आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलतं माहेरपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर हक्काचं आपलं घर आणि माणसं मिळाल्यावर आलेल्या जबाबदारीतून चार-दोन क्षण विसाव्याचे देणारे ठिकाण म्हणजे माहेर. जबाबदारी नसलेलं, बंधन नसलेलं आणि अगदी हवं तसं वागता येणारं ठिकाण म्हणजे ‘माहेर.’ रोजरोजच्या कामातून मुक्ती मिळवून देणारी बदलाची जागा. अगदी पूर्वीपासून माहेरचं महत्त्व यासाठीच. पण हळूहळू ही संकल्पना बदलतीये. नवीन ट्रेंड पडतायत. माझी आजी माहेरपणाचे अनुभव सांगताना फक्त ओढच दिसते. कारण पूर्वी सणासुदीला, दिवाळीला, रक्षाबंधनाला, एखाद्या घरगुती कार्यक्रमाला आणि बाळंतपणालाच माहेरी जाता यायचं. तेही जेव्हा कुणी माहेरून घ्यायला येईल किंवा ‘मूळ’ लावायला येईल तरच. म्हणजेच ‘मुरळी’ आल्याशिवाय तिला पाठवलंच जायचं नाही. त्यामुळे जेव्हाही ‘माहेरपणाला’ जायला मिळायचं तेव्हा खूपच आनंद होत असणार. मग विश्रांती, विसावा, विरंगुळा मिळणार. सुखाचे, दु:खाचे दोन शब्द बोलायला, सांगायला माणसं मिळणार. प्रेमाने तूप-पुरणपोळी खाऊ घालणारी, लांबसडक केसांवरून न्हाऊन देणारी आई, पुढे होऊन काम करणारी भावजय यामुळे ‘माहेर’ म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करणारं ठिकाण.
पण पुढची पिढी थोडी बदलली. फोन आले संपर्कासाठी. दळणवळणामुळे माणसांची भेट घेणं सोपं झालं. मोकळीक वाढली. स्वातंत्र्य मिळायला लागलं. त्यामुळे फोन आल्यावर परवानगी काढून माहेरी जाणं शक्य झालं. उगाचच ‘मूळ’ ‘मुरळी’ हे फार्स बंदच झाले. पण हो, जाण्याचा हेतू मात्र तोच होता. थोडासा बदल हवा म्हणून.
पूर्वीपेक्षा थोडी ओढ कमी वाटत असेल, पण काळजी मात्र तशीच. आपल्यामागे माहेरच्यांची ख्यालीखुशाली विचारणे, संपर्कामुळे सोपं झालं असेल कदाचित. पण आपल्याला स्वत:ला कंटाळा, शारीरिक किंवा मानसिक थकवा आलाय, आता बदल ‘हवा’ असं म्हणून माहेरी जाणं तसंच.
या पुढची पिढी मात्र थोडी वेगवानच. कारण उपलब्ध असलेले विकल्प. पूर्वी हवापालट म्हणून फक्त माहेर. पण आता स्वावलंबी स्त्री उगाच माहेरी कशाला जायचं चार-चार दिवस. उभ्या उभ्या भेटून विचारपूस. शिवाय आता आपल्यामुळे माहेरच्या माणसांचं वेळापत्रक कशाला बिघडवायचं, हा उदात्त विचारसुद्धा. आता बदल म्हणून माहेरपणाकडे खूप कमी स्त्रिया बघताना दिसतात. त्याउलट खास महिलांसाठीच्या सहलींमध्ये मैत्रिणींसोबत, सहकाऱ्यांसोबत जाऊन ‘फुल टू एन्जॉय’ करण्याकडे कल असतो. नोकरी, घर या दुहेरी जबाबदाऱ्यांमधून येणारा थकवा, वीट, शीण, कंटाळा सारं काही दूर करायला. शिवाय नेहमी माहेरच्या त्याचत्याच घरी चार दिवस आराम करण्यापेक्षा दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन आणि सोबतच मौजमजा मस्ती!
थोडक्यात काय तर ‘बदल’ हा ‘आराम’ न राहता मौज, मजा आणि मस्ती यांमुळे बहरलाय आणि विकल्पांमुळे ‘माहेरपण’ही बदललंय.
बातम्या आणखी आहेत...