आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा होताना...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई होताना पत्नीचा खरा आधारस्तंभ हा तिचा जीवनाचा जोडीदारच असतो, हे सांगण्यासाठी एका आईने आपल्या मुलाला लिहिलेलं पत्र!

प्रिय सृजन,
आशीर्वादासह अभिनंदन
आ ज तू बाबा होण्याच्या मार्गावर आहेस. तुम्हा दोघांचे अभिनंदन! तू बाबा होणार, म्हणजे तुझ्या पत्नीबरोबर तुझाही नवीन जन्म. स्त्री बाळाला जन्माला घालते म्हणजे आपले हृदय कायमचे शरीरापासून वेगळे काढून ठेवते, पण त्या हृदयाची स्पंदने पुरुषाशी संबंधित असतात.
माझ्यासमोर ३४ वर्षांपूर्वीचा काळ येऊन उभा ठाकलाय. तू गर्भरूपाने माझ्या गर्भाशयात प्रवेश केला होतास तेव्हा आंतरिक समाधान, तृप्ती लाभली होती. पण शरीर, मन म्लान झालं होतं. जीव घाबरायचा, भीती वाटायची, कधी हसावंसं, कधी रडावंसं, कधी नकळत चिडावंसं वाटायचं. अन्नाचा गंधही सहन व्हायचा नाही. राग, धुसफूस, रडणं. माझा हा शारीरिक, भावनिक व मानसिक त्रास माझ्यासह तुझ्या बाबांनी सहन केला. अगदी हसतमुखाने, कुठलाही त्रागा न करता. तुझ्या दोन्ही आजी, आजोबा, आत्या, मामा सर्वांनी मला खूप सांभाळून घेतलं, प्रेम दिलं, आधार दिला.

त्या काळी लेबर रूममध्ये उपस्थितीची पद्धत रुळली नव्हती. परंतु तुझ्या बाबांनी स्वतःहून ते धाडस केलं आणि “Please trust me, मी तुला कधीच एकाकी सोडणार नाही,” या वचनाच्या भावनेला ते खरे उतरले! त्यांच्या केवळ उपस्थितीने मी त्या असह्य सृजनकळा सोसल्या. त्यांचं असणं हेच माझं बळ होतं.

सृजन, आज तीच परिस्थिती तुझ्या श्यामलची आहे. मी एक आई व मैत्रीण म्हणून तुला काही सांगू इच्छिते. डॉक्टर तुम्हाला वैद्यकीय, शास्त्रीय माहिती देतील, उपचार करतील, पण तुझ्या ‘स्त्री’चं मन तुलाच वाचावं लागेल. एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, कुणालाच कधीही गृहीत धरू नकोस. काही महिन्यांपूर्वी आपल्या घरात आलेली मुलगी पूर्णपणे गोंधळलेली, आयुष्यात, स्वतःत होणारे बदल स्वीकारत आई होण्याच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचलेली. जन्म देण्याच्या प्रक्रियेत गर्भधारणेपासून स्त्रीला शारीरिक, मानसिक, भावनिक यातनेतून जावं लागतं. सुरुवातीचे काही महिने तर फारच वेगळे असतात. सर्वच बाजूंनी ती संवेदनशील झालेली असते. आई होणं ही खूप मोठी आनंद पर्वणी असली तरीही स्वतःचं अस्तित्व संपण्याची ती वेळ असते, हे स्त्रीच्या अंतर्मनाला जाणवत राहतं, त्यामुळे ती सैरभैर होते. कधी शरीराबाबत हीन भावना जन्म घेते, आपण चांगली आई होऊ का, ही भीती वाटते. भावनांवर नियंत्रण राहात नाही. ज्याने आपल्याला प्रत्येक स्थितीत अनुभवलंय, त्या जोडीदाराशिवाय स्त्रीला कोणताच आधार स्थिरावू शकत नाही.

श्यामलची धुसफूस होत असेल ती समजून घे. तिचे वडील तिच्या बालपणीच हे जग सोडून गेले, त्यामुळे कधी ती तुझ्यात तिचे वडील शोधेल, हट्ट करेल, रडेल, चिडेल, ओरडेल, बोलेल. पण तुझ्या प्रेमळ स्पर्शाने ती शांत होईल. तिची भीती कमी होईल, तिला आधार मिळेल. अशा वेळी तिला वाटणारी प्रत्येक गोष्ट मी, मैत्रीण वा आई यांपैकी कुणालाच ती सांगू शकणार नाही, तुझ्याशिवाय! आणि काही गुपितं तर तुम्हा दोघांचीच ना. त्यामुळे तिच्याशी मोकळं बोल, तिचं ऐकून घे. एक सासू म्हणून मी तिला प्रेमळ सल्ला देऊ शकते; पण मला जाणीव आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येक स्त्रीचं प्रत्येक गर्भारपण वेगळं असतं. यात तुलना करताच येत नाही.

आम्ही कुटुंबीय तिला धीर देऊ, प्रेमळपणे, समंजसपणे सांभाळू, वातावरण आनंदी ठेवू; पण इतर सर्व सांभाळायची जबाबदारी तुझी असेल. या वेळी तुझ्याकडून तिच्या मनावर उठलेला छोटासा ओरखडा आयुष्यभराची भरून न निघणारी जखम बनेल. ती कधी त्याबाबत बोलणार वा वाईट वागणार नाही, पण कायमची काचेची भिंत तुम्हा दोघांत उभी राहील. तुझा प्रेमळ कटाक्ष, आनंदी असणं, तिच्या वागणुकीला प्रेमळ प्रतिसाद, तिला जपणं, तिच्यावर दबाव येईल असं न वागणं, तिला या हरवलेपणातही मिळवल्याचं, वेदना सोसण्याचं नव बळ देईल. एका प्रेमळ मिठीत किती बळ असतं, हे सांगणे न लागे. सृजन, तुझ्या बाबांनी घेतलेला त्या वेळेचा निर्णय तुझ्या बाबांची, माझी, तुझी नाळ घट्ट जोडून गेला. तुझे बाबा तुझ्यासाठी केवळ बाबा नाहीत ‘मिआबा’ आहेत, मित्र, आई, बाबा! आणि माझा पहिला श्वास आहेत. त्या सृजनकळा माझ्यासोबतच त्यांनीही अनुभवल्यात.

म्हणणारे म्हणतीलही, हे बायकोचे अति लाड आहेत, डोक्यावर बसेल. पूर्वीच्या स्त्रिया काय गर्भार व्हायच्या नाहीत? पण एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, प्रेमातून जन्माला येणारं अपत्यच परिवर्तनाचं खरं द्योतक ठरू शकतं. पूर्वीच्या स्त्रियांवर जाचक बंधनं लादलेली असायची, त्या घुटमळायच्या, पण पर्याय नसायचे. दोन्ही बाजूंनी ठेचकाळल्या जायच्या, हे अनेक आत्मचरित्रांवरून, लोकगीतांमधून वेळोवेळी जाणवतं. आता काळ बदलतोय, आई बदलतेय, बाबालाही बदलाला समर्थपणे अंगीकारायला हवं. येणारी पिढी हे सामर्थ्य बाळगून असेल. तू स्वतः विचार कर, तुझ्या पोटात थोडं गडबडलं की, रात्रभर ती बैचेन होते, मग तुझं कर्तव्य...

कधी तू साशंक होशील, अनेक अपसमज, विचारांच्या गुत्यांत अडकशील, तर केवळ एक विचार करशील, तुझ्या श्यामलचं मूळ रूप तुला माहितीये. ती जोडणारी आहे. प्रत्येक अवस्थेत तिने तुला स्वीकारलंय, सर्व डावलून ती तुझी झालीये. आता तुझ्या बाळाची आई होतीये, पण ती सध्या नव्या जिवाशी जुळतीये म्हणून स्वतःपासून तुटतीये, हे त्या स्थितीत असलेल्या स्त्रीशिवाय कोणालाही समजू शकत नाही रे! ही अवस्था काही विशिष्ट काळापुरतीच असते आणि आई होणारी स्त्री कुटुंब जोडते, समाज जोडते, जग जोडते. ती ‘देते’, ‘घेत’ नाही.

तुझी श्यामल खास आहे आणि तूच तिची ‘आस’ आहेस. हे क्षण परत अनुभवता येणार नाहीत. येणारा व जाणारा प्रत्येक क्षण एकमेव असतो, परत कधीही न येणारा! तिला तुझं लेकरू होऊ दे. गर्भारपणात तू तिचा ‘आबाप’ हो, मग बघ काय किमया घडते ती.नवीन बाळ ज्या क्षणी तुझ्या कुशीत असेल त्या क्षणी तुझ्या कृतज्ञ नजरेतून तू श्यामलला ‘Thank You’ म्हणशील ना, तेव्हा बघ तिला आकाश ठेंगणं नि तुला अवकाश मुठीत असल्याचा आनंद वाटेल.
तुमच्या ‘सृजनी’च्या स्वागतासाठी आम्ही सर्व तत्पर आहोत.

तुझी,
आई/मैत्रीण
(esy&harshali3831@gmail.com)