आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वास्थ्य आणि जलपान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तहान नसताना वारंवार पाणी पिण्यातून नकळत त्रासदायक विकारांना आमंत्रण दिले जात आहे :
‘पाणी हेच जीवन’, असे आपण नेहमी म्हणतो, कारण पाणी हा जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारा घटक आहे. पण आयुर्वेद शास्त्रातील जलपानाच्या नियमांनुसार प्यायलो तरच! अन्यथा अयोग्य रीतीने पाणी पिण्याची सवय असेल तर हेच पाणी आपल्या शरीरात अनेक विकार उत्पन्न करू शकते. सामान्यत: ही माहिती ब-याच जणांना नसतेच, केवळ कुठे वाचनात आले, ऐकण्यात आले की, आपण शरीरास गरज नसताना, तहान नसताना वारंवार व खूप प्रमाणात पाणी पित असतो, पण नकळत आपण अनेक मोठ्या व त्रासदायक विकारांना आमंत्रण देत असतो. विशेषत: मूत्रविकार असणारे, मूतखेडा किंवा किडनीचे विकार असणारे रुग्ण अशा पद्धतीने भरपूर पाणी पित असतात, तसे सल्लेही त्यांना देण्यात येतात.


* किडनीवर ताण :
ब-याच जणांना सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी पिण्याची सवय असते. आपले जठर, आतडी ही पचनक्रियेतील यंत्रे त्यांच्यावर असा अतिरिक्त भार आल्यानंतर त्यांच्या कार्यात बिघाड निर्माण होणारच. पाण्याचेसुद्धा घन आहाराप्रमाणेच पचन व्हावे लागते, शोषण व्हावे लागते. अतिरिक्त पाणी पिल्याने किडनीलाही मूत्र निर्मितीचे कार्य अतिरिक्त करावे लागते. त्यामुळे किडनीलाही श्रम पडतात, ताण पडतो.


* मंदाग्नी विकारांचा उगम :
आहाराच्या पचनासाठी जठरात जठराग्नी असतो. तो प्रदीप्त असेल तर अन्नाचे पचन योग्य होते. एकावेळी अति मात्रेत पाणी पिल्याने हा अग्नी मंदावतो त्यामुळे आहाराचे योग्य पचन होत नाही. आयुर्वेद शास्त्रानुसार हाच मंदाग्नी समस्त विकारांचा उगम ठरतो. या अयोग्य पचनक्रियेतून अपक्व आहाररस निर्माण होतो व त्यातूनच पुढील रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र आदी सप्त धातू प्राकृत स्वरूपात निर्माण होत नाहीत. यातूनच मेदोरोग (स्थौल्य), मधुमेह असे विकार उद्भवतात.


* जेवणापूर्वी व नंतर लगेच पाणी नको :
अपक्व आहार रसामुळे प्रवाहिका म्हणजे शौचावाटे आव पडणे, शौचाला कुंथावे लागणे हा त्रासदायक विकार अति जलपानामुळे उद्भवतो. ब-याचवेळा आम्लपित्त, अजीर्ण यांचे मूळ कारण अति जलपान असू शकते. नेहमीची सर्दी असणा-या ब-याचशा रुग्णांना भरपूर पाणी पिणे विशेषत: सूर्यास्तानंतर म्हणजे रात्री जास्त प्रमाणात व अति थंड पाणी हे कारणीभूत ठरते. तसेच जेवणापूर्वी व जेवणानंतर लगेच पाणी पिणे हे आयुर्वेद शास्त्रानुसार चुकीचे आहे. ‘भोजनान्ते वारि विषप्रदम’ जेवणानंतर कोल्ड्रिंक्स पिण्याची ब-याच जणांना सवय असते. हे अतिशय वाईट. जेवणाच्या मध्ये मध्ये घोट घोट पाणी पिणे हे हितकर व रुची उत्पन्न करणारे ठरते. अजीर्णात मात्र गरम पाणी थोडं थोडं वारंवार पिणे हा उपचार ठरतो.


* नैसर्गिक तहानेवेळीच पाणी थोडे थोडे प्यावे :
नैसर्गिकत: आपणास तहान लागते त्याच वेळी पाणी प्यावे. मात्र, एकाच वेळी भरपूर पाणी न पिता थोडे थोडे प्यावे. तहानेची तीव्रता जास्त असल्यास असे थोडे थोडे पाणी प्यावे. मूतखड्याचा त्रास असणा-यांनीही वारंवार पण थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घ्यावे. अतिसार (जुलाब), उलट्यांद्वारे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्या वेळी मीठ व खडीसाखर घालून पाणी थोड्या थोड्या वेळाने द्यावे. ज्वरासारख्या विकारांमध्ये पचनशक्ती मंद असताना ‘क्वथित जल’, म्हणजे उकळून एक अष्टमांश शिल्लक राहिलेले पाणी द्यावे, ते सुलभतेने पचते. उन्हाळ्यात शरीरात उष्णता व रूक्षता वाढते; घाम जास्त प्रमाणात येतो. या कारणांनी शरीरातील जलांश कमी होतो, मूत्र निर्मिती कमी होते.


* उन्हाळ्यात फ्रिजऐवजी माठातील पाणी उत्तम :
या वेळी धने, नागरमोथा, वाळा, चंदन अशी शीतल औषधी चूर्णे पाण्यात टाकून ते पाणी प्यावे. स्वस्थ मनुष्याने पाणी कमी प्यावे, असे सांगताना उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू व सप्टेंबर-आॅक्टोबर दरम्यानचा शरद ऋतू या ऋतूत पाणी जास्त पिण्यात आले तरी फारसे बिघडत नाही, असे आयुर्वेद शास्त्र सांगते. उन्हाळ्यात फ्रिजच्या पाण्याऐवजी मातीच्या नवीन मडक्यातील पाणी पिणे जास्त हितकारक ठरते. साधारणत: स्थौल्य, मधुमेह, पचनाचे अजीर्ण, अग्निमांद्यासारखे विकार, आम्लपित्त, नेहमीची सर्दी, दमा, कफाचा खोकला, जलोदर, सूज, त्वचाविकार, मूळव्याध, शौचातून आव पडणे, नेहमी जडपणा वाटणे, झोप जास्त येणे, रक्तातील स्निग्धांश (कोलेस्टेरॉल) वाढणे, असे विकार असणा-यांनी पाणी कमीच प्यावे. आपले स्वास्थ्य टिकवू इच्छिणा-यांनी पाणी पिण्याच्या बाबतीतले हे नियम पाळावयासच हवे.