आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेडलीचा कबुलीजबाब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दाऊद गिलानी हा माझा अवतार आता संपला होता. दाऊद गिलानी ही माझी असणारी ओळख आता माझ्या स्वत:च्या मनात, माझ्या अगदी जवळच्या लोकांत आणि पाकिस्तानातल्या माझ्या मित्रमंडळींपुरतीच मर्यादित होती. आता माझे नाव होते डेव्हिड कोलमन हेडली आणि आता मी अमेरिकन होतो. माझ्या अमेरिकन असण्याचा मला अनेक ठिकाणी फायदा घेता येणे आता शक्य होणार होते, जो मी दाऊद गिलानी असताना मिळत नसे.


‘आता माझे प्रशिक्षण पूर्ण झालेले होते, तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही मी भारतात जाण्यासाठी सर्वार्थाने सज्ज झालो होतो. भारतात जाऊन मला तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांची टेहळणी (रेकी) करून जिहादसाठीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करायची होती. जिहादचे मी हाती घेतलेले हे काम भारतात असे करून दाखवेन, की त्या माझ्या कृत्याचा जगातल्या हरएक सच्च्या मुसलमानाला आणि त्यातही विशेषकरून पाकिस्तानातल्या माझ्या वरिष्ठांना अभिमान वाटायला हवा. एवढेच नव्हे, तर मी केलेल्या तेजस्वी कामगिरीमुळे त्यांचे समाधानही झाले पाहिजे, असे मी स्वत:च स्वत:ला वचन दिले.


‘संपर्क, साधनसामग्री, पैसा आणि माणसे या सगळ्यांचे विलक्षण आणि कार्यक्षम जाळे असणा-या ‘लष्कर-ए-तैबा’ या संघटनेचा मी पाईक होतो. त्यांची हेरयंत्रणा आणि त्यासाठी लागणारे पाठिंब्याचे बळ हेदेखील कुणालाही आश्चर्यचकित करणारे होते, यात शंका नाही. आणि या सगळ्याचा मला जवळजवळ तत्काळ केवळ अनुभवच नव्हे, तर त्याचा अधिकाधिक प्रत्यक्ष पुरावाच माझ्या हाती येत गेला. लष्कर-ए-तैबाला मी माझी जी काही माहिती दिलेली होती त्या आधारे त्यांनी माझा सारा भूतकाळ खणून काढला, माझी पार्श्वभूमी तपासून पाहिली. तहव्वूर राणा या माझ्या शाळकरी मित्राचीदेखील सखोल माहिती त्यांनी मिळवलेली होती. त्यांनी ही सगळी माहिती कशी काय मिळवली असावी, याबद्दल मला काही सांगता येत नाही. मात्र, एक दिवस साजिद मीर आणि मेजर इक्बाल माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितले की, त्यांचे तहव्वूर राणाशी बोलणे झाले असून आपल्या भारतातील कारवाईसाठी आत्यंतिक गरजेचा असा एक औपचारिक आणि संरक्षणात्मक मुखवटा (कव्हर) लागणार आहे, तो देण्याची त्याने तयारी दाखवली आहे.


‘ते सप्टेंबर 2005 मधले दिवस होते. राणाने कुणा रेमंड सँडर्स नावाच्या माणसासह फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस आयएनसी या नावाचा व्यवसाय अमेरिकेतल्या शिकागो इथल्या डेव्हॉन अ‍ॅव्हेन्यू इथे आधीच उघडला होता. हा त्यांचा व्यवसाय उत्तम चालतही होता. इतर देशातील आणि त्यातही भारतीय उपखंडातील लोकांना अमेरिकेत येण्यासाठी जो व्हिसा लागतो, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे वा ती कागदपत्रे तयार करून देणे, हे त्यांच्या व्यवसायाचे मुख्य स्वरूप होते आणि यापोटी ते फी घेत असत. शिकागोमध्ये आशियाई लोकांची जिथे दाट वस्ती आहे, त्या भागात त्यांचे हे ऑफिस होते. राणाचे राष्‍ट्रीयत्व अमेरिकन नव्हे, तर कॅनेडियन होते. एवढेच नव्हे, तर राणा मूळचा पाकिस्तानी नागरिक होता आणि याच गोष्टीचा अचूक फायदा घेत लष्कर-ए-तैबाने त्याला आपल्या बाजूला वळवले...
हेडली आपली कहाणी शांतपणे आणि कुठलाही आडपडदा न ठेवता सांगतो आहे, हे चौकशी करणा-या बेहरांच्या लक्षात आले. काय असेल ते असो; बेहरांनी आपल्या मनातील विचारांना आवर घातला आणि या क्षणी हेडलीचा शब्द न् शब्द आपल्यासाठी अतिशय मोलाचा आहे, हे लक्षात येताच बेहरा डेव्हिडचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागले.


‘भारतात असणा-या डेव्हिडला तू केवळ पैसा आणि गरजेपुरते संरक्षण तेवढे द्यायचे आहे, असे लष्कर-ए-तैबातील माझ्या वरिष्ठांनी राणाला सांगितले होते. लष्कर-ए-तैबा आपल्याला काहीही करायला भाग पाडू शकते, याची जाणीव असलेल्या राणाने मला भारतात पैसे पाठवणे आणि तिथे गरजेपुरते संरक्षण देणे ही त्यातल्या त्यात कमी जोखीम असणारी कामे आपण करणे शहाणपणाचे ठरेल, हे ओळखले. या योजनेनुसार, हेडली हा माझा व्यवसायातला भागीदार असून आमच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी हेडली मुंबईत प्रयत्न करत असतो, तेव्हा यासाठी म्हणून त्याला वेळोवेळी मला काही पैसे पाठवावे लागतात, एवढेच राणाने वेळ पडल्यास सांगायचे होते. या योजनेनुसार राणाने मला एकदा पैसे पाठवलेही होते, ते मला ट्रायडंट हॉटेलच्या जवळ असणा-या बँकेतून घ्यावे लागले होते.


‘राणाला आमच्या या योजनेत सहभागी करून घेतल्यामुळे, त्याचा मला एका बहाण्यासारखा उपयोग करता येणे शक्य होणार होते. उद्या समजा भारतीय पोलिसांनी मला पकडले आणि तू भारतात इतक्या वारंवार का येतोस; तू वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ रेकरॉडिंग करतोस ते का; असे काही विचारल्यास मी एक प्रवासी असून नुकतेच मी मुंबईत एक इमिग्रेशन ऑफिस उघडले आहे, तेव्हा माझा व्यवसाय मुंबईत वाढवण्याची माझी इच्छा आहे. मी व्हिडिओ रेकरॉडिंगही या व्यवसायाची गरज म्हणून करत असतो, असा बचाव मला पोलिसांपुढे करता येणे शक्य होते. ही माझ्या संरक्षणाची योजना तशी परिपूर्ण होती. मात्र एका घोडचुकीमुळे ही योजना जवळजवळ बारगळली.
‘अमेरिकेतून भारतात येण्यासाठी मला आवश्यक असणारी कागदपत्रे राणाने आधीच तयार केली होती आणि त्या कागदपत्रांवर पुढील सोपस्कारही केले होते. अमेरिकेतल्या भारतीय वकिलातीने मला भारतात जाण्यासाठी दिलेला व्हिसाही लवकरच माझ्या
हातात आला. या रीतीने मी भारतातल्या मुंबईवर स्वारी करण्यासाठी सज्ज झालो.


‘आश्चर्य वाटावे अशा काही चुका माझ्या पासपोर्ट आणि व्हिसावर झाल्या होत्या. मात्र त्या कुणाच्याही लक्षात आल्या नव्हत्या. भारतीय यंत्रणांच्या लक्षात या चुका नक्कीच आल्या नव्हत्या. डेव्हिड कोलमन हेडली या नावाने मला मिळालेल्या पासपोर्ट आणि व्हिसा या दोन्ही कागदपत्रांवर माझ्या वडलांचे नाव सलीम गिलानी असे लिहिले गेले होते आणि तरीही कुणीच मला प्रश्न विचारला नव्हता आणि म्हणूनच भारतीयांना मी ‘च्युतिया’ म्हणतो ते उगीच नाही!’
आतापर्यंत अस्खलित अमेरिकन इंग्रजीत बोलणा-या हेडलीच्या तोंडून एक झणझणीत हिंदी शिवी बाहेर पडताच बेहरांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. आपल्यासारखीच आपल्या इतर दोघा सहका-यांचीही अवस्था झाली असणार, हे त्या दोघांकडे न पाहताही बेहरांना समजत होते.


‘डेव्हिड, आता तू जो शब्द उच्चारलास त्याचा अर्थ तुला माहीत आहे का?’ बेहरांनी हेडलीला विचारले.
‘अर्थात!’ हेडलीने हसत हसत उत्तर दिले, ‘बेहरासाहेब, मी पाकिस्तानी आहे हे तुम्ही विसरलात की काय? मला हिंदी आणि उर्दू येते. एवढेच नव्हे तर या दोन्ही भाषांतल्या सगळ्या शिव्याही मला अवगत आहेत; यात तुम्हाला आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे हेच मला समजत नाही!’ क्षणभर आश्चर्यात बुडून गेलेले बेहरा सावरून बसले...