत नेतृत्व करताना दिसत नाहीत. त्यामुळे हेच प्रतिबिंब पाठ्यपुस्तकातही पडले आहे. मुळात आडातच लोकशाही नाही तर पाठ्यपुस्तकाच्या पोह-यात तरी ती कुठून येणार हा प्रश्न आहे.
कवी बालाजी मदन इंगळे या कवीने पाठ्यपुस्तकाला केंद्रीभूत धरून अतिशय साध्या संवादातून लोकशाहीचे खरे स्वरूप स्पष्ट केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांनाच चिंतन करायला त्यामुळे नक्कीच भाग पडेल व त्यातून आज अपारंपरिक राजकीय पक्षांकडे लोक आकर्षित का होत आहेत याचाही बोध होईल. पाठ्यपुस्तकांचे विश्लेषण अनेक शिक्षणतज्ज्ञांनी केले आहे. या पाठ्यपुस्तकात कष्टकरी जनतेचे प्रतिबिंब कुठेच नसते. महिला या स्वयंपाकाची कामेच करताना दाखवली जातात. एका पाठ्यपुस्तकात तर आपल्याला वाघ कुठे आढळतात हा प्रश्न दिला होता आणि त्याच्याखालीच आपल्याला आदिवासी कुठे आढळतात हा प्रश्न होता. इतका हीन दृष्टिकोन पाठ्यपुस्तकांचा गरीब जनता, कष्टकरी बांधवांविषयी असतो. त्यामुळे ही पाठ्यपुस्तके वाचणारी मुले जेव्हा नागरिक होतात तेव्हा त्यांनाही या गरीब वर्गाविषयी सहानुभूती वाटत नाही. आम्ही समाज म्हणजे फक्त आपल्यासारखी पांढरपेशी माणसे असेच फक्त मुलांवर ठसवतो. त्यापलीकडे मुलांना समाज असतो. आदिवासी, दलित, भटके विमुक्त यांचाही समाजात समावेश असतो, असे आम्हाला वाटतच नाही. ती माणसे आमच्या सामाजिक, राजकीय परिघात निर्णयप्रक्रियेत कुठेच नाहीत. त्यामुळे ते अदृश्य आहेत. त्याचेच प्रतिबिंब आमच्या पाठ्यपुस्तकात पडले आहे हेच ही कविता अधोरेखित करते. हे सर्वात मोठे सामर्थ्य या कवितेचे आहे.
आमचा बा
कॉलेजमधून आणलेलं
राज्यशास्त्राचं पुस्तक घेऊन
निघालो होतो शेताकडं
सोबत 4 थीतला भाऊही सोबत निघाला
पाणंदीत आल्यावर
पुस्तकं त्याच्याकडं देऊन
रमत गमत निघालो होतो
तर जरा पुढं गेल्यावर
पुस्तकाचं मुखपृष्ठ बघून
तो मला म्हणाला ‘‘दादा हे कुणाचं घरं रे’’
मी म्हणालो ‘‘हे घर नव्हे ही भारतीय संसद आहे’’
त्याला काय कळालं कुणाला माहीत
पण मोठ्ठा प्रश्न पडल्यागत तो बघत राहिला
आणि पुन्हा ‘‘हे लोक कोण’’
मी म्हणालो ‘‘हे लोक म्हणजे भारतीय समाज’’
त्या पुस्तकाकडे बघत बराच वेळ विचार करत राहिला
आणि म्हणाला ‘‘कुळव घेतलेला आपला बा याच्यात कुठं दिसत नाही’’
चालता चालता मी थांबलो
आणि शांतपणे विचार करत पुन्हा त्याच्याबरोबर निघालो
पुन्हा त्याचा तोच प्रश्न
‘‘तू गप बस तुला काय कळतंय’’
म्हणून मी त्याच्या हातातलं पुस्तक
रागानं हिसकावून घेतलं
आणि तो मुकाटपणे
माझ्या मागे चालत राहिला
- बालाजी मदन इंगळे (बालाजी मदन इंगळे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक असलेले प्रसिद्ध कवी आहेत)