आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी काही म्हणा, काही तरी म्हणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुछ भी कर, फेसबुक पे डाल असं म्हणण्याचा आजचा जमाना. फेसबुकव वा व्हाॅट्सअॅपवर लाइक अाणि काॅमेंटची वाट पाहणारे आपण.

जेव्हा या सगळ्यापासून थोडासा वेळ दूर जाऊन परत येतो आणि आपले मित्रमैत्रिणी आपली वाट पाहात असल्याचं कळतं, तेव्हा हायसं वाटतं.

पो रांना चार दिवस सुट्या मिळाल्या. म्हटलं जरा कुठला तरी बाहेरचा प्लॅन करू. सोरटी सोमनाथ ठरविले. म्हटलं काही कुणाला सांगू नका रे, सगळे खूप चौकशा करतात. कशाला जाताय? काय बाई यांचं, मध्येच बरं जमतं, आम्हाला नाही वेळ मिळत, अशा प्रश्नार्थक नजरांच भिरभिरण जाणवतं. (मीही इतरांच्या बाबतीत तेच करते बहुतेक) असो.

आपल्याला सारखं असंच वाटत असतं की, स्वच्छंद जगता अालं पाहिजे, कुणाचं बंधन नको. प्रश्न नको. लोक सगळ्यात नाक खुपसतात. शेवटी सगळी भीती, विचार लोकांचेच. छान दिसेल, छान वाटेल, तसंच वागायचं. कुणी काही म्हणायला नको. तरीही लोक बोलतातच आणि ते खरंच असतं बऱ्याच वेळा, म्हणून जास्तच राग येतो.

घरातून निघालो, वेस मागे पडली. मोकळं वाटायला लागलं. एक एक गाव मागे पडायला लागलं. रोज साडीत वावरणारी मी ड्रेसमध्ये वेगळंच वाटत होतं, लहान झाल्यासारखं. मनाने पण वेगळेच विचार करायला सुरुवात केली. मोकळी हवा, भरभरणारा वारा, झाडी, शेत, डोंगर, सगळंच हवंहवंसं वाटणारं. हळूहळू महाराष्ट्र मागे पडला. गुजरात बॉर्डर अाली, हे मोबाइलच्या मेसेजने लक्षात आणून दिलं. रोमिंग सुरू झालं. रस्त्याने नुसती मजा चालली होती. पोरांचा गोंधळ. गाणी. गप्पा. उतरून कणसं खाल्ली, आइसक्रीम खाल्लं, रस्त्यात उभं राहून. आपल्या गावात हे सुख नाही. वहिनी रस्त्यात उभं राहून खातात… बापरे ती कल्पनाच नको वाटते. इथे कुणी ओळखतच नव्हतं. इथे ना नजरा ना एटिकेट्स, नो ओळख. बडोद्याला पोहोचलो. हॉटेलमध्ये थांबलो. हॉटेलच्या बाहेर पडलो, समोरच एक अॅटोरिक्षा उभी. रस्त्यात पण गर्दी नाही. मी रिक्षात ड्रायव्हरच्या जागी बसले. यांना मागे बसवलं. लगेच फोटो काढून व्हाॅट्सअॅपवर टाकले आणि लाइक्सची वाट बघत बसले. स्वत:चाच राग आला. का ज्यांना सोडून आलो त्यांच्या लाइक्सची वाट बघतोय? इथे तर कुणी काही म्हणत नाहीये. सोरटी सोमनाथला संध्याकाळी पोहोचलो. दर्शन उद्या अंघोळीनंतर, असं ठरलं. आधी समुद्रावर गेलो. अथांग समुद्रासमोर एकदमच खुलेपणा जाणवायला लागला. पण त्याकडे दुर्लक्ष करून यांना म्हटलं, आपण दोघं उंटावर बसू या. हे आधी तयार होईनात. मी म्हटलं, अहो, तुम्ही आपल्या लग्नातदेखील घोड्यावर बसला नाहीत. लोक काय म्हणतील याची लाज वाटून आणि कारमधूनच मिरवणूक काढलीत. इथे आपल्याला कुणी ओळखत नाही. इथे आपण उंटावरचे शहाणेच ना. खूप हसलो. हे तयार झाले आणि तेही फोटो काढले.

दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन खूप उत्साहात सोरटी सोमनाथच्या मंदिरात पोहोचलाे. खूपच गर्दी. सगळं सामान चपला, कॅमेरे, मोबाइल, पर्स सगळं जमा केलं आणि कंगाल झालो. रांगेत लागलो. त्या पोलिसी वेषातल्या बाईने निर्विकार, बेदरकार तपासणी केली. खूप रागच आला बाई, मी काय तिला अतिरेकी वाटते? ते तर बिचारे सरळ प्रवेश करतात. त्यांची कुणी तपासणी करत नसेल का? त्यांच्या जवळचे सामान कसे जमा करावे लागत नाही, असे अबोध प्रश्न चाळिशी झाली तरी पडायचे राहातच नाहीत. मी एका वकिलाची बायको आहे. कायदा आमच्या घरात कोळून पिला जातो आणि ही बाई मला काही समजत नाही, अशी माझ्याकडे तिरस्काराने का बघत आहे?

मग रांगेतून तासाभराने मंदिरात पोहोचलो. तर चक्क तो सोमनाथ परका वाटायला लागला. त्याच्या समोरच्या गणवेशातल्या बाईने ढकलले तरी तो सोमनाथ काही म्हणाला नाही की, यांना दोन मिनिटं थांबू दे, खूप लांबून आलेत. तो देवही खूप शिष्टच वाटला. माझ्या गावात समोरच महादेव मंदिर आहे. तोच हा महादेव आहे ना? हा तर इथे वेगळाच वाटतोय. तिथला माझाच आहे. मी रोज जाते. रांग नाही, तपासणी नाही. त्याच्या समोर तासन‌्तास बसते, बेल घालते. त्याचा जीव गुदमरतो, पण तो काही म्हणत नाही आणि हा…

इथले लोक इथे हक्काने वावरताहेत आणि मी कोण आहे? माझ्या नवऱ्याला घराबाहेर पडलं की, दहा जण नमस्कार करतात. आणि इथे त्याला पण पुढे ढकललं. पोरांचा चेहरा पण बदलला. तसंच हात जोडून बाहेर आलो. प्रसाद आम्हीच आमचा विकत घेतला. आमच्या गावात तर प्रसाद घरीच येतो. स्थानमाहात्म्य म्हणतात, ते हेच वाटतं.

दुसऱ्या दिवशी द्वारका. तिथेही तेच. माझा तो सावळा श्रीकृष्ण ज्याची गाणी मी खूप कार्यक्रमांत म्हणते, तो इथे द्वारकाधीश. त्याचा थाट तर वेगळाच. दर एक तासाने त्याचा पडदा बंद. आता लल्ला झोपला. आता लल्लाची अमकी वेळ. आता त्याचा छप्पन्न भोगचा नैवेद्य. रांग लागलेलीच. हा माझापण आहे, मी चतुर्मासात याला रोज लोणीसाखर दिलं. हा इथे माझ्याकडे बघतो, पण इथेही कुणी तरी ढकललं. म्हटलं, क्या भगवान को देखतेही बैठोगी क्या? खूप राग आला. वाईट वाटलं. यांना म्हटलं, इथे आपल्याला कुणीच ओळखत नाही हो. तुम्हाला कुणी ओळखत नाही. प्रत्येक ठिकाणी आयडी प्रूफ द्यायचे. आपली खरंच ओळख काय? देवही ओळखत नसेल तर काय करायचं? सगळा देव जर एकच आहे, तर माझ्या महाराष्ट्रात माझ्या घरासमोरही तोच आहे.
मग इतकी धडपड करून इथे येण्याचा, खूप वेळ रांगेत लागल्याचा, प्रसाद चढवण्याचा इतका अट्टाहास का?

परतीच्या प्रवासाला लागलो. मन थोडं खट्टू झालं होतं. उगीचच ड्रायव्हरला जरा जोरात म्हटलं. आपल्या गाडीवरचा अॅडव्होकेटचा मार्क का काढला रे, वकीलसाब की गाडी हैं ना फिर... तो नुसताच बघायला लागला.

महाराष्ट्र सुरू झाला. माझी काळी माती, माझे डोंगर, माझी धोतर/नऊवारी साडीतली बायामाणसं, माझी भाकरी, माझं पिठलं. सगळं माझंच ना इथे. मी, माझे विचार की, माझी धारणा?

घरी पोहोचलाे. वाटलं, सगळ्यांनी मला खिडकीतून बघावं. सकाळी उठून मीच शेजारणीकडे गेले. म्हटलं, प्रसाद आणलाय गं तुझ्यासाठी, सोरटी सोमनाथला गेलो होतो. ती म्हणाली, अगं, सांगितलंही नाहीस. आम्हाला करमलं नाही. तुमच्या घरात अंधार, तुझी गडबड बडबड नाही, सगळं शांत तू गेलीस की. डोळे भरून आले माझे. तिच्या गळ्यात पडावंसं वाटलं. आपली वाट बघणारं, आठवण काढणारं, कुणीतरी आहे, ही कल्पनाच किती सुखद आहे ना.

मनाशीच विचार करत घरी आले. कसं असतं माणसाचं. तरुणपणी आणि नेहमीच स्वच्छंद राहावंसं वाटतं. वाटतं, कुणी काही विचारू नाही, कुणी काही म्हणू नाही. कुणी टोकणारं नको. का मला हवं तस जगू देत नाहीत हे लोक? म्हातारपणात ओळख मागे पडते. तरुण मुलांना लोक ओळखायला लागतात. कुणी काही विचारत नाही. काही चुकलं तरी कुणी काही म्हणत नाही. लोक म्हणतात, त्यांच वय झालंय आता. चालायचंच. तेव्हा वाटतं, ओरडून सांगावं, अरे, मला कुणीतरी विचारा रे, कुणीतरी काही तरी म्हणा. सगळे मित्र-मैत्रिणी घरी आले. म्हणाले, आम्हाला सोडून काय केले. काय रिक्षात बसले, काय मजा केली, खूप रागावले, चिडले ते, आनंदाने गहिवरून. हीच माझी कमाई, हीच माझी माणसं हक्काची. म्हटलं, अजून रागवा, अजून ओरडा, असंच प्रेम करा आमच्यावर. अरे, आम्ही तुमच्या ओढीनेच तर परत आलो. माझ्या भुवनेश्वरसाठी, इथल्या श्रीकृष्णासाठी. तिकडचा तर देवही आम्हाला ओळखत नाही आणि माणसंही.
बातम्या आणखी आहेत...