आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाहाबाहेरचे: निवृत्तीनाथांच्या पाऊलखुणांची शोधयात्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आषाढी एकादशीला ‘रिंगण’चा चौथा विशेषांक प्रसिद्ध झाला. लोकदेव विठ्ठलाच्या चरणी अंक अर्पण करून या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्याचा रिवाज निर्मितीकारांचा आहे. यंदाचा अंक संत निवृत्तीनाथ यांना वाहिलेला आहे. त्यांच्याविषयी खूप कमी माहिती उपलब्ध आहे. त्या अर्थाने, त्यांच्या महाराष्ट्रभर विखुरलेल्या ज्ञात-अज्ञात पाऊलखुणांचा धांडोळा घेणारी, ही नव्या पिढीची शोधयात्रा आहे..
पंढरीची वारी. समतेच्या तत्त्वज्ञानाची असामान्य लोकपरंपरा. अनेक शतके लोटली, तरीही आंतरिक ओढीने अव्याहत सुरू आहे. वैदिक व्यवस्थेतील भेदाभेदाच्या अमानुष मूल्यांना आव्हान देत निघालेला सामान्य माणसांचा जणू हा महानद. ईश्वर या संकल्पनेसाठी माणसाचा भाविक होण्याच्या इतिहासातील अनेकपैकी एक महापर्व. या वारकरी परंपरेत अनेक संतश्रेष्ठ होऊन गेले. वेगवेगळ्या समाजातून पुढे येत त्यांनी माणुसकीची शिकवण दिली. संत ज्ञानोबा, संत जनाबाई, संत तुकोबा, संत चोखोबा, संत सावता माळी, संत गोरा कुंभार अशी कितीतरी नावे घेता येतील. याच मालिकेतील संत निवृत्तीनाथ. ज्ञानोबांनी गुरू म्हटलेले त्यांचे ज्येष्ठ बंधू.
महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा वारसा असलेल्या या संतांविषयी माहिती कमी उपलब्ध आहे. तेराव्या शतकातील निवृत्तीनाथांविषयी ती आणखीनच तोकडी. ज्ञान हे कणाकणाने मिळत असते, मिळवायचे असते. याची प्रचिती ‘रिंगण’च्या संत निवृत्तीनाथ विशेषांकातून येते. सर्वार्थाने निवृत्तीनाथांच्या पाऊलखुणा शोधणारा हा अंक आहे. जन्मगाव आपे, गहिनीनाथांकडून अनुग्रह मिळालेले त्र्यंबकेश्वर, वारीचे केंद्र पंढरपूर, तत्कालीन धर्मपीठ पैठण, आळे ते आळंदी, नेवासे आदी गावांतील शोधाचे रिपोर्ताज लक्षवेधी आहेत. विशेषतः संदीप जगदाळे यांचे पैठणचे रिपोर्ताज तर खासच आहे. खानदेशातील वारकरी परंपरेचा शोध घेत प्रशांत जाधव यांनी मोठा प्रवास घडवला आहे. हा सगळा शोध घेणारी ही मंडळी तरुण आहेत.
निवृत्तीनाथ आणि अन्य संतांसंदर्भात मांडणीही आहे. जसे, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव; निवृत्तीनाथ आणि सोपान, मुक्ताबाई; निवृत्तीनाथ आणि नामदेव; निवृत्तीनाथ आणि संतमेळा. निवृत्तीनाथांनी नाथ आणि वारकरी परंपरेचा समन्वय साधला, याचीही चर्चा यात आहे. तसेच त्यांचे जीवन व कार्य, त्यांच्या साहित्याचा विचार करणारे लेखही यात आहेत. निवृत्तीनाथांच्या समाधीबोध या तीस ओव्यांच्या पुस्तकाचीही ओळख दिली आहे.
सोबत प्रा. रावसाहेब कसबे, प्रा. सदानंद मोरे आदी ज्येष्ठांचेही लेख आहेत. प्रा. मोरे यांनी वारकरी आणि गुरू परंपरा धुंडाळली आहे. त्यांच्या लेखात पाश्चात्त्य संशोधक जॉन मिचनर यांचा संदर्भ आलेला आहे. मात्र संगणक दोषामुळे इंग्रजी वाक्य अगम्य अक्षरांत उमटले आहे. सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड या संपादकद्वयपैकी परब यांनी मला मूळ वाक्य उपलब्ध करून दिले. ते असे आहे, "द गुरू हिमसेल्फ इज अ टीचर यट फार मोअर दॅन दॅट, ही इज वन हू हॅज गेनड् एनलायन्टमेंट अॅण्ड कॅन हेल्प हिज् फॉलोअर्स टु डू द सेम.' हे मिचनर यांच्या "गुरू' पुस्तकातून घेण्यात आले आहे.

प्रा. कसबे यांच्या पुण्यातील कलाजागर-२०१६मधील व्याख्यानाचा समावेश यात केला आहे. संतांच्या विद्रोही परंपरेची चर्चा येथे आहे.
निवृत्तींच्या संदर्भात अन्य कला माध्यमाचाही अंकात विचार केलेला आहे. कांदबऱ्यांतील निवृत्तीनाथ, चित्रपटातील निवृत्तीनाथ, अभंग गायन यावर स्वतंत्र लेख आहेत.
निवृत्ती हे नाथ संप्रदायाचे, त्यामुळे नाथ संप्रदायाविषयी मांडणी आवश्यक ठरते. या विषयाला वाहिलेले पाच लेख आहेत. नाथ संप्रदायाचा जेथे उगम झाला, त्या मढी गावचा चित्तवेधक रिपोर्ताज आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागावरील नाथप्रभाव सांगणारे स्वतंत्र लेख आहेत. तसेच नाथ संप्रदायाचा वैचारिक वारसा असणारे स्वामी स्वरूपानंद यांच्याविषयी लेख आहे. हा अंक निवृत्तीनाथांविषयी नवी माहिती देत आपल्याला समृद्ध करून जातो.
अंकाची निर्मिती दर्जेदार आहे. सुंदर सजावट आणि मांडणी विशेष कष्ट घेतल्याचे सांगते. ए-फोर आकारातील पानांच्या संख्येच्या तुलनेत किंमत माफक ठेवली आहे.
संतपरंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेणारे वार्षिकांक अशी ‘रिंगण’ची बिरुदावली आहे. या आधी संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई यांच्यावर विशेषांक प्रसिद्ध केले आहेत. आगामी अंक संत विसोबा खेचर यांना वाहिलेला असेल. त्याची उत्कंठा आणि प्रतीक्षा आहेच.
hayat.hp@gmail.com
रिंगण
निवृत्तीनाथ विशेषांक
पाने : १८०
किंमत : ~ ८०/-
संपादन : सचिन परब (९९८७०३६८०५),
श्रीरंग गायकवाड (९८३३६६१४४३)
बातम्या आणखी आहेत...