आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harshada Deshpande Article About Dealing With Diabetes

जीवनाचा गोडवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी मुळात तब्येतीकडे फारसं लक्ष न देणारी आणि खाण्यापिण्याची प्रचंड आवड असणारी. स्वयंपाकघरात जास्त रमणारी. तब्येतीच्या कुरबुरीकडे लक्ष दिलंच नाही. हात जरा जास्तच दुखत होता; पण पोरं त्या सुमाराला नुकतीच शिकायला बाहेर पडली होती. म्हटलं, त्यामुळे कामं कमी आिण म्हणून ही नाटकं आहेत. मग मनापासून आवडणारं गाणं सुरू केलं. तरीही हातापायी अस्वस्थ होते. सासूबाईंबरोबर एकदा दवाखान्यात गेले. तेव्हा डॉक्टरांना म्हटलं, हात खूप दुखतोय. ते म्हणाले, वहिनी चाळीस पार झालं असेल तर एकदा शुगर, बीपी करून घ्या. मी म्हटलं, अहो, पण माझ्याकडे कुणालाच नाही, आईवडिलांना पण नाही. ते म्हणाले, तरी एकदा करून घ्याच. नसेल तसं काही तर छानच आहे. विचार केला की डॉक्टरांशी बोललं की हे असं काही तरी सांगतातच. त्यानंतर लगेच दिवाळी आली. फराळ, गोडधाेड, करणे, खाणे...
एक दिवस आईवडील म्हणाले, तुला डॉक्टरांनी केव्हाच शुगर चेक करायला सांगितलीये, पण तू लक्ष देतच नाहीस. आता आम्ही जाणार आहोत रुटीन टेस्ट करायला, आमच्याबरोबरच चल. त्यांच्याबरोबर गेले. रक्त दिलं. येताना त्यांनाच सांगत होते, नेहमी चेक करत जा, शुगरचा भरवसा नाही, साठीनंतरही होते.

दुस-या दिवशी सकाळी रिपोर्ट आला आणि आयुष्य बदलले. धक्का नावाची गोष्ट काय असते ते जाणवले. माझ्या शुगरने बाॅर्डरच्या किती तरी वरची पातळी पार केलेली. २८०च्या वर. डोळ्यांपुढे काजवे चमकले. रडूच यायला लागले. आपण खेळाडू होतो. आपल्याला कधी काही असं होऊ शकत नाही, इतक्या लवकर तर नाहीच. हे खोटे अवसान गळून पडले.
पुन्हा वाटलं, पॅथॉलॉजीची गडबड असेल, दुस-यांचा रिपोर्ट मला आला असेल. पुन्हा दुस-या दिवशी टेस्ट केल्या. रिपाेर्ट तोच. डॉ. म्हणाले, वहिनी, तुम्ही डायबेटिक आहात. आता काळजी करू नका, रुटीन ठेवा. पथ्य पाळा. सगळं ओके होईल.

मी खूप अस्वस्थ झाले, बेचैन झाले. आता आपण मरणार. मुलांचं, नव-याचं कसं होणार. आता आयुष्याची सगळी मजा संपली. खाण्यापिण्यावर बेहाल, गोड तर बंदच. गोडाशिवाय आयुष्य म्हणजे किती नीरस, कंटाळवाणं. कठीण आहे हे जगणं असं वाटलं. एक महिना रडून काढला. मुलांना जवळ घेऊन बसले. मुलं म्हणाली, अगं आई, हे नॉर्मल आहे. डायबेटिस खूप जणांना असतो. पथ्य पाळायची. मरत बिरत नसतं कुणी. सगळं कळत होतं. मी अडाणी थोडीच होते. इतके दिवस लोकांना आहे हे ऐकलं की, त्यांना किती सूचना मीच तर दिल्यात.

नवरा तर फार अस्वस्थ झाला. तो खूप हळवा, त्याला स्वत:ला शिंक आली तरी तो ४ गोळ्या घेऊन लगेच काढा करून मागतो. मला आजारी कधी त्याने बघितलंच नाही. मला सांगत होता, जाऊ दे. आपण पथ्य पाळू. मी फिरायला येईन तुझ्याबराेबर, वगैरे. डॉक्टरांनी पथ्यपाण्याची लिस्ट दिली. आवडीचं सगळं गेलंच. त्यातून गोड, आइस्क्रीम, जंक फूड, उपवास सगळं बंद. फिरणं आवश्यक म्हणजे सकाळी पहाटे उठणं होतं. आता शाळा, डबा नाही आराम आहे, तर फिरणं सुरू झालं. एखादी गोष्ट करायलाच हवी असं असतं तेव्हा ती चांगली आहे हे माहीत असूनही त्रास होतो.

सासूबाईंनी खूप धीर दिला. म्हणाल्या, तू पक्की आहेस. तुझा स्वभाव माहीत आहे, तू कंट्रोल करू शकतेस. जे आपल्यासाठी विष आहे ते सोडून दे. बघ पुढचा रिपोर्ट नाॅर्मल येईल. खूप धीर आला. त्या पण अस्वस्थ झाल्या होत्या.

सगळं रुटीन बदललं. लवकर उठणं, फिरणं, नाश्ता, जेवण पण मर्यादित, उसळी, पालेभाजी. जास्त भात व गोड बंद. सगळंच कडू-कडू वाढलेलं. एक महिना झाला. रिपोर्ट नाॅर्मल. खूप छान वाटले. डॉक्टर म्हणाले, ठीक आहे पण हे व्रत आहे. जन्मभर पाळायचे आहे. नव्याचे नऊ दिवस असं करू नका. शुगर रुटीन झाली की तिचं कुणाला काही वाटत नाही.

पण रुटीन लागलं. हलकं वाटायला लागलं. वेगळाच उत्साह वाटायला लागला. डायबेटिस मीच कंट्रोलमध्ये घेतला. विचार केला, ठीक आहे, आता हा आपला झालाय, तर त्याला लाडवायचं नाही. डोक्यावर तर बसवायचंच नाही. उपवासही बंद केले. खूप जड गेलं, पण देवाला म्हटलं, तू नाराज होतो का डॉक्टर हा विचार करावा लागेल आता. तू हे दान दिलंस, तूच निभावून ने आता त्यातून. हे सगळ आतापर्यंतचं रडगाणं झालं, पण या साखरेने आयुष्याला शिस्त लावली, जी आधीच हवी होती. रवा, मैदा, साखर, तूप, जंक फूड, गोड वगैरे सगळं बंद झालं. भाज्या, कडधान्य वाढली. साखरेचं प्रमाण योग्य झालं.

आयुष्याची किंमत कळाली. आपल्याला काय होईल ही जी मनुष्यावर भीती असते ती गेलीच एकदम. मरण दुस-या कशातही असेल, पण खूप काही वाईट होईल हे सध्यातरी डोक्यात नाही.
आता शुगर होऊन दोन वर्षं झाली, पण दोन वर्षांत एकदाही तिला लाडावू दिले नाही.
पुरणपोळी, गुलाबजाम, रस, आइस्क्रीम मनसोक्त खाता नाही आलं की, मन खट्टू होतं. दोन चमच्यांच्या वर रस खात नाही. एकदा ताट भरून घेतलं की, पुन्हा घरातून काही आणायचं नाही. सगळी काळजी घेते; पण ३ महिन्यांनी शुगर चेकअपची वेळ झाली की प्रचंड दडपण येतं. परीक्षेसारखं. संध्याकाळी रिपोर्टच्या वेळेस मन बेचैन. तीन महिन्यांत काय-काय खाल्लं आठ‌वत राहतं. वाटतं, वाढली असेल तर सगळे काय म्हणतील. डॉक्टर म्हणतील, तुम्ही खूप साखर खात असणार. रिपोर्ट नाॅर्मल आला की खूप आनंद होतो.
जीवनाचा गोडवा या साखरेनेच तर जाणवून दिलाय मला.