आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य, नियमाने खेळा जखमी होणे टाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळ हा मनुष्याच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मनुष्याच्या जीवनात उच्च शिखर गाठण्याचे ध्येय हे खेळ जगतमध्ये दिसणारी स्पर्धा व चांगली कामगिरी करायचा अट्टाहास याचे चांगले उदाहरण आहे. असे करण्यास प्रोत्साहन व प्रेरणा देतात. ऑलिम्पिकचे तीन ध्येय - सिट्यूस (उंच पोहोचा), अ‍ॅल्टियूस (वेग वाढवा) आणि फोरट्यूस (चपळता वाढवा) हे प्रेरणादायक जरी असले तरी, धोकादायकदेखील ठरतात. हे ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात बरेचसे खेळाडू त्यांचे बळी पडतात आणि अतिउत्साहात आपल्या शरीराला स्पोटर्स इंज्युरीजच्या अधीन करतात.

स्पोर्ट्स इंज्युरीज कसे टाळाल?
अ) खेळ सुरू करण्याआधीची तपासणी : -शाळेत किंवा क्रीडा संकुलात आपण किंवा आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारचे नवीन खेळ सुरू करण्याआधी त्यांची योग्य त्या वैद्यकीय सल्लागाराकडून तपासणी करून घेणे गरजेचे असते. बर्‍याच वेळा असे आढळून आले आहे की, मुलं नवीन खेळांमध्ये भाग घेण्यात सुरुवात करतात. परंतु लगेच कुठल्या ना कुठल्या दुखण्यामुळे त्यांना तो खेळ सोडावा लागतो. एखाद्या व्यक्तीला हे माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे की त्याची शारीरिक क्षमता किती आहे आणि कुठल्या प्रकारचे खेळ त्यांनी खेळावे आणि कुठले टाळावे.

ब) खेळाबद्दलची माहिती आणि साहित्य : - मुलांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे की, जो खेळ त्यांनी निवडला आहे. त्याची त्यांना माहिती असावी. खरं म्हटलं तर आवड असावी. नुसतेच पालक, शिक्षक सांगतात म्हणून किंवा मित्र-मंडळी खेळतात म्हणून त्याने तो खेळ निवडावा हे चुकीचे आहे. त्याच बरोबर त्या खेळासाठी लागणारी योग्य ती सामग्री आपल्याकडे आहे का? नसल्यास ती आपण घेऊ शकतो का? हे महत्त्वाचे. योग्य सामग्री हे त्या खेळामुळे होणार्‍या इजा टाळण्यात मोठा हातभार लावते.

क) वॉर्म अप : - चांगला आणि योग्य वॉर्म अप हा स्पोर्ट्स इंज्युरी टाळण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जसे युद्धात जाण्याअगोदर, तोफा आणि तलवारींची डागडुजी करणे महत्त्वाचे असते, तसेच खेळ सुरू करण्याआधी वॉर्म अप करणे आवश्यक असते.

वॉर्म अप म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? : - वॉर्म अप हे खेळ सुरू करण्याआधी आपल्या स्नायू आणि सांध्यांना मिळणारा योग्य तो संदेश आहे. वॉर्म अप करून आपण हळूहळू आपल्या शरीराला मुख्य खेळाच्या त्राणासाठी तयार करतो. तसेच स्नायूंना मिळणारा रक्त पुरवठा वाढवतो. जेणेकरून ते खेळादरम्यान दुखावल्या जाण्याची शक्यता कमी होते. खेळादरम्यान होणार्‍या स्नायू-फटी (मसल टेअर) किंवा सांधे मुरगळणे (स्प्रेन) टाळण्यासाठी हे महत्त्वाचे असते.

ड) स्ट्रेचिंग : - जसे वॉर्म अप महत्त्वाचे, तसेच स्ट्रेचिंग. जे काम वॉर्म-अप करते, तेच करण्यास स्ट्रेचिंग अजून हातभार लावते. त्याचबरोबर शरीराची लवचिकता वाढवण्यास स्ट्रेचिंग हातभार लावते.

इ) कूल डाऊन : - जसं वॉर्म अप खेळा आधी, तसेच कूल डाऊन खेळानंतर महत्त्वाचे असते. कूल डाऊन हे खेळादरम्यान आपल्या हृदयाची वाढलेली गती परत समान आणण्यास अत्यंत महत्त्वाची असते. कूल डाऊन न केल्यास खेळादरम्यान हाता-पायातील स्नायूंमध्ये वाढलेला रक्तपुरवठा तसाच राहून, ब्लड पुलिंग होते. तसेच हृदयाकडचा आणि मेंदूकडचा रक्त पुरवठा कमी करते. म्हणूनच कूल डाऊन अत्यंत महत्त्वाची पण दुर्लक्षित शिकवण आहे.

फ) योग्य मैदान आणि पोषाख : - प्रत्येक खेळासाठी मैदान वेगळे, पोषाख वेगळा, असे का? तर प्रत्येक खेळासाठी लागणारी शरीराची क्षमता आणि त्राण वेगळा असतो म्हणून त्याप्रमाणे मैदान आणि पोषाख आखण्यात आलेला असतो. त्याचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे. चपळतेची गरज असणारा खेळ खेळताना जर मुलांनी अवघडून टाकणारी जीन्स किंवा अयोग्य असे चामड्याचे बूट किंवा सँडल घातली असेल तर ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. तसेच खेळ खेळताना लागणारे योग्य ते स्पोर्ट्स गिअर आणि पॅडिंग घालणे महत्त्वाचे. तसे न करणे म्हणजे स्पोर्ट्स इंज्युरीला आमंत्रण देणे असेच आहे.

ग) हवामान : - खेळ खेळताना योग्य ते हवामान असणे महत्त्वाचे, अतिउष्णता, अतिदमटपणा किंवा अतिगारवा अशा परिस्थितीत खेळणे टाळणे हेच योग्य, असे न केल्यास शरीरावर होणारा ताण आणि अवयवांवर येणारा भार वाढतो. हे स्पोर्ट्स इंज्युरीला आमंत्रण देणारे ठरते.

ह) अतिव्यायाम टाळणे : - प्रत्येक खेळाची आणि व्यायामाची योग्य ती अवधी असते. खूप जास्त खेळणे शरीर आणि स्नायूंचा त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेणे. असे केल्यास ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. जास्त खेळणे किंवा ट्रेनिंग करणे म्हणजे आपला खेळ सुधारणे नव्हे. योग्य आणि अनुकूल मार्गाने खेळणे आणि ट्रेनिंग घेणे हे खेळाचा दर्जा सुधारण्याचे आणि शरीराचा आदर करण्याचे महत्त्वाचा भाग आहे.

आहार आणि आराम
- जसा योग्य व्यायाम महत्त्वाचा तसाच महत्त्वाचा योग्य आहार आणि तशीच महत्त्वाची संपूर्ण आणि आरामदायक झोप.
- संपूर्ण आहार खेळाडूच्या शरीराच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यास मदत करतो तर चांगली झोप खेळानंतर थकलेले शरीर आणि सुजलेल्या स्नायूंना आराम देण्यास उपयुक्त असते.
- तर मुलांनो...... आपल्या आवडीचा खेळ खेळावयास सुरुवात करा.......
- खूप खेळा, योग्य खेळा आणि सर्वात महत्त्वाचे, खेळण्यात होणारे स्पोर्ट्स इंज्युरीज मात्र सावध राहून व योग्य त्या सूचना पाळून टाळा.
निरंजन दि. जव्हाण, जळगाव