आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harshali Ghule Article About Traditional Thinking

डोईचा पदर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांत घडलेल्या अत्याचाराच्या घटना बाजूला ठेवून किमान ‘स्त्री’विषयक विचाराचा मागोवा घेतला तरी जाणवते, की अनेक क्षेत्रांत अजूनही स्त्रीविषयक विचारांची प्रगती सकारात्मक नाही. स्त्रियांचे अंगप्रदर्शन, जाहिराती यांमुळेच बलात्कार होतात, हे विधान असो; किंवा पंढरपूरच्या विठोबा मंदिरात महिला पुजारी नको, म्हणून रंगलेला वाद. विविध देवस्थानांच्या प्रसादाचं कंत्राट महिला बचतगटांना न देण्यामागची देवस्थान विश्वस्तांची भूमिका पाहिल्यावर हे लक्षात येते.
डोईचा पदर आला खांद्यावरी
भरल्या बाजारी जाईन मी।
असं ठसक्यात सांगणा-या संत जनाबार्इंना जे जमले ते आज महिला वर्गाला शक्य आहे? आज स्त्रीला स्वातंत्र्य जरूर मिळाले, पण त्याला जो समाजाचा केंद्रबिंदू मिळाला यांमुळे बंदिस्त परीघच नशिबी आला हे खरे. कारण आजही मुलीने लवकरच घरी यावे, जीन्स-टी शर्ट किंवा पाश्चिमात्य कपडे मर्यादित वापरावेत, कामाच्या ठिकाणी आकर्षक पेहराव करू नये, अशा अपेक्षा केल्या जातात.
मात्र, राजा असणा-या पतीने शिवउपासनेला विरोध केला म्हणून अंगावरील कपडे काढून विवस्त्र होऊन केवळ केशसंभाराने शरीर झाकणा-या अक्कमहादेवींनी जे केले, त्याची आज कल्पनाही शक्य नाही. विवस्त्र होणे सोडाच, पण आजही कित्येक भगिनी पतीचा निर्णय अंतिम मानून मन मारून जगतात. कारण केंद्रबिंदू आमचा नाही, समाजानं या केंद्रबिंदूवरून परीघ काढला आणि आम्ही त्याच परीघात जगतो आहोत. काही दिवसांपूर्वी मंदिर विश्वस्त विरुद्ध महिला बचतगट असा वाद झाला. प्रसादाचे लाडू बनवताना त्यांचे पावित्र्य राखता यावे, म्हणून महिलांना कंत्राट न दिल्याचा कारणावरून प्रकरण न्यायालयातही गेले. यात विजय महिलांचाच झाला. पण मासिक पाळीच्या काळात महिला कामावर येणार नाही, या अटीवरच. पण
देहासि विटाळ म्हणती सकळ। आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध।।
देहीचा विटाळ देहीच जन्मला। सोवळा तो झाला कवणधर्म।।
विटाळावाचोनि उत्पत्तीचे स्थान। कोण देह निर्माण नाही जगी।।
हे सांगणा-या सोयराबार्इंच्या पुढच्या पिढ्यांचा संघर्ष थांबला नाही. सोयराबार्ईंनी किमान साहित्यातून तरी बाजू मांडून ठेवली, समजावून सांगितली; आज तेही कठीणच!
पंढरपूरच्या विठोबाशेजारी रुक्मिणी उभी आहे, पण तरीही महिला पुजारी नको, म्हणून वाद रंगतोय. खरे तर रामदासस्वामींनी वेणाबाई या विधवेला कीर्तनाची संधी दिली, ज्ञान तर दिलेच पण थेट मठाधिपती बनवले. मग त्यांनी ज्या परिवर्तनाला सुरुवात केली ते परिवर्तन स्वीकारण्याची मानसिकता आजही नाही, हे स्पष्ट होते. म्हणजेच सबलीकरणामुळे हक्क आणि अधिकारांबाबत जागृती निर्माण झाली. संधी मिळाल्या म्हणजे स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, असे नाही. किंवा स्त्रीशरीर आणि त्या अनुषंगाने येणा-या बाबींबद्दल वैज्ञानिक स्पष्टोक्तीनंतरही मानसिकता बदलली नाही. उलट जनाबाईची ‘स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास’ ही ओळ आज संधी, स्वातंत्र्य, हक्क, अधिकार मिळाल्यानंतरही लागू पडते, हेच दुर्दैव. आज मानसन्मान नाही म्हणून उदासी नाहीये महिलांमध्ये. तर तत्कालीन समाजात भक्ती व आध्यात्मिक क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांनी महिला आयोगाशिवाय समाजात न्याय मिळवला. कुठलेही आरक्षण नसताना आध्यात्मिक लोकशाहीत जागा मिळवली. आज आरक्षणाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संधीही दिल्यात; पण ‘स्त्री’ म्हणूनच ‘स्त्री’कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाही. युगे अठ्ठावीस रुक्मिणी विठ्ठलाबरोबर उभी आहे. पण आजच्या रुक्मिणीला आजच्या विठ्ठलाबरोबरीने उभं राहून चालणार नाही, तर त्याच्या एक पाऊल पुढेच कदाचित चालावं लागणार आहे.
ghuleharshali@yahoo.in.