आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य आणि स्वच्छता निरीक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकबर बिरबलाच्या राज्यामध्ये एकदा सुशोभीकरण, टापटीप, अकबराच्या महालापर्यंतच्या रस्त्याचे नूतनीकरण इ.साठी एका पात्र उमेदवाराच्या निवडीचे काम बिरबलावर सोपवले. बिरबलाने अनेक विद्वान, हुशार लोकांना डावलले. शेवटी एक उमेदवार पात्र असल्याचं सांगितलं. तेव्हा बादशहाने याच उमेदवाराला का बरे निवडले असे विचारताच बिरबल उच्चारला, महाराज, या उमेदवारामध्ये फक्त याच रस्त्याची नव्हे तर संपूर्ण गावातील स्वच्छतेविषयीची तळमळ आहे, रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणूनही काळजी घेतोय. पण त्याचं कुणी फारसं मनावर घेत नाही. तुम्ही अकबर आहात, बादशहा, राजे आहात. तुम्हाला फक्त तुमच्या महालापर्यंतचा रस्ता स्वच्छ व्हायला हवा आहे की तुमचं संपूर्ण गाव? अकबर अंतर्मुख झाला आणि संपूर्ण गावाचा कायापालट करण्यासाठी शरीर, मनाने पात्र असलेल्या उमेदवाराला चांगली नोकरी मिळाली.


लक्षात आलं नं मित्रांनो, वाढणारं प्रदूषण - मग ते आवाजाच्या माध्यमातून असो, पाण्याच्या किंवा धूराच्या माध्यमातून - आरोग्यावर फार विघातक परिणाम करतं. पाण्याचा, गटारांचा, नाल्यांचा, डबक्यांचा, सांडपाण्याचा योग्य निचरा केला गेला नाही, त्यावर काही उपाय केला गेला नाही तर कितीतरी साथीचे रोग पसरू शकतात. त्यामुळे या विषयावर जनजागृती होणं/ करणं हे गरजेचं असतं. आणि ही जनजागृती जर एखाद्या ‘अधिकृत छताखालून’ होणार असेल तर त्याला अधिक महत्त्व आहे. मग या करिअरचा विचार करायला काय बरं हरकत आहे. हे करिअर आहे. ‘हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर’ अर्थात आरोग्य आणि स्वच्छता निरीक्षक! आपल्या देशामध्ये साथीच्या रोगांविषयी आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. म्हणून याविषयीचा अभ्यासक्रमच भारतामध्ये जानेवारी 1959 मध्ये सर्वप्रथम मुंबईमध्ये सुरू झाला. त्यानंतर अंदाजे सहा महिन्यांनीच जुलैच्या आसपास दिल्लीमध्ये याची सुरुवात झाली. मग पुढे मात्र अहमदाबाद, वडोदरा, बंगळुरू, बेळगाव, भोपाळ, जोधपूर, नागपूर, पुणे, त्रिवेंद्रम, कोची अशा भारतामधील अनेक शहरांमध्ये सुरू झाला.
आरोग्य व स्वच्छता निरीक्षकासाठी काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.
1) अन्न व पौष्टिक मूल्ये : मानवाच्या विविध वयोगटांमध्ये आवश्यक असणा-या अन्नघटकांचा व त्यामधील पौष्टिक तत्त्वांचा अभ्यास मुख्यत्वे इथे असावा लागतो. पौष्टिकतेनुसार अन्नाचे वर्गीकरण, त्याची आवश्यकता, ऋतुमानानुसार लागणारे अन्नपदार्थ याचा समावेशही करावाच लागतो. कारण आहारावरच, शरीराची मनाची वाढ होत असते. त्यामुळे सुदृढ मनासाठी उत्तम, सकस, पौष्टिक आहार महत्त्वाचा असतो याबद्दल दुमत असूच शकत नाही. युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या वडापाव, सामोसे, पाणीपुरीला पौष्टिक पर्यायसुद्धा उपलब्ध असू शकतात हे कोर्स केल्यानंतर नक्कीच कळण्यास मदत होऊ शकते.


2) पर्यावरण स्वच्छता व पर्यावरण अभियांत्रिकी : मित्रांनो, आपण बघतोच आहोत रस्त्यावर उतरलं की किती प्रदूषण आहे ते. रहदारीमधून जेमतेम अर्धा तास फिरल्यानंतर आपण जर रुमालाने चेहरा पुसला तर रुमाल चक्क काळा होतो, शिवाय आवाजाचे प्रदूषण आहेच की! सध्याच्या गणपतीच्या किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये तर याचा निश्चितच अनुभव येतो. कर्कश आवाजातील गाणी, बँड, फटाके वाजवून जमेल तेवढी प्रदूषणात भरच टाकली जाते. हे कमी पडते म्हणून की काय (भावनेच्या भरात) फुलांचे हार आणि पूजेचे साहित्य पाण्यात विसर्जित केले जाते. यामुळे किती प्रचंड प्रमाणात पर्यावरणाचा -हास होतो हे हा अभ्यासकम पूर्ण केल्याशिवाय कळणार नाही.
3) सांडपाणी व्यवस्थापन : लांबून आकर्षित करणा-या टोलेजंग इमारती किंवा बंगले, वीकएंड हाऊसची हौस बिल्डर लोक (सामान्यांच्या खिशाला कात्री लावून) भागवत असतात. पण सांडपाण्याचं काय? त्याचा निचरा बरोबर होतो का नाही हेही विचारात घ्यायला हवं. तेव्हा आरोग्य व स्वच्छता निरीक्षकाचा या गोष्टीवरसुद्धा प्रामुख्याने अभ्यास असावा लागतो.
4) सार्वजनिक आरोग्य / साथीचे रोग : गेल्या काही वर्षांपासून आपण चिकन गुनिया, स्वाइन फ्लूसारख्या नावांशी नव्हे तर त्याच्या दुष्परिणामांशी चांगलेच परिचित झालो आहोत. उघड्यावरील अन्न, दूषित पाणी, दूषित हवा यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कितीतरी पटींनी वाढते. अशा परिस्थितीत हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर जनजागृतीचं काम करतो. पथनाट्याच्या प्रसंगी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीसमोर सभा घेऊन किंवा मोठ्या शहरांमध्ये पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. या करिअरसाठी किमान बारावी पास असणं गरजेच आहे. बारावी सायन्स असल्यास (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) उत्तमच किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर फक्त फाइन आर्ट्स सोडून हा एक वर्षाचा डिप्लोमा इन हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर असा कोर्स करू शकतो. यासाठी शिक्षणामध्ये खूप मार्क पडलेच पाहिजेत किंवा खूप अनुभव गरजेचा आहे असं काही नाही. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी या क्षेत्रामध्ये वळू शकतात.
हा कोर्स केल्यानंतर सरकारी नोकरी मिळू शकते यात प्रश्नच नाही. शिवाय निमसरकारी किंवा गैरसरकारी असणा-या अनेक कार्यालयांमध्ये जिथे आरोग्य खाते किंवा स्वच्छता विभाग आहे अशा ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते, महाविद्यालये किंवा खाजगी संस्था किंवा मोठी हॉस्पिटल यामध्येही चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. थोडक्यात ग्रामपंचायतींपासून ते महानगरपालिकांपर्यंत कितीतरी संधी उपलब्ध होऊ शकतात. ज्यांच्यामध्ये धडाडी आहे, कर्तबगारी आहे, नेतृत्व आहे ते स्वत:चा सल्लागार म्हणूनही व्यवसाय करू शकतात. अभ्यासक्रम, त्याचे शुल्क आणि तुम्हाला मिळणारे वेतन हे सगळचं कुवतीवर, अनुभवांवर बदलणारं असतं. त्यामुळे याविषयी मी अधिक भाष्य करू इच्छित नाही. पण ज्या समाजामध्ये आपण राहतो तो ख-या अर्थाने सुजलाम सुफलाम, निरोगी, सुदृढ, प्रदूषणमुक्त, निर्मळ, करायचा असेल तर हे क्षेत्र नक्कीच तुमच्यासाठी आहे.