आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harshali Ghule Article About Shortage Of Brides In Maharashtra

\'मुलीच मिळत नाहीत\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदवड. नाशिक जिल्ह्यातील सामान्य तालुका. तसा दुष्काळीच. पण तरीही कांद्याच्या उत्पन्नात आघाडीवर. रेणुकामातेचे मंदिर आणि अहिल्याबार्इंचा ऐतिहासिक रंगमहाल हीच काय ती उणीपुरी ओळख. पण या तालुक्यात प्रत्येक गावात भेडसावणारी समस्या काही वेगळीच. आणि समस्येच्या खोलात शिरावं तर अनेक प्रश्न आणि वाढत जाणारी वास्तवाची दाहकता अगदी दुष्काळाप्रमाणेच.
चांदवडच्या गावागावात आज तिशीला टेकलेले, तिशी ओलांडलेले तरुण बघायला मिळतात, जे किमान 3-4 वर्षांपासून मुलगी शोधत आहेत. लग्न करायचं ठरवल्यानंतर जवळपास 4-5 वर्षे तरी मुलीचा शोध घ्यावा लागतो, तरी मुलगी काही मिळत नाही. हवे तर घरातून पैसे देतो, तुम्ही फक्त मुलगी द्या अन् तुमच्या दारासमोर मांडव टाका, असे संवाद येथे कानी पडतात. आज मुलगी उचलून आणण्याची पद्धतही रुजून 4-5 वर्षे झाली. कित्येक जणांच्या लग्नात जेवणावळी, मांडव, बस्ता, बँड इतकंच काय तर पुजार्‍याची देणगीसुद्धा मुलाकडच्या मंडळींनी दिली. पण आता पैसे देऊन, लग्नाचा खर्च करूनही मुलीच मिळत नाहीत. आणि याला काही सामाजिक आणि आर्थिक कारणेही आहेत.
खरे तर स्त्रीभ्रूणहत्या ही समस्या 25 ते 30 वर्षांपूर्वी इतकी ज्वलंत नव्हती. मुलगा की मुलगी हे तपासण्याचे तंत्रज्ञानही प्रगत नव्हते म्हणजेच तेव्हा स्त्री-पुरुष गुणोत्तरात इतकी तफावत नव्हती. मग आज स्त्रीभ्रूणहत्या होत असताना पुढील 25 वर्षांनंतरच्या परिस्थितीची कल्पनाही शक्य नाही.
मग खूप विचार केला की समस्येचे मूळ जाणवते ते इथल्या संघर्षात. कायम दुष्काळी तालुका. पिण्यापुरते पाणी. एक हंगामी उत्पन्न. 4 महिने खूप कष्ट आणि उरलेले 8 महिने त्यावर उपजीविका. म्हणून आपल्या पुढच्या पिढीचे दिवस सुखात जावे, त्यांनी सुखानं आयुष्य जगावं, यासाठी शेतकर्‍यांनी, मजुरांनी दुष्काळातही मुलं शिकवली. आजही शिकवत आहेत. पण या संधीचा अधिक फायदा मुलींनी उचलला. मुली खूप शिकल्या. ज्या घरात मुलगा बारावी किंवा बीए, आयटीआय, त्या घरात मुलगी एमए, बीएड, डीएड, पोलिस, बीएस्सी झाली. मग या सगळ्या चिमण्या शिकलेली मुलं बघून शहरात उडून गेल्या. आता मुलांना मुली कशा मिळणार? त्यात ज्या मुली कमी शिकल्या, त्याही दुष्काळी तालुका, उत्पन्न कमी, आणि ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ या मानसिकतेत. मग चांगला शेतकरी पाहिजे म्हणून शेजारच्या संपन्न तालुक्यातील तालेवार शेतकरी मुलींच्या वडिलांना खुणावू लागले. आज इथे कित्येक मुलींचे वडील आपल्या तालुक्यातलं स्थळ नको, निफाड-दिंडोरी भागातच मुलगी देऊ, असं सांगताना दिसतात.
दरवर्षी ज्योतिष्यांकडे जाऊन या वर्षी तरी योग आहे का, हे विचारण्याचा धडाका सुरूच. वर्षानुवर्षे. त्यात वय वाढतंच. तिशीला वय पोचतं मग. मुलींची लग्नं लवकर होऊन गेलेली. आपल्या वयाची मुलगी मिळेना. आणि मुला-मुलीत जास्त अंतर असेल तर लग्न जमेलच कसं? असं करत करत आज प्रत्येक गावात 20 ते 50 नवरदेव बाशिंग घेऊन तयार दिसतील. पण मुली काही मिळत नाहीत.
या भीषण समस्येचा उपाय शोधण्याचा कुणीच प्रयत्न करतानाही दिसत नाही. काही मुलं औद्योगिक वसाहतीत रोजंदारीवर जातात व नोकरीला असल्याचं भासवून लग्न करतात. कित्येक मुलींची तर फसवणूकसुद्धा झाली आहे. 5-6 हजार रुपये कमावणारी ही मुले शेतीला-निसर्गाला आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आयुष्याची माती झाली या शेतीपायी, आता शहरात मिळेल ते काम करू, अशी धारणा तयार होते आहे. सोयरीक जमवताना शेतीचे उतारे मुलींच्या वडिलांकडून तपासले जातात आणि खात्री करून घेतली जाते. या पडताळणीची मुलांना आणि त्यांच्या घरातल्या मंडळींना सवय झाली आहे. त्यातच मोठ्या सुनेला बिनलग्नाची बहीण असेल तर शोधण्याचा त्रास वाचावा म्हणून व्याहीमंडळींवर वा सुनेवर दडपण आणण्याचा एक दुसरा प्रकार घडतो.
अर्थात या समस्येचे वाईट परिणाम खूप खोलवर आहेत, पण काही चांगले परिणामही आहेत. ते कसे आणि कोणते?
या समस्येची दुसरी बाजू मला खूप सुखावह वाटते. आणि ग्रामीण सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वाची. आपल्या समाजाने वर्षानुवर्षे हुंडा पद्धती जोपासली आहे. त्यामुळे घरगुती हिंसाचारही वाढला होता.
पण मुलींचा तुटवडा भासू लागल्याने मुलींना व मुलींच्या घरच्यांनाच लग्नासाठी पैसे देण्याची पद्धत सुरू झाली किंवा किमान लग्नासाठीचा खर्च कमी झाला. आधीच मुली मिळत नाहीत, त्यात आहे ती बायको निघून गेली तर भविष्य अंधारातच जाईल, या धाकामुळे सासू-सुनेचं पटत नसेल असं क्वचितच होतं. सासू सुनांना सांभाळण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करताना दिसते आणि फारच झालं तर ‘तुम्ही वायलं र्‍हा’ असा पर्याय दिला जातो, पण घटस्फोट मात्र नाही. यामुळे घटस्फोटांचं प्रमाणही कमी झालंय.
पूर्वी सावळी मुलगी नको, उंच पाहिजे, नाक लांब आहे, चेहरा जाड आहे अशी कारणं देऊन मुलींना नाकारलं जात होतं, पण आज मात्र सावळी मुलगीही चालेल. त्याला काय होतं? दोनच रंग. कृष्णाचा रंग पण सावळाच होता, असं मुलगी शोधणारे मुलाचे काका-मामा सांगताना दिसतात. त्यामुळे कमी सौंदर्य लाभलेल्या मुलींना नकार पचवावा लागत नाही. हे चांगले सामाजिक परिणाम एक ा मर्यादेपर्यंतच आहेत, पण व्यवस्थेच्या चौकटीच मोडून होणारे सामाजिक परिणाम आणखी सुखावह. एका ओळखीच्या नातेवाइकाच्या टाकून दिलेल्या मुलीचं लग्न पहिल्या लग्नाच्या मुलाशी झालं. एरवी सहजासहजी स्वीकारली न जाणारी ही गोष्ट मात्र सर्वांनीच सहजपणे स्वीकारली. त्यामुळे मुलंबाळं नसणार्‍या विधवांना चांगले आयुष्य जगण्याची संधी मिळते आहे.
हळूहळू हीच मर्यादा जातीपाती तोडेल अशी आशा आहे. लग्नासाठी मुलगी पाहिजे, ती कुठल्या का जातीची असेना, असं म्हणत जातीपातीची
बंधनंही ढिली होऊ लागली आहेत. प्रमाण विरळ आहे. पण तरीही किमान पोटजातींचा तरी विचार होणार नाही हे खरे.

(लेखिका अभियांत्रिकीची विद्यार्थिनी असून ग्रामीण अर्थव्यवस्था व ग्रामीण सामाजिक प्रश्नांवर अभ्यास व काम करते आहे. या विषयावर आपल्या प्रतिक्रिया वा अनुभव आम्हाला जरूर पाठवा.)
ghuleharshali@yahoo.in